Pudhari Tadaka article
पुढारी तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

तडका : बेधडक आणि बेदरकार

पुढारी वृत्तसेवा

धनिक बापांच्या बाळांनो, जगू द्या बाबांनो आम्हाला. आम्ही सामान्य नागरिक गर्दीतून वाट काढत रस्त्याने कसेबसे चालत असतो. कुणी तरुण जोडपे मोटारसायकलवर रात्रीच्या वेळी घरी निघालेले असते. तुमच्या धनाढ्य बापाने घेतलेली ती भली मोठी गाडी घेऊन तुम्ही प्रचंड वेगाने रस्त्यांवर ती चालवता आणि बेदरकारपणे, बेधडकपणे लोकांना उडवता. हे अजिबात बरोबर नाही. तुमच्या हातून दोन-चार जीव दगावले तरी तुम्हाला शिक्षा होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी तुमचे बाप समर्थ आहेत. त्यांचे पोलिसांशी, वकिलांशी आणि एकंदरीतच त्या यंत्रणेच्या सर्वांशी लागेबांधे आहेत. मृत पावलेले जीव स्वर्ग प्रवासाला निघण्यापूर्वीच जामीन मिळून तुम्ही तुमच्या घरी पण पोहोचता, हेसुद्धा आमच्या लक्षात आले आहे; पण बाळांनो, सावधान. कायद्याची नाही, तर जना-मनाची तरी थोडी ठेवा. आपल्या गाडीखाली एखादे कुत्र्याचे पिल्लू आले तरी आपलाही जीव तळमळला पाहिजे. इथे तर तुम्ही सर्रास माणसे मारत चालले आहात.

थोरामोठ्यांच्या घरी ड्रायव्हर नावाचे जे इसम असतात, ते गाडी चालवण्यासाठी नसून, अपघात झाल्यास गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी असतात, असेही वाटायला लागले आहे. पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात ‘हिट अँड रन’चे प्रमाण वाढलेले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये बापाने गोळा केलेल्या अवैध संपत्तीतून खरेदी केलेल्या कारचेच अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे येथील गाजलेल्या पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने रात्री मद्यपान केले होते आणि त्यानंतर आपली भली मोठी गाडी घेऊन तो रस्त्यावर भरधाव चालवत होता. नुकतीच मुंबईत घडलेली घटना हे सांगते की, गाडी चालवणारा तरुण अशाच धनाढ्य बापाचा पोरगा होता आणि त्याने भरदुपारीच मद्यपान केले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये चालक सोबत होता; परंतु तो गाडी चालवत नव्हता. बाळांनो, आम्ही नाही म्हटले तरी तुम्ही मद्यपान करणे सोडणार नाही आहात; पण कृपा करून ड्रायव्हरला गाडी चालवू द्या. किमान तो तरी भानावर असेल, तर होणारे अपघात तरी टळतील.

या बेदरकार आणि मद्यपान करून गाडी चालवणार्‍या मुलांच्या बापांनो, मान्य आहे की, पुढील सात पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती तुम्ही गोळा केलेली आहे. आमची एवढीच प्रार्थना आहे की, पुढच्या पिढ्यान् पिढ्या तुम्ही कमावलेल्या पैशावर आरामात गुजराण करोत; पण कृपा करून भल्या थोरल्या गाड्या घेऊ नका. घ्याल तर त्या मुलांच्या हातात देऊ नका. द्याल तर त्या मुलांना चालवू देऊ नका. तुमचा होतो खेळ आणि आमचा जातो जीव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अशाच हिट अँड रन केसमध्ये वाहनचालकाने रात्रीची गस्त घालणार्‍या दोन पोलिसांना धडक दिली. कर्तव्यदक्ष या पोलिसांपैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला आणि दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे. वाहनचालक अर्थातच पळून गेला आहे आणि फरार आहे. मुंबईतील हिट अँड रन केसमध्ये बाप आणि लेक दोघेही फरार आहेत आणि बाहेर राहून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. बाबांनो, काय चालले आहे हे? आम्ही सामान्य माणसांनी रस्त्यावर उतरायचेच नाही की काय? तुमच्या राज्यभर चाललेल्या या कारनाम्यांनी आमच्या घरातील व्यक्ती बाहेर पडली तरी आजकाल धास्ती वाटायला लागली आहे.

SCROLL FOR NEXT