मुंबई वार्तापत्र
मुंबई वार्तापत्र 
संपादकीय

शेखचिल्लीच्या शोधात महायुती

पुढारी वृत्तसेवा
विवेक गिरधारी

सत्तेच्या फांदीवर तीन प्रमुख पक्ष, त्यातला एक कुणी तरी शेखचिल्ली आहे. लोकसभा पराभवानंतर प्रथमच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेखचिल्लीबद्दल रेड अलर्ट दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात न पाहता फडणवीस म्हणाले, स्वतःचेच पाहाल, तर विश्वासघात होईल. शेखचिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसलोय तीच फांदी कापायला लागलो, तर अवघड होईल. आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत; पण विधानसभा निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याचा निर्णय महायुतीत सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने घ्यावा. सत्तेची फांदी वाचवायची, तर भाजपला नेतृत्वाची सूत्रे हाती घ्यावी लागतील, असेच त्यांनी सुचवले. विधानसभेची पहिली लढाई महायुती विरुद्ध महायुती अशी होऊ घातली आहे.

आपला राजकीय मार्ग शत-प्रतिशत प्रशस्त करण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले. सत्ता मिळवली. मुळावरच घाव घातल्याने हे दोन्ही पक्ष आता काही उठत नाहीत, हा मात्र शुद्ध भ्रम ठरला. शिवसेना-राष्ट्रवादीच्या उरल्या खोडांना टरारून नवी पालवी फुटली. त्यांच्या ज्या फांद्या भाजपने सोबत घेतल्या त्याही फुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत बहरल्या. गुवाहाटी व्हाया सुरतच्या बंडात उद्धव ठाकरेंकडे अठरापैकी फक्त चार खासदार उरले होते. हाती धनुष्यबाण नसतानाही नऊ खासदार त्यांचे निवडून आले. दहावा अमोल कीर्तिकरांचा मतदारसंघही जिंकल्यागत आहे. 46 मतांचा संशयास्पद फरक हा काही पराभव नव्हे! शिंदे गटाकडे तब्बल 14 खासदार होते. त्यातल्या 7 जागा या गटाने राखल्या. हा निकाल नव्याने सांगण्याची गरज नाही. या निकालाकडे नव्याने मात्र बघता येते. शिवसेना संपवायची म्हणून तिचे दोन तुकडे केले. आता दोन्ही सेनांचा हा निकाल एकत्र मोजला, तर महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 16 खासदारांसह सर्वांत मोठा पक्ष ठरतो. त्या खालोखाल 13 खासदारांसह काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरेल. फुटीच्या आधी राष्ट्रवादीचे फक्त चार खासदार होते. या फुटीलाही नवी पालवी फुटली. दहा जागा लढवून शरद पवार गटाने आठ खासदार निवडून आणले. अजित पवार गटाला एक जागा जिंकता आली. पवारांच्या दोन्ही गटांच्या जागा एकत्र केल्या, तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरतो. 28 जागा लढवून भाजप फक्त नऊ जागा जिंकू शकला. उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेच हा तिसरा क्रमांकही भाजपला राष्ट्रवादीसोबत विभागून घ्यावा लागेल. फुटलेले उद्या पुन्हा एकत्र येतील, न येतील.

