मित्रा, आपला देश झपाट्याने प्रगती करत असताना आपला शेजारी पाकिस्तानची मात्र तेवढ्याच झपाट्याने अधोगती सुरू आहे. पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक दिवसाच्या फरकाने जवळपास स्वतंत्र झालेले दोन देश, त्यापैकी एक जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरा जगातील सर्वात गरीब राष्ट्रांच्या सीमेवर उभा आहे, हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. याच कारणामुळे पाकिस्तानची जनता अत्यंत खवळलेली आहे. तेथील सोशल मीडियावर पाहिले तर जनतेचा राग दिसून येतो.
अरे हो. परवा मी पाकिस्तानचे एक टी.व्ही. चॅनल पाहत होतो तेव्हा तेथील लोकांचे असे म्हणणे होते की, हा देश पुन्हा बि—टिशांना चालवायला द्या किंवा सरळ भारताच्या स्वाधीन करून टाका. कारण, पाकिस्तानी टका हे त्यांचे चलन सध्या नीच्चतम पातळीवर पोहोचले आहे.
त्या पार्श्वभूमीवर आपले भारतीय वंशाचे अनेक लोक जगभरात अनेक ठिकाणी सत्तास्थानी आहेत. जवळपास जगभरातील 60 मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय लोक आहेत.
अरे, हे तर काहीच नाही. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सल्लागार मंडळात सुमारे 122 भारतीय लोक आहेत.
होय, ते तर आहेच; पण सिंगापूरसारख्या अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या देशाचे पंतप्रधान हे मूळ भारतीय आहेत. थर्मन षण्मुगरत्नम असे त्यांचे नाव आहे.
अरे, हेसुद्धा काहीच नाही. मॉरिशस या देशाचे पंतप्रधान प्रवींद्र जगन्नाथ हे असून, गेली किती तरी वर्षे पृथ्वीराजसिंह रूपन हे तेथील राष्ट्राध्यक्ष आहेत आणि हे दोघेही भारतीय आहेत. मला एक सांग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, सेशल्सचे पंतप्रधान राजकलावन, सुरीनामचे पंतप्रधान चंद्रिका प्रसाद, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कॉस्ता, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर ही अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. मला एक सांग, भारतीय वंशाचे लोक कंपनी असो की देश असो, सर्वत्र प्रमुख स्थानावर आहेत याचे काय बरे कारण असेल?
अनेक कारणांमुळे भारत आघाडीवर आहे आणि पाकिस्तान पीछाडीवर आहे. बौद्धिक ताकद, कौशल्य मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी, देशाच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान, या कारणांमुळे भारतीय लोक सर्वत्र आघाडीवर आहेत. म्हणजे, भारतीय लोकांमध्ये असणारे नेतृत्वगुण आता जगाने मान्य केले आहेत. जगभर पसरलेली कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी 'गुगल'सारखी कंपनी असो की सिंगापूरसारखा देश असो, त्याचे प्रशासन चालवणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. 'यूपीआय' म्हणजे मोबाईलद्वारे विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करणार्या लोकांच्या संख्येत भारत अग्रक्रमावर आहे.
अवघ्या पाच वर्षांपूर्वी सर्वत्र नोटा वापरल्या जात होत्या. आज जवळपास सर्व व्यवहार कॅशलेस झाले आहेत. लाखो रुपयांचे व्यवहार करणारा एखादा व्यापारी असो की, पाच-सातशे रुपयांचा दररोजचा व्यवहार करणारी एखादी अशिक्षित भाजीवाली असो, या सर्वांचा आर्थिक कारभार 'यूपीआय'वर सुरू आहे. त्यामुळे सातत्याने अपडेट राहणारे भारतीय लोक उद्या चालून आणखी काही देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान झाले, तर आश्चर्य वाटू देऊ नकोस. शिवाय, या सगळ्या देशांना भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत; कारण भारत ही जगातील एक मोठी बाजारपेठ बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर दररोज बॉम्बस्फोट होणारा पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे निवासस्थान बनले आहे.