संपादकीय

तडका : हुशार मतदार

Arun Patil

निवडणुकांचे निकाल जे काही येतील ते येणारच आहेत. चार जून रोजी संध्याकाळपर्यंत सगळे चित्र स्पष्ट झालेले असेल. राजकारणाचा एक भाग म्हणून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही बहुमताचा आकडा पार केला आहे, असा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि चारा घोटाळाफेम लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी केला आहे. हे दावे आणि प्रतिदावे उरलेल्या निवडणुकांवरती प्रभाव टाकण्यासाठी असतात. याचा अर्थ मॅच सुरू होण्यापूर्वीच व्हाईस कॅप्टनने आम्ही मॅच जिंकल्यात जमा आहे, असे जाहीर करण्यासारखे आहे. ज्यांचे अद्याप मतदान व्हायचे राहिले आहे, त्यांच्या मनोभूमिकेत बदल करण्याचा प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करत असतात. भारतातील जनता एवढी साधी भोळी राहिलेली नाही हे मात्र अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

तुम्हाला असे वाटेल की, भारतीय जनतेच्या बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला इतका विश्वास कसा काय? जनतेच्या प्रगल्भतेवर विश्वास निर्माण करणार्‍या अनेक घटना इतिहासात घडलेल्या आहेत. 1975 या वर्षी लागू झालेली आणीबाणी 19 महिन्यांनंतर इंदिरा गांधींनी उठवली. त्या काळामध्ये कुठलाही सोशल मीडिया उपलब्ध नव्हता. कुठलाही प्रचार न होता जनतेने काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव केला आणि इंदिरा गांधींना घरी बसवले. अडीच वर्षांचा जनता पक्षाचा काळ जनतेने पाहिला. आपापसातील हेव्यादाव्यांमुळे ते सरकार कोसळल्यानंतर पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा इंदिरा गांधींचा राग आलेल्या जनतेने अवघ्या अडीच वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. त्याही काळात कुठलाही सोशल मीडिया सक्रिय नव्हता. ज्या काय बातम्या कळायच्या, त्या रेडिओवर आणि वर्तमानपत्रांमधूनच. या दोन ऐतिहासिक घटनांनी देशातील जनता किती प्रगल्भ आहे, हे सिद्ध केले होते.

सर्वसामान्य भारतीय जनतेच्या आकलन शक्तीबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल, तर काढून टाका. मोलमजुरी करणार्‍यापासून करोडपतीपर्यंत सर्व जनता बुद्धिमान आहे आणि ती योग्य निर्णय घेत असते, याविषयी आमच्या मनात काहीही शंका नाही. भ-ष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले लालूप्रसाद यादव सध्या शिक्षा भोगत असून, प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर आहेत. अशा वयोवृद्ध नेत्याला पण राजकारणात उतरून सर्व पक्षांना मात देण्याची खुमखुमी आहे. याला खुमखुमी म्हणायचे की अन्य काही, याचा निर्णय मात्र जनता नक्की घेत असते.

या निवडणुकीमध्ये मायावती अजिबात सक्रिय नाहीत. मायावती का गप्प आहेत, याविषयी तुमच्या मनात काही संशय असणे सहज शक्य आहे. बसपने या निवडणुकीतही उमेदवार उतरवले आहेत; परंतु स्वतः मायावती उत्तर प्रदेशातही फारशा प्रचाराला जात नाहीत. याचे कारण म्हणजे काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांवर दगड फेकणे चुकीचे असते, हे त्यांच्या लक्षात आले आहे. भ-ष्टाचाराच्या मार्गाने करोडो रुपयांची संपत्ती गोळा केल्यानंतर आपण जर राजकारणात सक्रिय झालो, तर किती महिने जेलमध्ये जावे लागेल, हे काही सांगता येत नाही. जेलची हवा कोणालाही नको असते. त्यापेक्षा शांत बसलेले बरे, असा विचार त्यांनी केलेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT