गौरव : (खरात काकू दार उघडतात) खरात काकूंना गौरवचा बेल न वाजवता दारातूनच साष्टांग नमस्कार. खरात काकांची वरात पाहून खूप वाईट वाटते हो. त्यांना बेल पण मिळणार नाही. म्हणून आदराप्रीत्यर्थ बेल न वाजवताच घरात आलो काकू. सांभाळा हो काकू. मेल करणेस धाडस नव्हते म्हणून आलो तडक काकू! कारण, खरातांचा मोठा विळखा देशातल्या अनेक बाया बापड्यांच्या भोवती आणि खरात काकू तुम्ही मीडियासमोर म्हणता बिचारा माझा पती. पती पती उचापती! त्याला होर्मुझच्या समुद्रधुनीत तेल गोळा करायला पाठवायला पाहिजे. आमच्या वनिताताई जाम चिडल्यात तुमच्यावर. वर्गणी मागायला जा त्या खरात बाईकडे. खूप पैसे मिळतील म्हणतात हो काकू.
खरातबाई : अरे किती बोलतोस. बेल मिळो ना मिळो, तुला काय करायचंय? त्या वनिताबाईंना सांग मी वर्गणीला घाबरत नाही.
गौरव : तुमचा गौरव करायला आलोय.
खरातबाई : माझा? तू कसा काय माझा गौरव करणार? मी नाही हां हास्यजत्रेत काम करणार तुझ्या जागी.
गौरव : आता तर गौरव डबल झाला पाहिजे काकू. मी नावाचा गौरव का करेन. तसा गौरव नाही हो. पुष्पगुच्छ देऊन गौरव...
खरातबाई : कशाला ते आणि? आमचे हे जोड्याचा हार घेऊन फिरत आहेत. मला कशाला हवाय पुष्पगुच्छ?
गौरव : अहो वनिताताई वर्गणी देईनात तुमच्यामुळे. सगळ्यांनी भंडावून सोडलं, त्यांनाच काहींनी खरात प्रकरणाशी जोडलं. मला नका टाकू काकू. वर्गणी तेवढी द्या काकू.
खरातबाई : वनिताबाईंना सांग जाऊन एवढे पण कोण मूर्ख नाही. आडनावात सारखेपणा असला म्हणून आपली घाण दुसर्यावर ओतायची का?
गौरव : त्यापण नेमके हेच बोलतात. जाम वैतागल्या त्या. आता म्हणतात हास्यजत्रेत पण तिलाच घ्या. म्हणून आलो काकू. चला काकू नाही तरी हसं झालेच आहे काकू. तिथे काय इथे काय! सगळीकडेच हसतात हो तुम्हाला काकू; पण तुम्ही बोललात खरात निर्दोष आहेत. किती लाईक्स आल्या हो काकू. या तुमच्या विनोदाला आधी गोमूत्र टाकून शुद्ध केले पाहिजे की हो काकू.
खरातबाई : चल जा. तू इथे बोलून जिरवत आहेस हे आलं लक्षात माझ्या!
गौरव : गौरव दारातूनच परतणार की हो काकू. जातो काकू..!