संपादकीय

लवंगी मिरची : कळत-नकळत..!

Arun Patil

अवदसा आठवणे म्हणजे नको ते करण्याची बुद्धी होणे, आणि त्याप्रमाणे उर्वरित आयुष्यात कार्यरत राहणे, असा काहीसा प्रकार असतो. आपण आपल्या राज्यापुरते पाहिले तर आयुष्य घडलेले असंख्य लोक आज राजकारणामध्ये दिसून येतात. अनेक जण कळत-नकळत राजकारणात आल्याचे दिसून येते, तर काहींना राजकारणातच करिअर करायचे असते. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातून निर्माण झालेले राजकारणी सध्या देशात कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यांना फार काही मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे पदार्पणातच कोणत्याही प्रकारची खुर्ची अगदी सहजपणे मिळते आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू होतो.

ग्रामीण भागातील प्रत्येक युवकाला आधी पंच, नंतर सरपंच, नंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पायर्‍या चढता चढता पुढे आमदारकी, मंत्रिपद आणि सर्वात उंचावरचे शिखर म्हणजे मुख्यमंत्रीपद पाहिजेच असते. त्या द़ृष्टीने विशी-बाविशीतील कार्यकर्तेसुद्धा आपापल्या एरियामध्ये मोठे मोठे बॅनर लावून आपल्या नेतृत्वाची घोषणा करत असतात. हा युवा कार्यकर्ता जर मोठा झाला, तर त्याच्याभोवती कुणाची टोळी असणार आहे, हे त्या बॅनरवरून सहज ओळखू येते. महाराष्ट्रातील युवक राजकारणात उत्साहाने भाग घेत असतात. काही नाइलाजाने आलेले असतात, तर काही आणले गेलेले असतात.

उदाहरण पाहायला गेले तर स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी हे पायलट होते आणि त्यांना विमान उडवायची आवड होती. त्यांच्या मातोश्री या देशातील सर्वोच्च बलशाली नेत्या होत्या आणि त्यांना साहजिकच आपल्या मुलाला राजकारणात आणावे, असे वाटले. राजीव गांधीही नाइलाजाने, पण आपल्या आईची इच्छा राखण्यासाठी राजकारणात आले होते.

फोटोग्राफीची आवड असणारे एक नेते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूश होते. शक्तिशाली अशा त्यांच्या वडिलांना आपल्या चिरंजीवाने राजकारणात यावे, असे वाटले आणि ते चक्क राजकारणात आले. दादांच्याबद्दल बोलायचे तर एक बलाढ्य नेता त्यांच्या घरात काकाच्या रूपात उभा होता. साहजिकच काकांना पुतणे कितीही असले तरी एखाद्या पुतण्यावर लोभ जास्त असतो. सुरुवातीला काकांना मदत करायची म्हणून, नंतर काकांची निवडणूक यंत्रणा राबवायची म्हणून, काकांचे कार्यकर्ते सांभाळायचे म्हणून पुतण्याला कार्यरत व्हावे लागत असते.

राजकारणात यावे अशी काही प्रत्येकाची इच्छा नसते. बरेच जण कळत-नकळत राजकारणाच्या मैदानावर ओढले जातात आणि एकदा तुम्ही मैदानात उतरलात की, तुम्हाला खेळावेच लागते. खेळ म्हटले की, डावपेच आले; हार-जीत आली, कुरघोड्या आल्या. मग ते क्रिकेटचे मैदान असो की, राजकारणाचे मैदान असो. शेतीमध्ये रमणारे असंख्य नेते महाराष्ट्रमध्ये आहेत. स्वतः मुख्यमंत्री वेळ मिळेल तसे आपल्या गावी शेतावर जाऊन काम करत असतात. आपला भारत देश कृषिप्रधान आहे आणि त्यात विशेषतः मराठी माणूस आपल्या काळ्या आईवर म्हणजे मातीवर खूप प्रेम करत असतो. तो त्याच्या व्यवसायाचा भाग नसतो, तर त्याच्या हृदयातील जाणिवांचा विषय असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT