संपादकीय

लवंगी मिरची : काय सापडले का?

Arun Patil

चकित करणार्‍या वेगाने पोलिस तपास आजकाल कुठेही झाला तर त्याची बातमी वृत्तपत्रामध्ये छापून येते. एरव्ही एखादी घरफोडीची बातमी आली तर आपण केवळ एवढेच पाहतो की, कितीचा मुद्देमाल गेलेला आहे? कारण नंतर चोर सापडतात. परंतु मुद्देमाल सापडत नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्यात एका जिल्ह्यात झालेल्या घरफोडीचा तपास पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत पूर्ण करून मुद्देमालासह आरोपी पकडले या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनीही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्परतेचे आणि वेगाने तपास करण्याचे कौतुक केले आहे. खरं तर कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे चोरी झाली आणि चोरट्याने काही मुद्देमाल गायब केला तर तो परत मिळण्याची अपेक्षा घरमालकानेही ठेवलेली नसते.

बर्‍याचदा पोलिसांमध्ये तक्रारही दिली जात नाही. कारण पुढे काही होणार नाही हे प्रत्येकाने मनाशी गृहीत धरलेले असते. पोलिसांची इमेज अशा पद्धतीने आधीच खूप खराब होऊन बसलेली आहे. कोणत्याही चित्रपटामध्ये पोलिस सगळी मारामारी संपल्यानंतर जेव्हा खलनायकाच्या हातात बेड्या घालण्याची वेळ येते तेव्हाच उपस्थित होतात. तोवर पोलिस कुठे गेलेले असतात हे कोणालाही कळत नाही. द. मा. मिरासदारांच्या 'माझ्या घरची चोरी' या कथेमध्ये एक अतिशय विनोदी प्रसंग आहे. म्हणजे होते असे की, चोरी होते. पोलिस येऊन चोरीच्या जागेला भेट देतात. त्यानंतर साधारणतः दोन महिन्यानंतर ज्यांच्याकडे चोरीचा तपास आहे ते तपास करणारे इन्स्पेक्टर आणि ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे ते घरमालक एकमेकांना बाजारात भेटतात. पोलिस अधिकारी ज्याच्या घरी चोरी झाली आहे त्याला विचारतात, काय सापडले का चोर? मिरासदार यांनी असे लिहिले की, जो प्रश्न मी त्यांना विचारायचा तोच प्रश्न ते मला विचारत होते. म्हणजे बहुतांश वेळेला पोलिस तपासाची अशीच गंमत असते.

बाकी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना एरव्ही पोलिस चौकाचौकामध्ये म्हणजे ट्रॅफिक हवालदार रूपात भेटतो. ट्रॅफिक हवालदार ही पोलिसांमध्ये एक विशेष शाखा आहे आणि या शाखेमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण बोलणे, वागणे असते. एखाद्या चौकात ट्रॅफिक हवालदार उभा असेल आणि तिथून आपण जाणार असू तर आधीच आपण घाबरलेले असतो. म्हणजे लायसन आहे का? कागदपत्रे आहेत का? पीयूसी काढलेले आहे का? काही ना काहीतरी खोड काढून ते तुम्हाला दंड ठोठावू शकतात. त्यामुळे एखाद्या चौकातून जाताना आपल्या चेहर्‍यावर घाबरलेले भाव पोलिस लांबूनच ओळखतात आणि काही बोलण्याआधी 'गाडी बाजूला घ्या', असे म्हणतात. आपण काहीतरी बोलत असतो. आधी गाडी बाजूला घ्या, एवढाच धोशा पोलिसाने लावलेला असतो. एकदा का गाडी बाजूला घेतली की, काहीतरी वाटाघाटी होऊन शांततेचा तोडगा निघू शकतो.

खरे तर तातडीने तपास करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य अविरत बारा महिने होत राहिले पाहिजे. ते असे कधीतरी अचानक झाले की, लक्ष वेधून घेते आणि भविष्यकाळातील पोलिसांच्या कामगिरीकडे अपेक्षेने पाहिले जाते. आपण आपले पोलिसांना शुभेच्छा देऊया की, बाबांनो तत्काळ तपास करा आणि लोकांना त्यांचा मुद्देमाल मिळवून द्या. त्याचबरोबर चोर्‍या होणार नाही त्यासाठीही काहीतरी करा. नाहीतर मग पुन्हा आहेच 'येरे माझ्या मागल्या'. पुन्हा चोरी, पुन्हा घरफोडी, पुन्हा मुद्देमाल, चोरटे पसार, मालक हताश आणि पोलिस निवांत असे न होता तत्काळ चोर्‍यांचे तपास व्हायला पाहिजेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT