कोणता झेंडा घेऊ हाती हा काही फक्त मतदारांनाच पडलेला प्रश्न नाही. उमेदवारांसमोर सुद्धा हाच पेच आहे. दररोज होत असलेली पक्षांतरे पाहिली आणि त्यांची संख्या मोजली तर बहुधा गिनिज बुकातील सर्व रेकॉर्ड या वर्षीच्या निवडणुकांनी मोडले आहेत, असे लक्षात येईल. एक पक्ष सोडून दुसर्या पक्षात जातानासुद्धा सेलिब्रेशन केले जात आहेत. वाजत गाजत आणि नाचत प्रत्येक प्रसंग साजरा केला जात आहे. अशा प्रसंगी आज जे चित्र समोर दिसते तसे ते उद्या असेलच असे काही नाही.
मुंबईतील दोन बंधू एकत्र आले आणि त्यांनी मिळून निवडणूक लढविण्याचे ठरवले तेव्हा नाशिकात दोन्ही बंधूंच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठे सेलिब्रेशन केले. यात एक प्रमुख नेते आघाडीवर होते आणि अत्यंत उत्साहात त्यांनी ही बातमी आल्याबरोबर जबरदस्त डान्स केला. तो डान्स सर्वत्र व्हायरल झाला आणि त्यानंतर जेमतेम 24 तासांत त्यांनी तिसर्याच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि ही गोष्ट सुद्धा व्हायरल झाली. जगात शाश्वत काहीच नाही यावर तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांचा विश्वास मात्र द़ृढ झाला.
राजकारणात खरे तर शाश्वत काहीच नसते हे आपणा सर्वांना माहीत आहे. एका पक्षाकडून एका विशिष्ट चिन्हावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली व्यक्ती विजयी मिरवणूक घेऊन थेट दुसर्या पक्षाकडे जाऊन तिकडे सामील होते हा चमत्कारही आपण नुकताच पाहिला आहे. तसेच कालचे सेलिब्रेशन विसरून तिसर्याच पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रकारही याची देही याची डोळा आपण पाहत आहोत.
याशिवाय आणखी एक गंमत आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. काही ठिकाणी शहराच्या भल्यासाठी विविध प्रकारचे लोक एकत्र येऊन एखादी आघाडी करत असतात आणि त्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असतात. निवडून आलेला नगराध्यक्ष हा कोणत्याही विशिष्ट पक्षाशी बांधिलकी नसणारा असतो. उदाहरणार्थ सोनपेठ नावाच्या परभणी जिल्ह्यातील गावात असेच एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ते निवडून येताच जवळपास सर्व पक्षांचे नेते येऊन त्यांचे अभिनंदन केले. प्रत्येक नेत्याचा हा नगराध्यक्ष आपलाच आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होता. प्रत्येकाने नूतन नगराध्यक्षांच्या बरोबर फोटो काढून ते वृत्तपत्रांमध्ये छापून येण्याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. याचा अर्थ राजकीय पक्षांचे तळ्यात आणि मळ्यात सुरूच असते आणि वेळ मिळेल त्याप्रमाणे दुसर्या पक्षातील नेत्यांना जाळ्यात ओढणे, पण सुरू असते हे नेहमीचे चित्र झाले आहे.