संपादकीय

पटनायकपर्वाचा अस्त

Arun Patil

[author title="दिनेश्वर दधिच" image="http://"][/author]

ओडिशाच्या राजकीय नभामध्ये नवीन पटनायक नामक सूर्य गेली गेल्या अडीच दशके दिमाखाने झळकत होता. बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीनबाबूंनी राजकारणात प्रवेश केला. उडिया भाषा नीट बोलता येत नसतानाही लोकांनी त्यांना स्वीकारले; मात्र माजी सनदी अधिकारी आणि स्वीय सहायक व्ही. के. पांडियन यांचा बीजू जनता दलात प्रवेश झाला आणि तेथूनच नवीनबाबूंच्या राजवटीला घरघर लागण्यास सुरुवात झाली.

भाजपची निवडणूक रणनीती अभ्यासताना नेहमीच एक बाब लक्षात येते ती म्हणजे, या पक्षाची विजिगीषू वृत्ती. एखाद्या राज्यात, मतदारसंघात निवडणुकांमध्ये कितीही वेळा पराभव पत्करावा लागला, अगदी नामुष्कीजनक पराभव वाट्याला आला, तरी पुन्हा पुढच्या निवडणुकीसाठी तितक्याच तडफेने प्रयत्न करत विजयासाठी आगेकूच करायची. मोदी-शहांच्या भाजपाने या प्रयत्न सातत्यांना निवडणूक व्यवस्थापनातील नव्या तंत्राची जोड दिली. त्याचा परिणाम पश्चिम बंगाल, केरळ, आंध— प्रदेश यासारख्या राज्यांत दिसूनही आला. ओडिशा हे याचे ताजे आणि महत्त्वाचे उदाहरण म्हणून ताज्या निवडणूक निकालांनंतर पुढे आले आहे. यंदा या राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही पार पडल्या. या निवडणुकांमध्ये बीजू जनता दल या ओडिशात 24 वर्षांपासून सत्तेत असणार्‍या पक्षाला पराभूत करून आपले सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. बीजू जनता दलाचे नवीन पटनायक यांचे सरकार अडीच दशकांनंतर सत्तेतून पायउतार झाले आहे.

खरे पाहता, दक्षिणेतील अन्य राज्यांप्रमाणेच नवीनबाबूंनी ओडिशावर आपला एकहाती वचक ठेवला होता. पटनायक म्हणजे ओडिशा आणि ओडिशा म्हणजे पटनायक असे समीकरणच राष्ट्रीय राजकारणात तयार झाले होते. कारण, पटनायक यांची ओडिशातील जनतेमध्ये अफाट लोकप्रियता होती. वडील बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीनबाबूंनी राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्र्याला त्या राज्याची भाषा बोलता येणे गरजेचे असते. परंतु, नवीनबाबूंना उडिया भाषा नीट बोलता येत नसतानाही लोकांनी त्यांना स्वीकारले; मात्र माजी सनदी अधिकारी आणि स्वीय सहायक व्ही. के. पांडियन यांचा बीजेडीत प्रवेश झाला आणि तेथूनच नवीनबाबूंच्या राजवटीला घरघर लागली. पटनायक सरकारच्या प्रत्येक निर्णयात पांडियन यांचा वाढता हस्तक्षेप, पटनायक यांच्या आरोग्याबाबत उडणार्‍या वावड्या आणि भाजपकडे तरुणांचा वाढता कल यामुळे ओडिशात यावेळी कमळ फुलले. भाजपचा आक्रमक प्रचार होताच; परंतु बीजेडीचे 'सेल्फ गोल'देखील पराभवाला तितकेच कारणीभूत ठरले. या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक हे कांताभाजी मतदारसंघातून पराभूत झाले. गेल्या चोवीस वर्षांत ते एकदाही पराभूत झाले नव्हते. ओडिशा विधानसभेत एकूण 147 जागा असून त्यापैकी भाजपला 77 जागा मिळाल्या, तर पटनायक यांच्या पक्षाला 52 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

भाजपने पटनायक यांची तब्येत आणि पंडियन यांच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध यशस्वी मोहीम राबविली आणि त्याचे फलित भाजपच्या विजयात झाले. या वर्षाच्या प्रारंभी मोदी यांनी नवीन पटनायक यांना मित्र म्हटले असताना आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कौतुक करत असताना विधानसभेच्या प्रचारसभेत मात्र हल्लाबोल केला. भाजपचे सरकार सत्तेत आले, तर 70 वर्षीय नवीन पटनायक यांची तब्येत का ढासळली, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी मोदी यांनी घोषणा केली. या मुद्द्याचा परिणाम ओडिशातील जनतेवर झाला.

पांडियन यांचा संदर्भ देत मोदी यांनी भगवान जगन्नाथ मंदिर यांचे दागिने असलेल्या खोलीच्या किल्ल्या हरविल्याचा मुद्दाही मांडला आणि या किल्ल्या आता तामिळनाडूपर्यंत पोहोचल्याचेही सांगितले. नवीन पटनायक यांनी पांडियन हे वारसदार नसल्याचे स्पष्ट करतानाच आरोग्यही उत्तम असल्याचे सांगितले; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ओडिशाच्या निमित्ताने भाजपच्या खात्यात आणखी एक राज्य जमा झाल्यामुळे या पक्षाची ताकद वाढणार आहे. राज्यसभेच्या जागांसाठी हा विजय मोलाचा ठरणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भाजपचे सरकार ओडिशाचा कायापालट करण्यामध्ये कितपत यशस्वी होते, यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT