संपादकीय

कर्तव्यतत्पर जावई..!

Arun Patil

जावई आणि सासुरवाडी यांचे संबंध अतिशय मनोरंजक असे असतात. बहुतांश जावयांना आपल्या वडिलांबद्दल आदर नसेल, इतका प्रचंड आदर आपल्या सासर्‍याबद्दल असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सासरा जेवढा मान जावयाला देतो, तेवढा जगात दुसरे कोणीही देत नाही. शिवाय लाडाकोडाने वाढवलेली कन्या सासर्‍याने जावयाच्या गळ्यात बांधलेली असते, त्यामुळे सन्माननीय धाडसी अपवाद वगळता सर्वत्र जावई आणि सासरे यांचे संबंध मधुर असेच असतात. आता तुम्ही म्हणाल, हे काय आज जावई आणि सासर्‍यांचे काढले आहे? सांगतो. आपल्या भारतातील मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आहेत हे आपणा सर्वांना विदीत आहे. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक हे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत.

जावयाने सासर्‍याच्या कंपनीसाठी इंग्लंडमध्ये पायघड्या अंथरल्या आहेत, अशी चर्चा इंग्लंडमध्ये सुरू आहे. साहजिकच आमच्या मनात विचार आला की, जावई आणि सासरे यांच्या संबंधाचा आढावा घेतला पाहिजे. जावयाचा आणि सासुरवाडीचा पहिला संबंध येतो, तो मांडव परतणीच्या वेळेला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत नववधूला सोबत घेऊन जावई सासुरवाडीला पहिले अधिकृत पाऊल टाकतो. या वेळेला जावयाचे दणक्यात स्वागत केले जाते. जावई घरी पोहोचताच त्यांना हात-पाय धुण्यासाठी गरम पाणी दिले जाते. कालांतराने या पाण्याचे तापमान कमी होत-होत लग्नाला तीन-चार वर्षे झाली की, ते थंडगार झालेले असते. इथून सुरू झालेला सासुरवाडी नावाचा अध्याय त्या जावयाचा आयुष्यभर पिच्छा सोडत नाही.

श्रीमान ऋषी सुनाक यांचे असेच काहीसे झाले असावे, असे वाटते. इन्फोसिसचा विस्तार इंग्लंडमध्ये व्हावा यासाठी त्या देशाचे व्यापारमंत्री भारतामध्ये येऊन गेले, त्यांनी इन्फोसिसबरोबर चर्चा केली आणि त्यांना इंग्लंडला येऊन व्यवसाय करण्याचे आवातन दिले. इंग्लंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होऊ घातल्या आहेत. सुनाक यांनी सासर्‍याच्या कंपनीला आवातन दिले या बातमीचे मूल्य ओळखून इंग्लंडमधील पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. साहजिकच सुनाक इन्फोसिसचे आणि भारताचे जावई असल्याचा मुद्दा त्या देशामध्ये उगळला जाईल, हे नक्की.

आपल्या देशामध्ये हा प्रकार नियमित घडणारा आहे. मोठा राजकीय नेता असेल तर त्याची मुले, मुली, मेहुणे आणि जावई हे सर्वजण त्या मोठ्या राजकीय नेत्याचे वारसदार असतातच, पण त्याचबरोबर त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये सर्रास ढवळाढवळ करत असतात. अगदी उदाहरणच घ्यायचे तर आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी चक्क सासर्‍याला पदावरून ढकलून त्यांच्या पक्षावर ताबा मिळवला आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाल्याचे आपण पाहिले आहे. अशीच उदाहरणे आमदार, खासदार आणि स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांच्या घरांमध्ये पाहायला मिळतील. कधीकाळी जावई हा दशमग्रह समजला जात असे. दशमग्रह याचा अर्थ नवीन पिढीला कळणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT