संपादकीय

स्मरण शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळ्याचे

Arun Patil

[author title="शशिकांत दैठणकर, माजी जिल्हाधिकारी" image="http://"][/author]

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. 6 जून 1674 या दिवशी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. या घटनेला 350 वर्षं झाली आहेत. अर्धशतकापूर्वी म्हणजे सन 1974 मध्ये कोल्हापूर शहरात शिवराज्याभिषेक त्रिशत संवत्सरी आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जन्मशताब्दी हे दोन्ही महोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरे झाले. त्यासाठीची प्रेरणा आणि संयोजन दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे होते. त्यांच्या पुढाकारानं या सोहळ्यांना राज्याचं मंत्रिमंडळ उपस्थित होतं. शिवराज्याभिषेकाच्या त्रिशकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं त्याचं स्मरण करून देणारा विशेष लेख.

सन 1974 हे वर्ष मोठं वैशिष्ट्यपूर्ण होतं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला तीनशे वर्षंपूर्ण होत होती आणि नेमकी त्याच वर्षात लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जन्मशताब्दी होती. तमाम महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असे हे शुभयोग जुळून आले होते. मात्र, ही गोष्ट कोणाच्या गावीही आली नव्हती; पण दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाज्वल्य शिव-शाहू प्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. 10 मार्च 1974 रोजी कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात निमंत्रक म्हणून त्यांनी एक व्यापक बैठक बोलावली. या बैठकीत माझ्या अध्यक्षतेखाली व्यापक समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. प्रतापसिंह जाधव यांच्यावर कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या सभेनंतर कोल्हापुरात उत्साहाचं वारंच संचारलं. आम जनता या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाली. ही तयारी चालू असतानाच डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मुंबईत जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेतली. शाहू जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय झाला.

शिवराज्याभिषेक त्रिशत संवत्सरी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात विराट मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. 3 जून 1974 रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवरायांच्या गगनभेदी जयजयकारात दसरा चौकातून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. लाखो लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्वतोमुखी शिवरायांचा अखंड जयजयकारही सुरू होता. लाठी-बोथाटी, फरीगदगा, दांडपट्टा आदी युद्धकलांचा नेत्रदीपक थरारही लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता. शिवजन्मापासून राज्यारोहणापर्यंतचे चित्ररथ मिरवणुकीची शोभा वाढवत होते. त्यातून सारा शिवकाळ नजरेसमोर उभा राहत होता.

सर्वच चित्ररथ अत्यंत आकर्षक नि कलात्मक होते. सर्वात शेवटी कैलासगडची स्वारी मंडळाचा चित्ररथ होता. त्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचा जिवंत देखावा उभा केला होता. भगवे फेटे, भगव्या पताकांनी सारं वातावरण भगवं नि शिवमय झालं होतं. मिरवणुकीत सर्वधर्मीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यामुळं सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वदूर जाऊन पोहोचत होता. छोट्या-मोठ्या गावांतून, खेड्यापाड्यांतून गटागटानं लोक आले होते. शहरातील घराघरांच्या दारादारांतून उभारलेल्या गुढ्या-तोरणं शहराच्या सौंदर्यात भर घालत होती. रोषणाईनं शहर झगमगून गेलं होतं. या अतिभव्य मिरवणुकीचा समारोप तब्बल पाच तासांनी झाला. वरुणतीर्थ वेस मैदानावर रात्री करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतषबाजीनं या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळा साजरा होत असतानाच राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दीचीही जय्यत तयारी चालू होती. दि. 20 मे 1974 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळ्याची तारीख 30 जून ही निश्चित करण्यात आली. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासह सगळं मंत्रिमंडळच या ऐतिहासिक जयंती सोहळ्याला येणार म्हणून कोल्हापूरकरांच्या आनंदाला उधाण आलं होतं. 30 जूनला सकाळीच मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन संपन्न झालं. त्याचवेळी राजर्षींचं जन्मस्थान सरकारकडे हस्तांतरित करण्याचा सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर मंत्री सर्वश्री वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, शरद पवार, रफीक झकेरिया, खासदार, आमदार यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नंतर शाहू स्टेडियमवर लाखोंच्या उपस्थितीत भव्य जन्मशताब्दीचा मुख्य सोहळा पार पडला. दुपारी ठीक तीन वाजता दसरा चौकातून मुख्यमंत्री नाईक यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक तब्बल पाच तास सुरू होती. एकूणच शिवराज्याभिषेक त्रिशत संवत्सरी सोहळा आणि राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळा, हे दोन्ही समारंभ ऐतिहासिक ठरले. 'न भूतो, न भविष्यती' असे झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT