मित्रा, आजकाल समाजामध्ये जे प्रकार घडत आहेत ते पाहून मला कुटुंबसंस्थेची फारच काळजी लागून राहिली आहे. म्हणजे बघ, आजूबाजूला थोडी नजर टाकली तर तरुण मुला-मुलींचे लग्न झाल्यानंतर अवघ्या एक किंवा दोन वर्षात घटस्फोट होत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे, मलातरी समजत नाही?
अरे साधी गोष्ट आहे. आजकाल कुणाला कुणाचेच कंट्रोल नको असते. शिवाय आजकाल मुलीपण स्वतःच्या पायावर उभ्या असतात. त्यामुळे पटलं तर ठीक; नाहीतर दे सोडून, हा प्रकार सर्रास चालू आहे. पण तुला आणखी एक माहिती सांगतो की, आपल्या समाजात आजकाल ज्येष्ठ लोकांचेपण घटस्फोट होत आहेत. म्हणजे अगदी तीस वर्षे संसार झालेल्या व 60 वर्षे वय असलेल्या जोडप्यांमध्येपण घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
अरे, इतकी वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोट घ्यायचा म्हणजे काय अर्थ आहे? मला आश्चर्य वाटतं की, हे नेमकं काय प्रकरण आहे?
अरे बाबा, समजायला अत्यंत सोपे आहे. पूर्वीच्या काळी लग्न झाले की, यथावकाश मुले मुली होत. जोडप्यांचे पटत नव्हते तरी संसार होत असत. आताच्यासारखे नव्हते. मुला-मुलींची जबाबदारी म्हणून म्हणा किंवा समाजाचा दबाव म्हणून म्हणा, पण लग्ने टिकत असत. अशी टिकवलेली लग्ने कालांतराने मोडण्याची शक्यता असते. म्हणजे बघ, एका सर्व्हेमध्ये असेच दिसून आले आहे की, ज्या आई-बापांचे पटत नाही त्यांची मुलेच त्यांना उतारवयात एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. त्या मुलांनी आई- बापाचे भांडण आयुष्यभर पाहिलेले असते. ज्यांचे एकही मिनीट जमत नाही त्यांनी तीस तीस वर्षे कसेबसे जमवून घेतलेले असते आणि संसार पार पाडलेला असतो. मग संसारातून निवांत झाल्यानंतर म्हणजे सगळ्या जबाबदार्या संपल्यानंतर भांडणे सुरू राहत असतील, तर मग कशाला एकत्र राहायचे? असा विचार करून उतारवयातपण पती-पत्नी एकमेकांपासून दूर जात आहेत आणि घटस्फोटाचे प्रमाण कसे वाढत आहे.
हे बघ, मला काही हे पटत नाही. माझ्या आई- वडिलांच्या लग्नाला आता तब्बल 35 वर्षे झाली आहेत. कसा का होईना, रडत पडत किंवा भांडत भांडत त्यांनी संसार केलाच ना? मग आता सगळ्या जबाबदार्या संपल्यानंतर एकमेकांपासून दूर होऊन काय मिळणार आहे? आणि या वयामध्ये कोण सोबती मिळणार आहे?
अरे तसे नाही. नको ते रोजचे भांडण, असा विचार करून स्वतंत्र राहून वृद्धाश्रमात उरलेले आयुष्य सुखात काढणारे लोकपण आहेत. शिवाय आजकाल पती-पत्नी दोघे कमावते असण्याची तिसरी पिढी चालू आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत कोणी कोणावर अवलंबून नाही आणि शिवाय समजा, तशी काही तरतूद नसेल तर आर्थिक भार उचलायला त्यांची मुलेबाळे समर्थ आहेत. कुठेही राहा पण सुखाने राहा, असे म्हणून मुले-मुलीच आई-बापांना वेगवेगळे ठेवून त्यांचे उरलेले आयुष्य सुखकर करत आहेत, असे नाही का म्हणता येणार?
अरे मित्रा, म्हणायला काय, काहीपण म्हणता येईल. पण इतका दीर्घ झालेला संसार आणि तीस तीस वर्षे जर तुमचे जमत नसेल तर मग मुळातच काहीतरी खोट होती. तरीही तुम्ही संसार केला. मग आता आयुष्याची उरलीतच किती वर्ष? मला असे वाटते की, तेवढी तरी एकमेकांबरोबर सुखाने घालवली पाहिजेत, नाहीतर मग या देशातील कुटुंबसंस्थेला काहीच अर्थ राहणार नाही.