File Photo
संपादकीय

मर्सिडिज पुराण

पुढारी वृत्तसेवा

मर्सिडिज ही महागडी गाडी आहे, एवढेच आपल्याला माहिती होते. कुठलीही जाहिरात न करता सध्या ही गाडी गाजत आहे. या गाडीचा उद्धार नुकताच दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात करण्यात आला. प्रकट मुलाखतीमध्ये एका विदूषी भगिनींनी त्या आधी ज्या पक्षात होत्या त्या पक्षावर काही आरोप केले. राजकीय लोकांना व्यासपीठावर आणण्याची हौस साहित्यिक लोकांना जास्त असते की काय, अशी शंका वाटत आहे. आम्ही कसे घडलो, हे सांगण्यासाठी अनेक राजकीय लोक साहित्याच्या व्यासपीठावर आले. व्यासपीठावर आल्यानंतर राजकीय लोक काय बोलतील याला काही धरबंद नसतो. साहित्य संमेलनामध्ये ‘आम्ही कसे घडलो’ हे सांगण्यासाठी खरे तर साहित्यिक लोकांनाच बोलवायला पाहिजे होते; पण राजकीय लोकांसाठी संधी असावी म्हणून हे व्यासपीठ तयार केले गेले आणि त्यावर बरेच राजकीय नेते येऊन मुक्ताफळे उधळून गेले.

मर्सिडिज गाडीचा जो विषय आला तो ज्या राजकीय भगिनींनी मांडला त्या आरोपाने साहित्य संमेलनातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. तिकीट हे प्रकरण राजकारणामध्ये महत्त्वाचे असते. साधे नगरपालिकेचे पक्षाचे तिकीट पाहिजे असेल तरी मुंबईपर्यंत धडक मारावी लागते आणि मोठ्या नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. या भगिनींनी आपल्या आधीच्या पक्षावर असा आरोप केला की, दोन मर्सिडिज दिल्याशिवाय पक्षामध्ये कोणतेच पद मिळत नव्हते. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की, ज्यांना पदे मिळाली आहेत त्यांनी किमान दोन मर्सिडिज पक्षप्रमुखांना दिलेल्या आहेत. आपल्यासारख्या सामान्य लोकांना मर्सिडिजची किंमत फारशी माहीत नसते. आपण फार तर मारुती वॅगनार किंवा आय टेन इत्यादी गाड्यांपर्यंतच झेप मारू शकतो. मर्सिडिज या गाडीची किंमत सध्या पन्नास ते साठ लाखांच्या आसपास आहे, असे आढळून येते. दोन मर्सिडिजचे मिळून एक कोटीपेक्षा जास्त रुपये होतात. मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या घरी जर एखाद्या दिवशी 30 लोक येत असतील आणि त्यापैकी दहा लोकांना पद मिळत असेल, तर त्यांच्या दारात 20 मर्सिडिज उभ्या राहायला हव्यात. मोठ्या प्रमाणावर मर्सिडिज उभा राहण्याइतकी जागा मुंबईमध्ये मर्सिडिजच्या शोरूममध्येसुद्धा नसते. या राजकारणी भगिनीला दोन मर्सिडिज म्हणजे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असे अभिप्रेत असावे; अन्यथा चारचाकी गाडी घेऊन लोक येतील कसे आणि पक्षप्रमुख गाड्या ठेवतील तरी कुठे? हा प्रश्न उभा राहतो.

यातून एक निश्चित झाले की, पक्षांमध्ये पद मिळण्यासाठी किंवा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी काही ना काही तरी खर्च निश्चितच करावा लागतो. तो करण्याची ज्याच्याकडे ताकद आहे तोच ते तिकीट किंवा ते पद मिळविण्यामध्ये यशस्वी होतो. राजकारण हा आता धनदांडग्यांचा खेळ झालेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथे करण्यासारखे काहीही उरलेले नाही. कधीकाळी कार्यकर्ते घरचा डबा सायकलला बांधून पक्षाच्या प्रचारावर जात असत, याचे कारण म्हणजे त्यांचा त्या पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास असे. आता घरचा डबा कुणी नेतच नाही आणि राजकीय कार्यकर्ते तर कधीच सायकल वापरत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT