संपादकीय

ओतीव आनंदाचा शिधा

दिनेश चोरगे

अफाट बुद्धिमत्ता आणि अचाट कल्पकता असणारा देशातील सर्वश्रेष्ठ प्रांत कोणता, याचे उत्तर आता मिळालेले आहे. अर्थात, या सर्व बाबतीत महाराष्ट्र हा अव्वल क्रमांकावर आहे, याचा आपणा सर्वांना अभिमानच वाटला पाहिजे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे सर्वत्र गदारोळ उठला आहे. काही पक्षांचे जागावाटप झाले आहे, तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहे. युती, महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी अशा कुणाचाही आधार न घेता निवडणूक लढवणार्‍या धाडसी अपक्षांची संख्या मोठी आहे. कुणाचे तिकीट मिळायची वाट बघायला नको की कोण नेते प्रचाराला येणार, याचा विषय नको, असे हे अपक्ष उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. दसरा-दिवाळीसारख्या मोठ्या सणांसाठी गोरगरिबांना स्वस्तात मिठाई मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा ही संकल्पना राबवली आहे. अत्यल्प दरात लाडू, जिलेबी आणि तत्सम गोड पदार्थ शासन गरिबांना पुरवीत आहे. या स्वस्तात मिळालेल्या गोडधोडामुळे गरिबांची दिवाळी होते आणि त्यांच्या घरामध्ये आनंद पसरतो म्हणून याला आनंदचा शिधा, असे म्हणतात.

चंद्रपूर लोकसभेच्या अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी मात्र या आनंदाच्या शिध्याचे रूपांतर ओतीव आनंदाच्या शिध्यात केले आहे, याचा मनस्वी आनंद समस्त महाराष्ट्रवासीयांना होत आहे, यात शंका नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आनंदाचा शिधा तर आम्हाला माहीत होता; पण हा ओतीव आनंदाचा शिधा हे काय प्रकरण आहे? सोपे आहे. आपण खासदार झालो तर जनतेसाठी काय-काय करणार याची यादीच या महिला उमेदवाराने मतदारांसमोर सादर केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये आनंदाचा शिधा यामध्ये उत्कृष्ट प्रतीचे मद्य आणि बीअर उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळेच आम्ही याचे नाव 'ओतीव आनंदाचा शिधा' असे ठेवले; कारण मद्य कुठल्याही प्रकारचे असो, ते द्रवरूपात असते आणि ते ओतूनच घ्यावे म्हणजे प्यावे लागते. हा ओतीव आनंद या ताई आपल्या मतदारसंघात घरोघरी पुरवायला तयार झाल्या आहेत.

अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तर जवळपास विनामूल्य असा आकार लावून मद्य उपलब्ध करून दिले पाहिजे, अशीही त्यांची मागणी आहे. त्यांच्या मतदारांना त्यांनी दिलेले हे वचन आहे. बहुधा ताईंनी आपल्या मतदारसंघाचे काही एक सर्वेक्षण केले असावे. सर्वेक्षणामध्ये जात-पात, गरिबी, शेतकरी, कामगार असा कुठलाही भेदभाव न करता बहुदा दोनच गोष्टींवर पाहणी केली असावी. एक म्हणजे आपल्या मतदारांपैकी 'घेणारे किती' आणि 'न घेणारे किती'. यावरून त्यांच्या असे लक्षात आले असेल की, मतदारसंघात घेणार्‍यांची संख्या 50 टक्के असेल तर हे 50 टक्के लोक आश्वासनांना प्रतिसाद देतील आणि आपण सहज निवडून येऊ.

या निष्कर्षामध्ये काही चुकीचे आहे असे नाही. ज्याला रोज घ्यायची असेल त्याचे जर पैसे वाचणार असतील तर तो निश्चितच ताईंना मतदान करेल आणि ताई सहज निवडून येऊ शकतील. निवडून येण्याची टक्केवारी पाहिली तर ती साधारणतः 32 ते 34 टक्क्यांपर्यंत असते. इथे 50 टक्के लाभार्थी मतदारांनी मतदान केले तर वनिताताई प्रचंड मतांनी निवडून येऊ शकतात, हा त्यांचा अंदाज अजिबात चुकीचा नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT