महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. आपल्या शहराच्या समस्या दूर करण्यासाठी कितीतरी लोकांना केवढी मोठी तळमळ लागलेली आहे, हे पाहताय ना तुम्ही? पालिका निवडणुकीसाठी कसे डावपेच खेळले जात आहेत आणि यश मिळवण्यासाठी कशी झुंज दिली जात आहे, याकडे लक्ष ठेवा. ही सारी भावी नगरसेवक मंडळी केवळ तुमची सेवा करता यावी, यासाठी हा सगळा आटापिटा करीत आहेत. किती बरे हा समाजसेवेचा ध्यास? ज्या गावात एवढ्या मोठ्या संख्येने समाजासाठी तळमळ असणारे कार्यकर्ते आहेत, ते आमचे गाव लवकरच नंदनवन झालेले दिसेल, यात शंका नाही.
केवळ त्यांना निवडून द्या आणि मग चमत्कार पाहा! रस्ते घोड्याच्या कातडीसारखे तुकतुकीत दिसायला लागतील. गटारे झुळझुळ वाहणार्या झर्यासारखी दिसतील. पिण्याचे पाणी बिसलेरीच्या तोंडात मारणारे असेल आणि ते दोन वेळा नळाला येईल. किमान एक वेळा तरी नक्की येईल. गटारे रोज साफ केली जातील आणि कचरा रोज उचलला जाईल. कपटाचा तुकडासुद्धा कुठे दिसणार नाही. स्वच्छतेमुळे तुम्हाला आपल्याच गावात सिंगापूरचा भास होईल. तुम्ही केवळ त्याला निवडून द्या आणि मग पाहा. कर्मचारी नम्रतेने बोलताना दिसतील, खांबावरचा ट्यूब गेला आहे, असे तुम्ही कळवले की, त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो बदललेला असेल. अंधार नष्ट होऊन सगळीकडे उजेडाचे साम्राज्य दिसेल. निवडून आलेला वॉर्ड मेंबर तुमच्या घरी येऊन नम्रपणे तुम्हाला आपल्या काही समस्या आहेत का महोदय, असे विचारतील. काय म्हणताय? रोज दर्शन देणारे, निवडून आल्यानंतर अद़ृश्य होतात? नाही हो नाही. इतका नकारात्मक विचार करणे योग्य नाही. त्यांची ही सारी धडपड तुमची सेवा करण्यास मिळावी, यासाठी आहे.
समाजसेवेची जी प्रदीर्घ परंपरा या देशाला लाभली आहे. तिचे हे पाईक आहेत आणि तुमच्या सेवेसाठी ते कटिबद्ध आहेत, हे समजून घ्या. सेवा हे त्यांचे ध्येय आहे मेवा नव्हे. तुमची सेवा करून त्यांना आपले नगर स्वच्छ आणि सुंदर करायचे आहे. असे गावोगाव घडून लवकरच पूर्ण राज्य आणि देश सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. थोडा सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवा मित्रांनो, तुमचा स्वभाव भारीच शंकेखोर आहे आणि त्याला आमचा अगदीच नाईलाज आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडून देता. मग, तो गावातील ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदेपर्यंत असो! लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची त्यांची जबाबदारी असते. लोकसंख्येच्या आधारावर शहरांना नगरपरिषदा आणि पालिका बहाल करण्यात आल्या आहेत.
शहराची वार्डनिहाय विभागणी केलेली असते. वार्डातून नगरसेवक निवडून दिल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्यासह अनेक समस्यांची सोडवणूक करणे ही प्रत्येक नगरसेवकाची जबाबदारी असते; पण बर्याच वेळा निवडून आल्यानंतर नगरसेवक नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा करताना दिसत असतात; पण नागरिकांनीही त्यांना जाब विचारून समस्यांचे निराकरण करावयाचे असते. केवळ नकारात्मक विचार करून हे असे चालायचे, हे काही सुजाण नागरिकांचे लक्षण नाही. प्रत्येक नागरिकाने सकारात्मक विचार करून आपल्या समस्यांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.