Development Politics: राजकारण विकासाचे की अस्मितेचे? Pudhari
संपादकीय

Development Politics: राजकारण विकासाचे की अस्मितेचे?

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर विकास, अस्मिता आणि विश्वासार्हतेच्या राजकारणाची कसोटी ठरणार आहे

पुढारी वृत्तसेवा
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर विकास, अस्मिता आणि विश्वासार्हतेच्या राजकारणाची कसोटी ठरणार आहे. मराठी माणूस, गुंतवणूक, भावनिक आवाहन आणि प्रगतीचा दावा या संघर्षात मुंबई कोणाची, हे निकालच ठरवतील.

मुंबई मराठी माणसाची आहे आणि अर्थातच रोजगाराच्या शोधात इथे महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून आलेल्या हजारो, लाखो श्रमिकांचीही आहे. या मुंबईचा कल कुणाला आणि या मुंबईचा महापौर कोण? धनाढ्य मुंबईत सत्ता कोणाची, याचा फैसला आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 78 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेवर सत्ता कोणाची, हे ठरवणारा हा सामना. तो नेहमीच रोमहर्षक ठरत असतो. मुंबई हे अठरापगड जातींचे आणि नानाविध भाषांच्या नागरिकांचे कर्मस्थान आहे. त्यामुळे येथे विशिष्ट पद्धतीनेच मतदान होईल, असे भाकीत करणे खरोखर कठीण असते. या रोमहर्षक सामन्याला या वेळच्या निवडणुकीत आगळी परिमाणे लाभली आहेत. ही परिमाणे आहेत भाजप आणि शिवसेना यांच्या तुटलेल्या युतीची.

खरे तर, 2017 मध्येदेखील परिस्थिती अशीच होती. सत्तेत एकत्र असताना भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी भाजपने बरोबरीत जागा जिंकल्यामुळे असेल कदाचित; पण शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नंतर महाराष्ट्रात वेगळे होण्याचा मार्ग पत्करला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मुख्यमंत्रिपद नाकारले. त्या घटनेने होत्याचे नव्हते झाल्यानंतर एकनाथ शिंदे या नावाचा नवा नेता उभा करून भाजपने ज्या पद्धतीने सरकार स्थापन करण्याचा कार्यक्रम केला, तो महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे. त्या इतिहासानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शिवसेना आव्हान देत आहे. पूर्वी भाजप आणि शिवसेना एकत्र असायची. त्यानंतर 1917 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला होता. आता मात्र शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिवसेना अशी लढत रंगणार आहे. या लढतीचे आयाम वेगळे आहेत.

छगन भुजबळ, नारायण राणे आणि अगदी राज ठाकरे यांनाही जे साधले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. ते जनतेला आवडते आहे का, ते कळेल. मुंबईकर कोणत्या दिशेने मतदान करणार? त्यासाठी नेते जे परिश्रम करतात ते यशस्वी होताहेत का, ते आता कळणार आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासाचा मुद्दा भाजपने या प्रचारादरम्यान समोर आणला. ‌‘करून दाखवले‌’ अशी शिवसेनेची एकेकाळची टॅगलाईन या वेळेला भाजपने ‌‘आम्ही घडवले‌’ म्हणून उचलली. भाजपने केलेल्या या विकासाला मुंबईकरांची मान्यता आहे का, हे मतदान सांगेल; मात्र हा विकास करताना काही विशिष्ट उद्योगपतींना जमीन आंदण दिली गेली असल्याचा दबक्या आवाजात होणारा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे केला. त्यामुळे निवडणुकीला रंग आले. गेल्या काही दिवसांमध्ये भूमिका सातत्याने बदलत गेल्याने राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपली असल्याचा आक्षेप त्यांचे विरोधक करत असतात; मात्र एका विशिष्ट उद्योगपतीला मेहरनजर देऊन कंत्राटे का दिली जातात, हा राज ठाकरे यांचा मुद्दा या निवडणुकीतील प्रचाराला एका विशिष्ट टप्प्यावर नेणारा ठरला.

खरे तर, महापालिकेच्या निवडणुका या वार्डातील समस्यांच्या आणि नगरांना चेहरा देण्याच्या असतात; पण यावेळी चर्चा होत गेली ती मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्व आणि मुसलमान व्यक्तीला महापौर करण्यासाठी काही पक्षांचे प्रयत्न होत असल्याची. महापालिका निवडणुका या विषयांसाठी असतात काय, हा एक स्वतंत्र मुद्दा! महापालिका निवडणुकीत जर गावातील वॉर्डातील समस्यांची चर्चा होणार नसेल, तर स्थानिक प्रशासन हवेच कशाला, हाही मुद्दा उपस्थित होईल; परंतु सध्या विचारधारांच्या संघर्षात अडकलेल्या महाराष्ट्राला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सध्या मुंबई पुरते बोलायचे झाले, तर येथे विकास करणारे प्रगतीपर राजकारण आणि मराठी माणसाला एकत्र ठेवून या शहरावर स्वतःचा पगडा दाखवू पाहणारे भावनिक राजकारण असा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये मराठी मतदारांची संख्या मुळात कमी. ती आपल्याकडे वळवून शिवसेनेने कायम या शहरावर राज्य केले. मराठी मुलुखात, मराठी प्रांतात, महाराष्ट्राच्या राजधानीत सत्ताकारण हे तेथील भूमिपुत्राच्या हातात असावे, हे खरेच; पण हे करताना विकासाकडे लक्ष देणे, हेही कर्तव्य असते, याचा विसर व्हायला नको.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात हे लक्षात आणून दिले आहे. शिवाजी पार्कवर गर्दी नव्हती; पण फडणवीस यांचे ते भाषण फार महत्त्वाचे आहे. 2014 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यावर विकासाच्या योजनांना प्रचंड गती मिळाली. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली, असे मुद्दे मांडत देवेंद्र फडणवीस यांनी रोजगारनिर्मिती व्हायची असेल, तर गुंतवणुकीला पर्याय नाही, उद्योगपती परत पाठवून चालणार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वतःला कायम प्रगतिपथावर नेण्याची धडपड करणाऱ्या मुंबईकराला विकासाची ही भाषा किती भावते आहे, ते 16 तारखेला कळेल. ठाकरे बंधू, एकनाथ शिंदे, भाजप याबरोबरच काँग््रेास आणि अन्य छोटे पक्ष काय कामगिरी करतात, ते आता दिसेल.

दोन दिवस राहिले आहेत. मुंबई कुणाची, याचा फैसला होणार आहे. मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडतो का, हेदेखील 15 तारखेला कळणार आहे. आरोप-प्रत्यारोप करत वातावरण ढवळून टाकणारे राजकीय पक्ष मतदारांना बाहेर काढू शकतात का, हाही एक उत्सुकतेचा मुद्दा. कित्येकदा नागरिक स्वयंस्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडतात. ही ती वेळ आहे काय, हेही अजून कळत नाही. मुंबईकर पहिल्या टप्प्यात निवडणुकीबद्दल शांत बसले होते. त्यानंतर मराठी आणि मराठी अस्मितेचे मुद्दे समोर आल्यानंतर चर्चा सुरू झाली. मराठी वस्त्यांमध्ये रांगा लावणारे मराठी मतदारही मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार का, ते आता कळेल.

राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड या निवडणुकाही उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या विरोधात लढवत असल्याने लक्षवेधी झाल्या. सत्ताधारी पक्ष राजकीय जागा व्यापण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकांचे निकाल लागतील. जिल्हा परिषदांचे बिगुल वाजले आहेतच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आव्हान कसे पेलतात, ते दिसेल. बाहेरचे आणि आतले सगळेच एकमेकांशी वाद घालत आहेत. मतदानानंतर नवे सरकार त्या त्या शहरात निवडून येईल. हे कारभारी वाहतूक अनावस्था, सांडपाणी निचरा, दिवाबत्ती अशा विकासकामांकडे लक्ष देतील, ही अपेक्षा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT