संपादकीय

Maharashtra HSC Board Exam 2024 : ज्ञानलालसेची भरारी

Arun Patil

शिक्षण घेण्याची तळमळ एकूणच भारतीय आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात खूपच मोठ्या प्रमाणावर आहे, याचे प्रत्यंतर कॉपीमुक्त अभियान राबवताना समोर आले आहे. भराभर पुढच्या वर्गाच्या पायर्‍या चढून शिक्षण घेत, शैक्षणिक गुणवत्तेच्या कळसावर जाण्याची जी जिद्द राज्यामध्ये दिसून आली आहे, त्याला तोड नाही. एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा त्याला पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य होत नाही. नुकत्याच बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC Board Exam 2024) सुरू असताना अकोला तालुक्यातील पातूर येथे बहिणीला पुढील शिक्षणासाठी मदत करणारा एक तेजस्वी भाऊ आढळून आला आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी शासनाने 271 भरारी पथके नेमली आहेत. कॉपी आणि तत्सम गैरव्यवहार रोखण्यासाठी आकस्मिक भेटी देण्याचे आदेश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वर्ग एकच्या अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. प्रत्येक सेंटरवर भरपूर बंदोबस्त आणि सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याला भेदून आपल्या बहिणीला कॉप्या पुरवण्याची नवी शक्कल लढवणारा एक भाऊही समोर आला आहे.

या भाऊरायाने चक्क भाड्याने आणलेला पोलिसाचा गणवेश घालून बहिणीच्या परीक्षा वर्गात प्रवेश केला आणि तिला खिशातून काढून आवश्यक त्या कॉप्या सुपूर्द केल्या. नेमके त्याच वेळी पोलिस निरीक्षक तिथे पाहणी करण्यासाठी आले आणि नेमका सदर भाऊ त्यांना सामोरा आला. त्याने त्यांना सॅल्यूटही केला. त्याच्या सॅल्यूट करण्याच्या पद्धतीवरून पोलिस निरीक्षक महोदयांना शंका आली; कारण 'योगीयाच्या खुणा योगीच जाणे.' शिवाय त्याच्या छातीवर लावलेल्या नेमप्लेटवर जे नाव होते, जे त्यांच्या पथकात कुणाचेही नव्हते. आपल्या राज्यातील पोलिस किती सतर्क आहेत, याचा हा पुरावाच समजला पाहिजे. (Maharashtra HSC Board Exam 2024)

इन्स्पेक्टर महोदयांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता आपण तोतया पोलिस असल्याचे आणि बहिणीला कॉपी देण्यासाठी ही युक्ती केल्याचे त्याने सांगितले. आपली बहीण परीक्षा देत असेल तर जोखीम पत्करून तिला मदत करणारा भाऊ हा बहीण-भावाच्या प्रेमाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. भाऊबीजेला बहिणीने केलेल्या ओवाळणीला आणि राखीपौर्णिमेला बांधलेल्या राखीला जागणारा इतका कर्तव्यतत्पर भाऊ तुम्हाला कुठे भेटला, तर आम्हाला जरूर सांगा. बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि बहिणीच्या प्रगतीसाठी झटणार्‍या भावाचे उदाहरण म्हणून या प्रसंगाची इतिहासात नोंद झाली पाहिजे.

कॉपी पुरवणे हे येरागबाळ्याचे काम नाही. सर्वात आधी पहिल्या अर्ध्या तासात एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका घेऊन बाहेर येण्यासाठी नेमावे लागते. त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर कुठले प्रश्न आले आहेत, हे तत्काळ शोधून त्याची उत्तरे मायक्रो झेरॉक्समध्ये प्रिंट करावी लागतात. या कामाला अर्धा तास लागत असेल, तोपर्यंत परीक्षेचा एक तासाचा कालावधी संपलेला असतो. पुढील पायरी म्हणजे ती मायक्रो झेरॉक्स असलेली कागदाची पुंगळी किंवा घडी घेऊन त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हे एव्हरेस्ट नव्हे, तरी किमान कळसूबाईचे शिखर गाठण्याइतके अवघड नक्कीच आहे.

SCROLL FOR NEXT