Pope Leo | पोप लिओ चौदावे 
संपादकीय

Pope Leo | पोप लिओ चौदावे

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

अमेरिका-इराणच्या युद्धाचा भडका उडाला असताना जगाच्या राजकारणात एक हायप्रोफाईल ड्रामा झाला. यामध्ये बाजूला व्हाईट हाऊसची सत्ता, तर दुसर्‍या बाजूला व्हॅटिकन सिटीचा नैतिक अधिकार. या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत पोप लिओ चौदावे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविषयक धोरणाला ज्या पद्धतीने पोप यांनी उघडपणे आरसा दाखवला आहे, त्यामुळे जागतिक मुत्सद्देगिरीचे सर्व जुने नियम मोडीत निघाले.

ट्रम्प यांनी इराणला ‘संपवून टाकण्याची’ आणि तिथल्या प्राचीन संस्कृतीचा नाश करण्याची धमकी दिली. याला उत्तर देताना पोप लिओ यांनी थेट जाहीर केले की, ‘कोणत्याही युद्धाला देवाचा आशीर्वाद नसतो.’ एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला त्याच्याच देशातून आलेल्या एका पोपने ‘अधर्मी’ ठरवावे, ही चर्च आणि राजकीय सत्ता यांच्या संबंधात शतकातील सर्वात मोठी घटना ठरली. अलीकडच्या काळात पोप सहसा थेट राजकीय विषयांत पडणे टाळतात. ते शांततेचे आवाहन करतात; पण कोणाचे नाव घेत नाहीत; मात्र पोप लिओ चौदावे यांनी ही परंपरा मोडत ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला थेट ‘विनाशाचा मार्ग’ म्हटले. पोपने राजकीय विषयावर अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.

पोप यांच्या आडून युरोपीय देश ट्रम्प यांच्यावर निशाना साधत आहेत, ही या वादाची एक बाजू आहे. युरोपीय सध्या व्यापार आणि संरक्षणाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. थेट लष्करी संघर्षात पडण्याऐवजी युरोपीय नेत्यांनी पोप यांच्या भूमिकेला आपले ‘सॉफ्ट पॉवर’ अस्त्र बनवले आहे. फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांनी पोपच्या विधानांचे स्वागत करून ट्रम्प यांना एकाकी पाडण्याची खेळी खेळली आहे. युरोपसाठी पोप हे आता केवळ धर्मगुरू नसून ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाविरोधातील एक भक्कम राजकीय तटबंदी बनले आहेत. पोप लिओ हे मूळचे शिकागोचे आहेत. ट्रम्प यांच्यासाठी ही सर्वात मोठी अडचण आहे. कारण, हा पोप ‘बाहेरचा’ नाही, तो अमेरिकन मातीतला आहे. त्याला तिथली लोकशाही आणि तिथली समाजव्यवस्था ठाऊक आहे. त्यामुळे जेव्हा पोप बोलतात, तेव्हा अमेरिकन जनतेला आणि जागतिक ख्रिश्चन समुदायाला ते अधिक भावते.

पोप यांच्या विधानाने ट्रम्प यांच्या युद्धाचा नैतिक आधारच ढासळला आहे. अमेरिकेतील 25 टक्के कॅथोलिक समुदायावर असलेल्या प्रभावामुळे लष्करी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये नैतिक संभ—म निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम म्हणून कट्टर ख्रिश्चन मूल्ये जपणार्‍या अनेक रिपब्लिकन खासदारांनी युद्धाच्या अतिरिक्त निधीला विरोध दर्शवला असून, ट्रम्प यांच्यावर अंतर्गत राजकीय दबाव वाढला आहे.

पोप यांच्या जाहीर भूमिकेमुळे युरोपियन देशांच्या भूमिकेलादेखील बळ मिळाले असून अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडली आहे. याच काळात ओमान आणि कतारसारख्या मध्यस्थ देशांनी पोपच्या विधानाचा आधार घेत इराणसोबत राजनैतिक चर्चेचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. थोडक्यात, या विधानामुळे लष्करी वेगाला खिळ बसली असून, जगावरील महायुद्धाचे सावट तूर्तास टळले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT