Prophet Muhammad Peace Message Pudhari File Photo
संपादकीय

Prophet Muhammad Peace Message | हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचा शांती संदेश

पैगंबरांचे बालपण व तारुण्य अतिशय कठीण व खडतर अवस्थेत गेले.

पुढारी वृत्तसेवा

पैगंबरांचे बालपण व तारुण्य अतिशय कठीण व खडतर अवस्थेत गेले. व्यापाराच्या निमित्ताने काफिल्यातून प्रवास केला. समाज जीवनाचे बारकाईने अवलोकन केले, अनुभवले व व्यवहार पाहिला. एक प्रकारच्या सामंती, दांडगाई करणारे कबिलाशाहीत राहणारे लोक अन्याय, अत्याचार, शोषण व पिळवणुकीच्या जोखडाखाली चिरडून गेले होते. गरीब, स्त्रिया, मुले, विधवा, गुलाम यांचे जीवन कस्पटासमान झाले होते. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद, वाईट चालीरीती, कुप्रथा, परंपरा तसेच दारू, जुगार, कबिल्यांतील ईर्ष्या व शत्रुत्व अशा गोष्टींनी समाजजीवन बरबटून गेले होते. रिकाम्यावेळी पैगंबर ‘हिरा’ डोंगराच्या गुफेमध्ये तासन् तास चिंतन करत बसायचे. समाजाचे समग्र अवलोकन व चिंतनातून त्यांना अधःपतीत समाज जीवनाचे मर्म सापडले. त्यांना दिव्य ज्ञानबोध झाला. एक दिव्यद़ृष्टी लाभली जी सहस्रकाच्याही पुढे पाहणारी होती.

शफीक देसाई

हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांच्या आगमनाने त्यांच्या पूर्वीच्या अज्ञान काळावर (जाहीलियत) मात केली. अज्ञान हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू व अधोगतीस कारण होते. पैगंबरांनी ज्ञानाचे महत्त्व जाणले. त्यांनी ज्ञानाला प्रथमस्थानी आणले, जे माणसाच्या बुद्धी, विचार, विवेक आणि शहाणपणास कारणीभूत आहे.

पैगंबरांच्या आगमनाने त्यांच्या पूर्वीच्या अज्ञान काळावर (जाहीलियत) मात केली. अज्ञान हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू व अधोगतीस कारण होते. पैगंबरांनी ज्ञानाचे महत्त्व जाणले. त्यांनी ज्ञानाला प्रथमस्थानी आणले जे माणसाच्या बुद्धी, विचार, विवेक आणि शहाणपणास कारणीभूत आहे. पवित्र कुराणचे पहिले प्रकटन ज्ञान, विज्ञान, कला, लेखन यांचे महत्त्व सांगत झाले. कुराणमध्ये वारंवार भाषा आणि साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. कुराणचे आणखी एक नाव ‘अल फुरकान’ म्हणजे फरक स्पष्ट करून सांगणारा ग्रंथ होय. जो माणसाला ज्ञान, विचार, विवेक व शहाणपणाच्या आधारे सत्य-असत्य, चांगले-वाईट, न्याय-अन्याय, नीती-अनीती यातील भेद व फरक स्पष्ट करून सांगतो. पैगंबरांनी आपली शिकवण कुराणच्या माध्यमातून रुजवली. त्यांची शिकवण ही अरबस्तानपुरती मर्यादित नसून ती सर्व दुनियेसाठी आहे. त्यांची शिकवण ही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बदल घडवणारी होती. ज्यामुळे समग्र क्रांतिकारी सुधारणा व सामाजिक परिवर्तन घडवून आले. पैगंबर खर्‍याअर्थाने एक ‘युगप्रवर्तक’ आहेत.

याबाबतीत कुराण आणि पैगंबर यांचे विचार जाणून घेणे गरजेचे आहे. कुराण म्हणते, जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रत्येक स्त्री व पुरुषास ज्ञान संपादन करणे अनिवार्य कर्तव्य आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी दूरवर अगदी चीनपर्यंत जा. मस्जिद निव्वळ परमेश्वराच्या भक्तीचे स्थान नसून ईश चिंतनाबरोबरच समाज चिंतन झाले पाहिजे. पैगंबर म्हणत, मस्जिदीमध्ये दोन समूहांपैकी एक समूह प्रार्थनेत मग्न असेल आणि दुसरा समूह सामाजिक गोष्टींवर चर्चा करीत असेल, तर मी सामाजिक चर्चेत सहभागी होईन. ते म्हणत तासन् तास प्रार्थनेत वेळ घालवण्यापेक्षा काही काळ ज्ञान संपादनात घालवणे महत्त्वाचे होय. माणसाचे ज्ञान क्षेत्रातील प्रत्येक पाऊल हे परमेश्वराच्या मार्गात पडते. एकमेवाद्वितीय परमेश्वराचे महत्त्व व महात्म्य ज्ञान व शहाणपणाशिवाय समजणे अवघड आहे. हुतात्म्यांच्या रक्तापेक्षाही लेखणीची शाई श्रेष्ठ व पवित्र आहे. त्यामुळे कुराणमध्ये लोकांना सातत्याने प्रश्न विचारला आहे की, तुम्हाला परमेश्वराने बुद्धी, विचार, विवेक, शहाणपण दिले आहे की नाही? त्याचा उपयोग व वापर करा.

पैगंबर म्हणत, तलवारीच्या धारेपेक्षा ज्ञान आणि शब्दांची किमया, शब्दांचे शस्त्र धारदार असते. धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती करू नका. एकच एक परमेश्वराची भक्ती करणे हे उच्च व श्रेष्ठ दर्जाच्या उपासनेचे लक्षण आहे. माणसाच्या मनातील अद्वैत व सामाजिक ऐक्याच्या संस्कृतीचे द्योतक आहे. कोणतीही वस्तू, प्राणी, पक्षी, चिन्हे, प्रतिमा व प्रतीके यांची उपासना म्हणजे अज्ञानी, हीन दर्जाचे व कमजोर सहारे होत, तरीही दुसर्‍यांच्या उपास्यांना अपशब्द वापरू नका. ‘परमेश्वर’ हा प्रेम, सत्य, न्याय व नैतिकता स्वरूप आहे आणि मानवतेची सेवा हाच माणूस ‘धर्म’ आहे. लोकांचे प्रबोधन व समाज जागृती अतिशय नम्रपणे व सन्मानाने करा. अतिशय चांगल्या व योग्य भाषेचा वापर करा.

पैगंबरांनी आपल्या आयुष्यात कधीही कोणाशी वाईट भाषेचा वापर, भांडणतंटा किंवा शस्त्राने हल्ला केल्याचे उदाहरण नाही. त्यांचे हृदय उदारता, करुणा व दयेने आटोकाट भरले होते. कोणत्याही गोष्टीला क्षमा व माफी करणे हाच त्यांचा स्वभावधर्म होता. कोणत्याही शत्रूला त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली नाही. युद्ध कैद्यांना ते अनोखी व गमतीदार सजा द्यायचे. एखादा युद्ध कैदी साक्षर असेल, तर त्याला सामान्य निरक्षरांना साक्षर करण्याची शिक्षा द्यायचे. मक्का विजयानंतर युद्धकैद्यांना दिलेली सार्वजनिक माफी एक श्रेष्ठ उदाहरण आहे. त्यांचे प्रत्येक प्रवचन हे सामाजिक सुधारणा व परिवर्तन घडवण्यासाठी होते. लोकांच्या विचार सामर्थ्यावर त्यांचा द़ृढ विश्वास होता. समाजात बौद्धिक, वैचारिक जागृती घडवून मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हेच युगप्रवर्तक हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचे जीवितकार्य होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT