संपादकीय

लवंगी मिरची : नवे तंत्रज्ञान, नवे शोध

Arun Patil

'चांद्रयान-3' आणि लँडर चंद्रावर सुरक्षित पोहोचले म्हणून आपण भारतीय लोकांनी खूप आनंद व्यक्त केला. मान्य आहे की, जगभराचे डोळे दिपविणारी ही कामगिरी आहे. पण तसे पाहता, अजून बरेच शोध लागायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की, आता चंद्रावर पाऊल ठेवले ना? आता अजून काय पाहिजे? सामान्य विवाहित माणसाला असंख्य अडचणी असतात आणि त्यावर जर कोणी उपाय सांगितला, तर आणि तरच तो भारावून जात असतो. दिवसभरच्या कामानंतर आपण घरी पोहोचतो तेव्हा आपल्या बायकोचा मूड कसा असेल, हे दर्शवणारे कोणतेही यंत्र अजूनतरी शोधण्यात आलेले नाही.

आपण आपल्याच घराच्या दारावरची बेल वाजवण्यापूर्वी त्याच्या बाजूलाच बायकोच्या रागाचा किंवा आनंदाचा पारा किती खाली किंवा किती वर आहे हे दर्शवणारे कोणते यंत्र आले, तर सामान्य माणसाचे जगणे सोपे होईल. दैनंदिन जीवनात होते असे की, आपण चांगल्या मूडमध्ये घरी पोहोचतो त्या वेळेला नेमका बायकोचा मूड बिघडलेला असतो. अशा वेळी आपण नेमके कसे वागले पाहिजे, याचा अंदाज घेण्यासाठीचे हे यंत्र फार महत्त्वाचे आहे कारण गृहिणीचा मूड खराब असेल तर चूल किंवा गॅस नावाचे यंत्र आपोआप थंडगार पडते, याची जाणीव आपल्याला असते. त्यामुळे अशा प्रकारचे पत्नीचा मूड दर्शविणारे काही यंत्र निर्माण करता आले तर त्याचापण शोध लागला पाहिजे.

सर्वसाधारण मराठी माणूस हा चाकरमानी असतो, म्हणजे तो कुठे ना कुठेतरी नोकरी करत असतो. अशा वेळेला त्याच्या आयुष्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे दोन घटक असतात. एक म्हणजे घरी पत्नी आणि दुसरे म्हणजे कार्यालयातील साहेब. तर हे जे मूड दर्शवणारे यंत्र आहे, ते प्रत्येक ऑफिसच्या बाहेर लावले पाहिजे. प्रत्येक ऑफिसात ज्याला नेहमीच्या भाषेमध्ये आपण साहेब किंवा बॉस म्हणतो, तो असतो. असे मूडदर्शक यंत्र कार्यालयामध्ये प्रवेश करतानाच प्रत्येक कर्मचार्‍याला दिसेल असे लावले पाहिजे. त्यामुळे आज साहेबांचा मूड कसा आहे, याची पूर्ण कल्पना येईल आणि त्याप्रमाणे आपल्या दिवसभराच्या वागणुकीमध्ये तो बदल करू शकेल.

म्हणजे माणसांच्या, विशेषत: मराठी विवाहित पुरुषांच्या द़ृष्टीने घर आणि कार्यालय हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. या दोन्ही ठिकाणी जर शांतता नांदली तरच त्याच्या जीवाला आराम आणि आयुष्यात समाधान मिळू शकते. त्यामुळे चांद्रयानसारखे शोध लावणे महत्त्वाचे आहेत; पण त्याचबरोबर अशा प्रकारचे घरगुती उपयुक्त असे शोध शास्त्रज्ञांनी तत्काळ लावले पाहिजेत. अशा प्रकारचे शोध लावल्यास मराठी माणूस फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल, यात शंका नाही. बायकोच्या रागावर आतापर्यंत काहीच शोध लागलेला नाही. तुम्ही किती शिकलेले असाल; मात्र बायकोसमोर तुमची अवस्था 'तुम किस झाड की पत्ती' अशी आहे. तुम्हाला घरातील काय कळतेय, तुम्ही जरा गप्प बसा, घरची जबाबदारी ही बायकांवरच असते, ही नेहमीच वाक्ये नवरोबाच्या कानावर पडत असतात. त्यामुळे किती चांद्रमोहिमा यशस्वी करा, किती नवे शोध लावा, बायकोच्या स्वभावावर औषध मिळणे फारच कठीण आहे, बुवा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT