संपादकीय

तडका : गॅरंटीची वॉरंटी

Arun Patil

मी काय म्हणतो शिंदेसाहेब, सगळ्यात हुशार तुम्ही निघालात. हुशार म्हणजे ममता दीदींपेक्षा पाचपट आणि नितीशकुमारपेक्षा दहापट हुशार तुम्ही आहात.

दादा असं कोड्यात बोलू नका. एवढा हुशार तर मला आमच्या पार्टीचे लोकपण कधी म्हणाले नाहीत. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला.
महाशक्तीबरोबर जावे लागणार आहे, त्याशिवाय चार सीट आपण निवडून आणणे शक्य नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखणारे तुम्हीच निघालात. तुमच्या पद्धतीने सांगायचे तर महाशक्तीसोबत राहून आपली प्रगती करून घेण्याची आयडिया सर्वात प्रथम जगात जर कोणाला कळली असेल, तर ती तुम्हाला कळाली.

रामनामाचा महिमा आहे दादा. प्रभू श्रीराम ज्याला प्रसन्न झाले त्याला जनता जनार्दन आशीर्वाद देणार आहे, हे मात्र मी नक्की आधी ओळखले होते. कित्येक वर्षे पनोती असणार्‍या पक्षाबरोबर जाऊन आपली वाताहात होणार, हेपण मी आधीच ओळखले होते. हेच मी आमच्या सेनापतीला सांगत होतो. सेनापतीलापण ते कळायचे व पण वळायचे नाही. सोबत ठेवलेल्या त्यांच्या उच्छाद मांडणार्‍या कार्यकर्त्यांमुळे तो ऐकायला तयार नव्हता आणि त्याने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. पण दादा, तुम्ही तसे हुशार आहात. महाशक्तीबरोबर जाण्यासाठी तुम्हाला इतका वेळ का लागला?

शिंदेसाहेब, मी आणि पक्षातले नव्वद टक्के लोक महाशक्तीबरोबर चला, असे आमच्या काका साहेबांना सांगत होतो. काकांचं जसं वय होत चाललंय तसं ते हट्टी होत चालले आहेत. कधी म्हणायचे जाऊया. आम्ही तयारीला लागलो की दुसर्‍या दिवशी म्हणायचे, नाही जायचे. आता बाप- लेक बसले आहेत हातावर हात ठेवून. सर्वोच्चस्थानी बसलेले प्रभू श्रीरामाचे भक्त आणि त्यांचे मित्र काका साहेबांना खूप मान द्यायचे. आमच्यासोबत या म्हणायचे. पण उतारवयात काका साहेबांची बुद्धी नको तशी चालली आणि त्यांनी महाशक्तीबरोबर जाण्यास नकार दिला. मग माझा नाइलाज झाला आणि मी आपले सरदार, दरकदार यांना घेऊन बाहेर पडलो. बाहेर पडलो म्हणण्यापेक्षा मी तिथेच राहिलो आणि आदरणीय काकासाहेब, त्यांची कन्या आणि दोन सरदार यांना बाजूला काढून संपूर्ण सैन्यच ताब्यात घेतले.

म्हणजे दादा, तुम्हीपण हुशार आहात; पण परिस्थितीने तुम्हाला जखडून ठेवले होते. मीही बराच प्रयत्न केला होता. शेवटी नाइलाजाने बाहेर पडलो. सगळ्यात पहिल्यांदा भविष्यात काय होणार आहे याचा ज्याला अंदाज आला तो खरा राजकीय हुशार माणूस राम जन्मभूमी सोहळा झाल्यानंतर देशात केवळ एकच हवा आहे आणि ती म्हणजे मोदी की गॅरंटी. मोदीजींची गॅरंटी आपल्याला मिळाली म्हणजे लोकांनाही आपली गॅरंटी मिळते. मोठ्या जहाजाबरोबर आपले छोटेसे होडके हळूहळू चालवत न्यायचे. लाटांचा आणि वादळाचा त्रास होत नाही आणि प्रवास सुखावह होत जातो. राजकारणाची नैय्या पार करण्याचा एकमेव मूलभूत मंत्र म्हणजे 'जय श्रीराम' आणि 'मोदी है तो मुमकीन है.' ज्यांना हे समजले त्यांनी निर्णय घेतले जसे की, तुम्ही आणि मी. ज्यांना हे समजले नाही त्यांना आता उर्वरित आयुष्यभर संघर्ष करणे भाग आहे कारण कोणी कितीही म्हटले मोदींची गॅरंटी आणि मोदीजी आले म्हणजे वॉरंटी म्हणून आपण आलोच. नितीशकुमारनापण हे समजले; पण उशीरच केला त्यांनी. बराय, या आता.

SCROLL FOR NEXT