फुटल्यानंतरही शत्रूपक्षांची झालेली स्वतंत्र वाढ भाजपसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे. दुभंगलेल्या या शत्रूंचे साम्राज्य विस्तारताना महाशक्ती शेखचिल्लीच्या फांदीवर बसून सत्तेचे स्वप्न कसे पाहू शकेल? लोकसभेच्या पराभवाने महायुतीत भाजपचा महाशक्ती म्हणून जो धाक होता तो संपला. कालपर्यंत भाजप म्हणेल ती पूर्व दिशा हा दंडक शिंदे गट आणि अजित पवार गटाने मान्यच केला होता. ‘बैल गाभण आहे’ असे महाशक्तीने नुसते म्हटले, तरी त्याला नववा महिना लागला, असे सांगण्याची स्पर्धा या दोन्ही गटांत असायची. लोकसभा निकालांनी हे चित्र बदलले. यापुढे केवळ भाजपच सर्व्हे करणार आणि निवडणुकीच्या आधीच वाट्टेल तसे निकाल ऐकवून जागा वाटप रेटणार, उमेदवारांचे फेरफार करणार हे आता चालणार नाही. खुद्द अजित पवारांनीच हे जाहीरपणे सांगितले. महायुतीत असलेले तिन्ही पक्ष सर्व 288 जागांचा सर्व्हे करतील. आपापले सर्व्हे घेऊन जागा वाटपाला बसतील. तीनपैकी दोन सर्व्हे एका बाजूला झुकतील तो कौल मानला जाईल. महाशक्ती वगैरे कुछ नहीं! शिंदे गटानेही स्वतंत्र सर्व्हेचे काम सुरू केले. भाजपला आधी महायुतीत सुरू झालेला हा रणसंग्राम जिंकावा लागेल. मग, विधानसभेच्या रणांगणात महाविकास आघाडीशी लढताना मित्रपक्षांवरही नजर ठेवायची आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीतून दोन सत्तेचे सोबती मिळाले असे भाजपला वाटत होते; पण आपल्यातूनच कलम झालेले दोन तुकडे शत्रूच्या छावणीत मुक्काम ठोकून आहेत, अशाच नजरेने महाविकास आघाडी आता त्यांकडे पाहू लागली तर काय करायचे? महाराष्ट्राचे राजकारणच आज अशा फितूर वळणावर आहे की, उद्या कोण कुणासोबत असेल याचा भरवसा नाही. भरवशाचे कूळ राहिलेले नाही. सत्तेचे कूळ ते आपले कूळ असे सारेच मानतात. आपले पंचवीस-तीस आमदार आले, तरी आपण कुठूनही मुख्यमंत्री होऊ शकतो, असा आत्मविश्वास शिंदे आणि अजित पवार दोघांनाही वाटतो. यात अडचण झाली ती महाशक्तीची. एका धाकाने मित्रपक्ष सोबत आले आणि सत्ता काबीज केली. तो महाशक्ती म्हणून असलेला धाक आज भाजपच्या शत्रूपक्षांना वाटत नाही आणि मित्रपक्षांनाही!

केंद्रात तिसरे पर्व महाशक्तीचे नव्हे, तर आघाडीचे सुरू झाले. ईडी वगैरेची धाडसत्रेही थांबली. त्यातून एक मोकळा श्वास घेत शिंदे सेना आणि अजित पवार गट आत्मभान जागे झाल्यागत भाजपलाच ललकारू लागले आहेत. भाजपसमोर हा कसोटीचा काळ म्हणायचा. युतीचे बोट धरून भाजपने महाराष्ट्रात पाय रोवले. पुढे भाजप म्हणजेच युती आणि भाजप सांगेल तोच युती धर्म, इथपर्यंत भाजपची मजल गेली. या लोकसभेला भाजपची खासदार संख्या दहाच्या खाली घसरल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक टेप वाजत आहे. त्यात शिवसेनाप्रमुख भाजपला उद्देशून म्हणतात,

“आमच्या जोरावरच तुम्ही आलात ना! तुमचा आम्हाला फायदा झाला. आम्ही नाही म्हणत नाहीये; पण तरीही तुमचे दहा खासदार या महाराष्ट्रात कधीही निवडून आले नाहीत. ते आले हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्हीही लक्षात घेतो. आम्ही केवळ असे म्हणत नाही की, केवळ आम्हीच! आम्हीसुद्धा- तुम्हीसुद्धा... पण, काही ऐकायलाच तयार नाहीत. अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका. बिलकूल ठेवू नका. दूध प्यायचे तर सरळ दूध प्या; पण दूध संपलं, तरी रक्त प्यायला लागाल, तर मात्र पंचायत होईल...” तेव्हा हा इशारा भाजपने काही ऐकला नाही. शेवटी वर्तुळ पूर्ण झाले. आज हाच इशारा भाजप शिंदे सेनेला आणि अजित पवार गटाला देत आहे; पण शेखचिल्लीने कधी कुणाचे ऐकले आहे?

SCROLL FOR NEXT