संपादकीय

तडका : अस्त्र आणि शस्त्र

Arun Patil

सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा असणार्‍या अनेक मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुका जाहीर होताच काही मतदारांच्या मनात कोणाला मतदान करायचे, हे ठरलेले असते. संपूर्ण जनतेचे असे असते असे नाही. काही प्रचारावर लक्ष ठेवून असतात, तर काही जाहीर सभांमध्ये काय बोलले जाते यावर लक्ष ठेवून असतात. बरेचसे मतदार हे कोणता पक्ष भावी काळासाठी कोणती आश्वासने देत आहे, यावरही लक्ष ठेवून असतात. भारतीय लोकशाही हळूहळू प्रगल्भ होत आहे, हे मात्र निश्चित.

हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे काय, तर उत्तरोत्तर रंगत गेलेल्या प्रचारामुळे आणि अनेक नेत्यांच्या विधानांमुळे तिथे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. बारामतीचे उदाहरण घ्या. इथे ताईसाहेब आणि वहिनीसाहेब अशी लढत आहे. ताईसाहेबांच्या पाठीशी थोरले साहेब आहेत, तर वहिनीसाहेबांच्या पाठीशी दादासाहेब आहेत. त्यामुळे साहजिकच चुरस वाढत गेली आणि आज संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लागले आहे. निकाल यथावकाश 4 जून रोजी येतीलच; परंतु तोवर बरेचसे चर्वितचर्वण या संदर्भाने होत आहे.

निवडणुका म्हटल्या की, त्यांना लढाईचे स्वरूप प्राप्त होते. लढाईमध्ये सर्व काही माफ असते. जे मतदार शेवटच्या तीन-चार दिवसांत कोणाला मत द्यायचे, हे निश्चित करतात, ते बरेचदा लक्ष्मी प्रसन्न होण्याची वाट पाहत असतात. जाहीर प्रचार संपल्यानंतर आवाज न करता लक्ष्मीचे आगमन निवडणुकीच्या मैदानावर होते आणि साहजिकच गोरगरीब, सामान्य मतदार, इतकेच नव्हे, तर शहरी मतदारही भारावून जातात. पुढे पाच वर्षे काही मिळो की न मिळो; परंतु आज जे मिळत आहे ते पदरात पाडून किंवा खिशात घालून घ्या, अशी साधारण प्रवृत्ती असते.

कार्यकर्ते मंडळींची पण या काळात चांगलीच चंगळ असते. 'तळे राखील तो पाणी चाखील' अर्थात धनवाटप करेल तो काही ना काहीतरी लाभ पदरात पाडून घेत असतो. आपल्या स्वयंपाकघरात एखादा पदार्थ तयार होत असेल आणि त्याचा खमंग वास घरभर दरवळत असेल तर येता-जाता आपण सहज म्हणून चार घास तोंडात टाकतोच ना! कार्यकर्त्यांनाही असा मोह होणे शक्य आहे.

राष्ट्रीय प्रश्न, सामाजिक प्रश्न, विकासाचे प्रश्न याकडून जनतेचे लक्ष भलतीकडे वळवण्याचा प्रयत्नही काही नेते करत असतात. सध्या डोळ्यांतून अश्रू काढून जनतेची सहानुभूती मिळवण्यामध्ये काही नेते आघाडीवर आहेत. निर्णायक क्षणी डोळ्यांतून हुकमी अश्रू काढण्याची कला पूर्वी केवळ स्त्रियांना अवगत होती. आज अनेक पुरुष नेते पाहिजे त्या वेळेला डोळ्यांतून अश्रू काढून जनतेसमोर वेगळाच सीन उभा करतात. याचा अर्थ जसे जमेल तसे, पाहिजे ते करून, वाटेल त्या मार्गाने; पण मते मिळवणारच हा बाणा खरोखरच कौतुकास्पद आहे. अस्त्र कोणतेही असो, मग ते धनलक्ष्मीच्या रूपात असो की अन्य रूपात असो, आणि शस्त्र कोणतेही असो, मग ते अश्रूंच्या रूपात का असेना; पण आपला परिणाम निश्चित साधत असते. योग्य जागी जाऊन ते पोहोचले की, त्याचे परिवर्तन भरपूर मतदान मिळवण्यात होते. चार जून रोजी आपणा सर्वांना कळेल की, नेमके कोणते अस्त्र कामाला आले आणि नेमके कोणते शस्त्र कामाला आले आहे. तोवर आपल्या हाती फक्त प्रतीक्षा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT