संपादकीय

लवंगी मिरची : ऐतिहासिक भेट

Arun Patil

तात्या, काही पण म्हण गड्या, एक ऑगस्टला क्रांती होणार म्हणजे होणार आणि ती पण इकडेतिकडे कुठे नाही, तर पुण्यात होणार. आजपासूनच सगळ्या देशाचे लक्ष पुण्याकडे लागलेले आहे. मला तर असं वाटायला लागलंय की, कधी एक तारीख येते आणि कधी तो भव्य-दिव्य क्षण टीव्हीवर पाहून कृतकृत्य होतो.

रामभाऊ, असे काय आहे एक ऑगस्टला आणि ते पण पुण्यात मला नाही समजले? कोड्यात बोलू नकोस गड्या मित्रा! स्पष्ट सांग काय ते!

डायरेक्ट टू दी पॉईंट सांगतो. एक तारखेला आपल्या देशाचे वर्ल्ड फेमस मोठे साहेब आणि आपले आधारवड थोरले साहेब हे एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात एकत्र येणार आहेत आणि एकाच स्टेजवर बसणार आहेत. ही काही साधीसुधी घटना नाही. रोमांचक क्षण असणार आहेत तो.

हां, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मध्ये एवढे पाणी वाहून गेलेले आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये काय बोलणे होणार? त्यांची बॉडी लँग्वेज कशी असणार? हातात हात मिळवणार की नाही? एकमेकांच्या गळ्यात पडणार की नाही? यावर शेकडो कॅमेरे लक्ष ठेवून असणार आहेत. मीसुद्धा हातात पॉपकॉर्न घेऊन तो सोहळा याची देही याची डोळा संपन्न होताना पाहणार आहे; पण मला एक समजत नाही की, हिमालयाचा आणि सह्याद्रीचा हा ऋणानुबंध किंवा हे काही नवीन नातं नाही. थोरल्या साहेबांच्या गुरूंचा बहुतांश कार्यकाळ दिल्लीत गेला. तेव्हा 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला' असे म्हणत असत. आता इथे मात्र हिमालय थेट सह्याद्रीच्या भेटीला महाराष्ट्रात येत आहे, हे मात्र वेगळे आहे. शिवाय ते पुण्यात होत आहे. यामुळे त्याचे महत्त्व आणखी जास्त आहे. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहरामध्ये टिळकांच्या नावाचा पुरस्कार वर्ल्ड फेमस साहेबाला दिला जाणार आणि तोही मोठ्या साहेबांच्या हाताने, ही मोठीच गोष्ट आहे; पण दरम्यान बरेच पाणी वाहून गेले आहे असे तू म्हणालास ते नेमके काय आहे?

अरे, मागे एकदा मोठे साहेब म्हणाले होते की, मी थोरल्या साहेबांचे बोट धरून राजकारण शिकलो म्हणून! म्हणजे त्यांनी आपल्या गुरूचा मान मोठ्या साहेबांना दिला. त्याला पण आता चार-पाच वर्षे झाली; पण अशात गेल्या दोन महिन्यांत त्यांनी आपल्या गुरूचे घड्याळ बर्‍याच खटपटी करून बंद पाडले. बंद पाडले म्हणण्यापेक्षा त्यांनी थोरल्या साहेबांच्या पुतण्याला अत्यंत प्रेमाने स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि पुतण्याला सांगितलं की, आता पुरे! जा आणि साहेबांच्या घड्याळाचे काटे काढून घेऊन ये. शेवटी भावकीच ती. पुतण्या थेट गेला आणि साहेबांचे लक्ष नाही असं पाहून घड्याळाचे काटे काढून घेतले आणि ते काटे थेट दिल्लीला जाऊन वर्ल्ड फेमस साहेबांच्या पायाशी ठेवून दिले. आता झाले असे की, काटे पुतण्याकडे आणि उरलेले घड्याळ थोरल्या साहेबांकडे आहे.

घड्याळ चालू आहे का नाही, हे कळायला मार्ग नाही. काट्याच्या मागे मशिन आहे का नाही, ते कळायला मार्ग नाही; पण एकंदरीत एक नक्की झालं की, घड्याळाचे दोन तुकडे झाले. एवढं सगळं पाणी वाहून गेल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले हे दोन मोठे लोक एकमेकांशी कसे वागतात, कसे बोलतात याची उत्सुकता असणारच आहे. ते तर आहेच रे; पण त्याच कार्यक्रमाला ट्रिपल इंजिनचे तीनही इंजिन हजर राहतील त्याचं काय? त्या तीन इंजिनांपैकी एक इंजिन म्हणजे साहेबाचा पुतण्या, ज्याने घड्याळाचे काटे काढून नेले तो असणार आहे. हो, साहजिकच आहे. मोठे साहेब महाराष्ट्रात येणार म्हणून तिन्ही इंजिन या कार्यक्रमाला असणार. कारण, या तिन्ही इंजिनांमध्ये इंधन टाकायचं काम मोठे साहेब करतात. त्यामुळे त्यांना येणे भागच आहे. मला तर आतापासून उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT