संपादकीय

लवंगी मिरची : तुफान कॉमेडी सर्कस!

Arun Patil

एकंदरीत सर्वसामान्य परिस्थिती पाहिली, तर महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये होणार्‍या निवडणुकांचे वारे आताच वाहायला सुरुवात झाली आहे, असे लक्षात येते. मी काय म्हणतो मित्रा, मला सगळ्यात जास्त कमाल वाटते ती तेलंगणाच्या मुख्यमंत्री यांची. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कुठेही जा, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेले दिसतात, म्हणजे, ते चंद्रशेखर राव हे गृहस्थ डोक्याला मुंडासे बांधताना दिसतात. बाजूला त्यांचे निवडणूक चिन्ह असते आणि शेतकर्‍यांचे सरकार येणार, अशी ग्वाही देऊन ते महाराष्ट्रातील जनतेची साथ मागत आहेत.

खरं सांगायचं तर, महाराष्ट्रातील जनता राजकारणाला उबगली आहे, त्यात पुन्हा हा आपला तेलगू देशबांधव नेमके काय करू इच्छित आहे, ते कळायला मार्ग नाही. म्हणजे, बहुतेक येथील राजकारण्यांना कंटाळलेले मराठी लोक आपल्याला मतदान करतील, अशी त्यांना पुरेपूर अपेक्षा आहे. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा ठेवायला हरकत नाही; पण मला इथे असे वाटते की, महाराष्ट्रातील लोकांना खूपच गृहीत धरले जात आहे. मान्य आहे की, काही प्रमाणात लोक येथील नेतृत्वाला कंटाळले असतील, पण त्याचा सूड म्हणून ते तेलंगणातील पक्षाला मतदान करतील, असे अजिबात वाटत नाही.

कसे आहे ना की, त्यांनी त्यांचे तेलंगणा राज्य बर्‍यापैकी चालवलेले आहे. मग त्यांना असे वाटत असेल की, त्या कामाच्या जोरावर आपण महाराष्ट्राचा तेलंगणा करून दाखवू; पण ते सहज शक्य होईल, असे मला तरी वाटत नाही.

मी काय म्हणतो की, त्यांना तरी कशाला दोष द्यायचा? इथे भरपूर भक्कम संख्याबळ असलेले ट्रिपल इंजिन सरकार चालू असताना पंधरा दिवसांत मुख्यमंत्री बदलणार, महिनाभरात नवीन सरकार येणार अशा प्रकारची विधाने करणार्‍यांची आणि चमत्कारिक ज्योतिष सांगणार्‍यांची इथेही काही कमी नाही. त्यात काही महाभाग तर मुख्यमंत्री जाण्याची तारीख पण सांगत आहेत. कमाल आहे की नाही? ज्याच्या स्वतःच्या पक्षाचे तीनतेरा वाजले आहेत, तो पण हे सरकार पडणार असे छातीठोकपणे सांगत असतो. अरे भाऊ, आधी तुझ्या पक्षाचे तू बघ ना? मग कर लोकांच्या पक्षांचा कारभार.

एकंदरीत महाराष्ट्रात तुफान कॉमेडी सर्कस दररोज सुरू असते. आपल्याला काय करायचे? आपण आपले मनोरंजन करून घ्यावे.
मनोरंजन खूप जास्त झाले, तर त्याचे पण अजीर्ण होते, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. एक कॉमेडी शो संपला की, दुसरा सुरू होतो, दुसरा संपला की तिसरा सुरू होतो आणि एवढ्यात अधून मधून काही अद्भूत मुलाखती होतात. हे सर्व चालू असताना मध्येच महाराष्ट्रमध्ये 'द ग्रेट तेलंगणा' शो असतो. साऊथमधील चित्रपटांसारख्या दोनशे, तीनशे गाड्या घेऊन चंद्रशेखर राव कधी पंढरपुरात, तर कधी सांगलीत अचानक अवतीर्ण होतात.

जाऊ दे फार विचार करू नकोस. तू आपली ही कर नसलेली करमणूक गोड करून घेत जा.
राजकीय पटलावर सध्या सुरू असलेली कॉमेडी सर्कस सर्वसामान्यांना फटका बसून नये एवढी अपेक्षा करूया!
राजकीय लोकांकडे सर्वसामान्य नागरिक आशेने पाहत असतात याच लोकांनी राजकारणाची कॉमेडी सर्कस केल्यास लोकांनी कोणाकडे आधार म्हणून पाहावे हा प्रश्नच आहे. जनतेला या लोकांचा अक्षरक्षः वीट आला आहे. त्यामुळे काय चाललाय हा खेळ, असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT