परवा सोनिया मॅम पुण्यात आल्या होत्या म्हणे. चार दिवस परांजपे काकूंकडे त्यांचा मुक्काम होता. महाराष्ट्रीयन साडी नेसण्यापासून मराठी कुटुंबातील स्वयंपाकघरातसुद्धा त्यांनी इंटरेस्ट दाखविला. पुरणपोळी, कटाची आमटी आणि सांडगे-पापड तर त्यांना जाम आवडले. संध्याकाळी दोघींच्या गप्पा रंगात आल्या...
काकू : सोनियाजी, कसं काय वाटलं तुम्हाला आमचं पुणं ?
सोनियाजी : च्यान! मला तर अगदी माहेरात आल्या फरमाणे वाटलं!
काकू : काय काय आवडलं तुम्हाला? आणि आता आमच्यासारखं मराठी बोला बाई!
सोनियाजी : मला चितळ्याची बाकरवडी खूप आवडली; पण मला ती तिकडे कोल्हापूरची पुड्याची वडी असते ना, ती खायची आहे.
काकू : जाऊ ना, आपण कधी तरी कोल्हापूरला. पण, सोनियाजी आज तुम्हाला सकाळी उठायला उशीर का झाला?
सोनियाजी : अहो काल रात्री उशिरा झोप लागली आणि पहाटे एक स्वप्न पडले आणि स्वप्नात आमच्या सासूबाई आल्या.
काकू : काय इंदिराजी, आल्या होत्या स्वप्नात! काय म्हणाल्या त्या?
सोनियाजी : म्हणाल्या, सोनिये तुझ्या नातवाला सून येणार म्हणतात आणि मग माझ्या नातवाला सून कधी येणार?
काकू : म्हणजे प्रियांकाचा मुलगा रेहानच्या साखरपुड्याबद्दल म्हणत होत्या का?
सोनियाजी : होय रेहानचं ठरतंय मग राहुलचं का लांबणीवर टाकतेस म्हणाल्या. अशी कशी गं तू वेंधळी आई आहेस? लग्नाचं वय ओलांडून गेलं पोरग्याचं! काय त्याची अवस्था झालीय? दाढीसुद्धा तो नीट करत नाही. कपडे सुद्धा इस्त्रीचे नसतात त्याला. चालतो कसा बघ तो? काही तरी हरवल्यासारखे वाटते त्याचे... असं म्हणाल्या. (सोनियाजींना हुंदका येतो. पदर नाकाजवळ नेतात. डोळे पुसतात.)
काकू : तुम्ही का मनाला लावून घेता?
सोनियाजी : नाही हो सासूबाई गेल्यापासून घरच्या देवाधर्माचं मी सगळं करते. दर अमावस्येला छतावर दहीभात ठेवते; पण आज पहाटे स्वप्नात आल्या अन् तडागाडा बोलल्या.
काकू : तुम्ही तरी काय करणार? राहुल तयार पाहिजे ना लग्नाला?
सोनियाजी : होय! तो तर म्हणतो देशाचा संसार करायचा असेल, तर मला संसार करून कसे चालेल? मी असाच राहणार, मोदी चाचांसारखा!