पुढारी तडका आर्टिकल Pudhari File Photo
संपादकीय

कसा ओळखायचा उमेदवार?

पुढारी वृत्तसेवा

नवरात्र उत्सव सध्या संपूर्ण राज्यात उत्साहाने साजरा केला जात आहे. जनतेचा उत्साह आहे की नाही माहीत नाही; परंतु राजकीय कार्यकर्त्यांचा आणि भावी नगरसेवकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे. प्रत्येक लहान-मोठ्या शहरामध्ये जिथे रिकामा प्लॉट दिसेल तिथे दुर्गेची स्थापना करण्यात आली असून, मोठ्या आवाजात मातेची गाणी वाजवली जात आहेत. ज्या वसाहतीमध्ये किंवा गल्लीमध्ये किंवा रस्त्यावर दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्याच्या प्रवेशद्वारापासून ते प्रत्यक्ष दुर्गामातेच्या मूर्तीपर्यंत असंख्य बॅनर लागलेले असतात. हे सगळे बॅनर भावी उमेदवार यांचे आहेत आणि नजीकच्या येणार्‍या विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतांची पेरणी करत आहेत, हे आपल्याला सहज ओळखू येते. एवढ्या गदारोळात आणि कार्यकर्त्यांच्या बॅनरवर असणार्‍या असंख्य चेहर्‍यांपैकी नेमका उमेदवार कसा ओळखायचा, याची युक्ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साधारणतः, प्रत्येक गल्लीत भाजप, काँग्रेस दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आणि किमान 15 ते 20 इच्छुक उमेदवार असतातच. लहान गावात प्रत्येक जण एकमेकाला ओळखत असतो, त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा आहे हे जवळपास ठरलेले असते. समजा दुर्गामातेच्या मंडपापाशी कार्यकर्त्यांचे बॅनर असेल, तर त्यावरील प्रमुख उमेदवार सहज ओळखता येतो. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे केवळ डोके दिसते. प्रमुख उमेदवार मात्र पूर्ण साईजमध्ये उभा किंवा चालताना किंवा मोबाईलवर बोलताना दिसतो. एखाद्या भावी उमेदवाराचे तिकीट पक्के असेल, तर तो राष्ट्रीय पातळीवरील नेत्यापासून ते आमदार-खासदार यांच्यासह बॅनरवर पक्षाचे चिन्हही लावत असतो. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या भल्या मोठ्या बॅनरवर जर पक्षाचे चिन्ह लावलेले असेल आणि सगळ्यात मोठा चेहरा ज्या कार्यकर्त्याचा असेल, तर त्याला उमेदवारी निश्चित झाली आहे, असे समजावे.

काही कार्यकर्ते विशिष्ट पक्षाबरोबर गेली किती तरी वर्षे कार्य करत असतात. या वेळेला ते तिकिटाच्या रेसमध्ये असतात; परंतु त्यांना तिकीट मिळेल याची खात्री नसते. आपल्या पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो, उभे राहायचेच, असा त्यांचा निर्धार असतो. यासाठी ते अपक्ष बंडखोर उमेदवार म्हणूनही उभे राहायला तयार असतात. उदाहरणार्थ, एखाद्या उमेदवारला शिंदे सेनेकडून तिकीट हवे असते; पण ते नाही मिळाले तर ठाकरे सेनेकडून उभे राहण्याची तयारी असते. असे उमेदवार पक्षाच्या विद्यमान अध्यक्षापेक्षा हिंदुहृदयसम—ाट यांचा फोटो चिटकवून टाकतात.

काही चाणाक्ष उमेदवार इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांचे सर्वसमावेशक फोटो बॅनरवर लावून मोकळे होतात. म्हणजे उद्या ज्या पक्षाचे तिकीट मिळेल त्या पक्षाकडून उभे राहण्यास ते मोकळे असतात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक भावी आमदारांना त्या त्या वॉर्डामधील मतदान पाहिजे असते. जास्तीत जास्त मतदान आपणच मिळवून देऊ शकतो, हे नगरपालिकेचे भावी उमेदवार या बॅनरच्या माध्यमातून सिद्ध करत असतात. यालाच आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणे, असे म्हणतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT