राज्यामध्ये सध्या जागावाटपाचे गुर्हाळ सुरू आहे. या चर्चांना गुर्हाळ असे का म्हटले जाते याचा आपण कधी विचार करत नाही. ऊस उत्पादकांकडे दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे, ऊस कारखान्याला घालणे आणि दुसरा म्हणजे गुर्हाळ सुरू करणे. गुर्हाळ सुरू करण्यासाठी फार मोठी यंत्रणा आणि कुशल-अकुशल कामगार लागत असतात. एकदा गुर्हाळ सुरू केले की, ते दोन-तीन महिने सुरू असते. त्यामुळे रेंगाळलेल्या चर्चांना 'चर्चेचे गुर्हाळ सुरू आहे' असे म्हणतात.
राजकीय चर्चांची गुर्हाळे सध्या सर्वत्र सुरू आहेत आणि त्यामध्ये निष्णात असणारे गुळवे कढईमधील रस हलवीत बसलेले आहेत. जागा वाटपाचा तिढा संपणे तसे अवघडच आहे. या लोकसभेमध्ये कोणी किती जागा लढवायच्या, हा मोठा कळीचा मुद्दा आहे. बोलणी करताना लोकसभेला तुम्ही कमी जागा लढवा, आम्ही विधानसभेला तुम्हाला न्याय देऊ असे, मोठा भाऊ बजावून सांगत आहे. एकदा केंद्रात सत्ता आली की, राज्य हातातून गेले तरी पक्ष फोडून आपल्या ताब्यात घेता येते. यात वाकबगार असलेले चाणक्य कमळ पक्षामध्ये आहेत.
आधीची युती तुटली आणि धनुष्यबाणाचा पक्षही मोडकळीला आला. मोठ्या भावाचे मोठेपण मान्य न करता आल्यामुळे राज्यात काही लोक उद्ध्वस्त झाले. या संधीचा अचूक फायदा घेत घड्याळ आणि धनुष्यबाण या दोन्ही पक्षांमधील कर्तबगार लोकांनी पक्षावर ताबा मिळवला आणि महायुती स्थापन केली.
जागा वाटपाचा 'तिढा' असा शब्द वापरतात. 'तिढा' या शब्दाचा अर्थ सहजासहजी न सुटणारी गाठ. ती उकलण्यासाठी असंख्य लोकांना प्रयत्न करावे लागतात. गाठ उकलण्याचे पण तंत्र असते आणि ते तंत्र सर्वच पक्षांमधील चाणक्यांना माहीत असते. फक्त किती पावले मागे सरकायचे आणि किती पावले पुढे जायचे, यावरून चर्चा होत असते.
जागा एक आणि आपल्याच पक्षात तीन-चार इच्छुक उमेदवार असतील, तर ती जागा मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष ठेवून मोठ्या भावाचे नियोजन असते. त्याच्या नियोजनाप्रमाणे चालणे धाकट्या भावांना आवश्यक असते. किंबहुना त्यांच्यापुढे पर्याय नसतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मोठ्या भावाची देशभर असलेली ताकद आणि जनतेच्या मनात असलेला त्यांचा विश्वगुरू नेता हे होय. साहजिकच विधानसभेमध्ये जास्त जागांवर डोळा ठेवून लोकसभेच्या जास्तीच्या जागा मोठ्या भावाला देण्यास लहान पक्ष राजी होत असतात, तरीपण आपल्या नेत्यांसाठी प्रयत्न केले जातात. एकेका जागेसाठी युक्तिवाद केले जातात. अशावेळी बरेचदा मोठा भाऊ 'उमेदवार तुमचा पण चिन्ह आमचे'अशीही अट घालत असतो.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की, आमच्याच चिन्हावर लढावे हा आग्रह कशामुळे असेल? साधे सोपे आहे. जो ज्या चिन्हावर लढलेला आहे, त्याला निवडून आल्यास तो पक्ष सोडणे पक्षांतर बंदी कायद्यामुळे अशक्य असते. छोट्या पक्षांच्या दहा-बारा जागा निवडून आल्या, तर कदाचित पुढील लोकसभेसाठी बहुमत मिळाले नाही, तर बर्याच तडजोडी करायला लागतात. आपले मूल्य ओळखून छोटे पक्ष अशा वेळेला भरपूर वाटाघाटी करून जास्तीत जास्त दान आपल्या पदरात कसे पडेल, यासाठी प्रयत्न करत असतात.