यार मित्रा, आमच्याकडे लहान मुलांची नावे ठेवताना चित्र-विचित्र नावे ठेवण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. आमच्या कॉलनीत परवा एका बाळाचा नामकरण विधी करण्यात आला. त्या बाळाचे नाव ठेवले होते सत्क्रीयांश. हे नाव ना त्या बाळाच्या आईला उच्चारता येत होते ना वडिलांना. कोणीतरी सुचवले आणि ठेवले अशी परिस्थिती आहे. आपल्या वेळेला असे नव्हते. साधी नावे असायची जसे की शाम, राम, दिलीप, विजय अशी. एकाच आई- वडिलांच्या पोटी जन्मले असतील तर संजय, विजय, धनंजय अशी काही तरी सिरीज असायची. म्हणजे नाव ठेवणे एवढे महत्त्वाचे नव्हते. कोणी तरी आत्या असायची. ती समोर येऊन काही एक नाव घोषित करायची की झाले फायनल. आता म्हणजे कहर झाला आहे. चित्र-विचित्र नावे शोधून ठेवले जात आहेत.
होय तर. मध्यंतरी आदित्य आणि आर्यन या दोन नावांचा एवढा सुळसुळाट झाला होता की, नंतर नंतर कुठे मूल जन्मले की तुम्ही जाऊन नुसते विचारायचे बाळाचे नाव आदित्य ठेवले आहे की आर्यन? मुलींसाठी कियारा, अदिती, मायरा ही नावे निश्चित असायची. होय तू म्हणतोस ते खरे आहे; पण पुढे त्यामुळे काय गंमत होणार आहे हे तुझ्या लक्षात आले का बघ? मी सांगतो सोपे करून. शोभा, शकुंतला, सुनंदा, कमल, सावित्री, गोपाळराव, हरिहरराव, वसंतराव, रामराव, शामराव अशी नावे होती पूर्वी. मुला-मुलींची नावे नवीन स्टाईलची ठेवल्यामुळे पुढील काळात असे संवाद कानावर पडतील. सायली आजीला व्हेंटिलेटवर ठेवलंय आणि तिकडे आदित्य आजोबा सलाईनवर आहेत. त्यांना भेटायला म्हणून माझी चुलत आजी, जुईली आजी इकडे येण्यास निघाली तर जिन्यावरून पाय घसरून पडली, हात मोडलाय तिचा आणि गम्मत म्हणजे तिची काळजी घ्यायला आर्यन आजोबांशिवाय दुसरं कुणी नाही. आराध्या मावशी येणार होती; पण तिच्या सुनेची डिलिव्हरी झाल्यामुळे ती येऊ शकत नाही. अशा प्रकारचे संवाद ऐकायला मिळतील.
पण लहान मुलांची नावे ठेवताना ती त्या मुलाला उच्चारायला सोपी जातील किमान त्या नावाला काहीतरी अर्थ असेल, अशी ठेवली पाहिजेत. तू सुरुवातीला म्हटलेले सत्क्रीयांश या नावावरून असे वाटते की, आई-वडिलांनी काही तरी चांगली क्रिया केली असावी ज्याचा परिणाम म्हणून हा अंश जन्माला आला असावा.
पुराण काळात अवघड नावे नव्हती असं नाहीये. उदाहरणार्थ प्रद्युम्न, द़ृष्टद्युम्न, अश्वत्थमा. उच्चाराला कठीण आणि समजायला अजून कठीण. माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत. त्यांचे स्वतःचे नाव द़ृष्टद्युमन आहे. त्यांनी मुलाचे नाव प्रद्युम्न ठेवले, म्हणजे त्या मुलाचे एकंदरीत नाव वाचले तर ते प्रद्युम्न द़ृष्टद्युम्न कडेलोटकर असे होते; पण तू काही म्हण मराठी माणसे प्रयोगशील आहेत. पूर्वीचे बाळ्या, बंड्या, तायडी, मायडी जाऊन त्यांची जागा बंटी, बबली, खुशी, झारा अशा टोपण नावांनी घेतली आहे. बाळ्या, बंड्या हे लहानपणी ठेवलेले टोपण नाव ती व्यक्ती मोठे झाली तर बाळासाहेब, बंडोपंत अशी ओळखली जायची. आता एकच गोष्ट बाकी आहे आणि ती म्हणजे बापाचे आणि मुलाचे एकच नाव ठेवणे. अरे ते पण झाले आहे. मराठीतील एक चांगले लेखक आहेत. त्यांचे नाव वसंत आहे आणि त्यांच्या वडिलांचेही नाव वसंत आहे. म्हणजे ते पूर्ण नाव लिहिताना वसंत वसंत आणि पुढे आडनाव लिहितात. जाऊ दे आपल्याला काय काराचेय? आपले साधे सोपे आहे ना? मग पुरे.
– झटका