Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणामाची शक्यता pudhari photo
संपादकीय

Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणामाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सुरेश पवार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने सार्‍या महाराष्ट्राला धक्का बसणे स्वाभाविक आहे. गेल्या 25-30 वर्षांत दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. खंबीर प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली होती आणि आपले कुशल संघटन चातुर्यही त्यांनी प्रकट केले होते. आपल्या काकांच्या छायेत वावरतानाही त्यांनी आपला स्वतंत्र बाणा राखला होता. काकांशी जेव्हा मतभेद झाले, संघर्ष झाला, तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतंत्र वाट चोखाळली होती. पहाटेचा शपथविधी असो की पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र होणे असो, त्यांनी नेहमीच धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या अशा धडाडीच्या व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण झाले होते. त्यामुळेच त्यांच्या आकस्मिक निधनामुळे काही राजकीय फेरमांडणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिका निवडणुकीवेळीच पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिका लढतीत अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खा. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती झाली होती. अन्यत्र काही ठिकाणीही हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दादांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या पक्षातील नेते किंकर्तव्यमूढ झाले आहेत आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आपला खंदा आधार अचानक नाहीसा झाल्याने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. आपला तारणहार हरपला, ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची त्यांची मानसिकता राहिलेली नाही आणि आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहणे स्वाभाविकच आहे. अशा अभूतपूर्व स्थितीत अजित पवार यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यापुढे पर्यायांचा विचार असणे साहजिकच आहे. महापालिका निवडणुकीत काही ठिकाणची युती लक्षात घेता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता, हा पर्याय पुढे येऊ शकतो. अशा एकत्र येणार्‍या संभाव्य पक्षात नेतृत्व कोणाकडे, हा कळीचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे या पर्यायाचे साधक बाधक परिणाम लक्षात घेऊनच पुढील वाटचाल होऊ शकेल, तरीही हा पर्याय अनेकांच्या पचनी पडण्यासासारखा असू शकतो.

अजितदादा यांच्यासारखा मातब्बर नेता हरपल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कोन ढासळला आहे. त्यांची जागा कोणी भरून काढण्याची शक्यता सध्या तरी द़ृष्टिपथात नाही. त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य काँग्रेस अथवा अन्य विरोधी पक्षांत आहे, असे सध्या तरी दिसत नाही. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीवर काही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरी आणि ग्रामीण प्रश्नांची सखोल जाण असलेला झंझावाती नेता हरपल्याने विकासाकडे विशेषतः ग्रामीण विकासाकडे बारकाईने पाहणार्‍या नेतृत्वाची उणीव दीर्घकाळ भासेल. त्याचप्रमाणे राजकारणात निर्माण झालेली एका फळीतील नेतृत्वाची पोकळी काही नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात ठरण्याची शक्यता आहे. एकूणच या भीषण दुर्घटनेचे दूरगामी विविध परिणाम होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT