सध्या रोज कुणीतरी नेता उठतो आणि आपल्या असंख्य समर्थकांसह दुसर्या पक्षात प्रवेश करतो. दुसर्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याच्या बातम्या छापून याव्यात याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतलेली असते. मंडळी, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, हा पक्ष प्रवेशाचा वणवा आताच कसा काय पेटला आहे? अहो, उत्तर सोपे आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही सगळी पळापळ सुरू आहे.
स्थानिक पातळीवर, तर काही नेते असे असतात की, ते पाच वर्षांपूर्वी वेगळ्याच पक्षात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केला तो पक्ष वेगळाच होता आणि आता फिरून मूळच्याच पक्षामध्ये ते प्रवेश करत आहेत. पृथ्वी गोल आहे, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय राजकारणामध्ये नेहमीच येत असतो. स्थानिक आणि राज्य पातळीवरील काही नेते पाहिले, तर ते कधी ना कधी प्रत्येक पक्षात होतेच असे तुमच्या लक्षात येईल. काही नेते आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते कधीही एका ठिकाणी रमत नाहीत. वर्ष-दोन वर्षे झाली की, नेते पक्ष बदलत असतात आणि त्यांच्याबरोबर जाणे कार्यकर्त्यांना क्रमप्राप्त असते. असा विविध पक्षांमध्ये संचार करणारे लोक कधीकाळी मंत्रिपदावर होते, असे आपल्या लक्षात येईल.
राजकारण असो की वैयक्तिक जीवन असो, प्रत्येकाला पुढे जायचे असते आणि स्वतःचा बायोडाटा स्ट्राँग करायचा असतो. एकाच पक्षात रमणार्या लोकांचा बायोडाटा फार स्ट्राँग नसतो. त्यामुळे लोक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत असतात. ही पळापळ कधी कधी नेतेमंडळी करतात, तर येणार्या निवडणुका लक्षात घेऊन नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पळवापळवीपण केली जाते. राज्यात मुख्यत्वे सात ते आठ पक्ष आहेत आणि या प्रत्येकाला या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये यश मिळवायचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर गाजत असतात. ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत कमी मतदान असल्यामुळे कमालीची चुरस असते. टाळके फोडण्याचा कार्यक्रम हा ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर जो सुरू होतो, तो पुढची निवडणूक येईपर्यंत अखंड सुरू असतो.
जिल्हा परिषदेवर ज्याची सत्ता असेल, त्याची ग्रामीण भागावर मजबूत पकड असते. यासाठी काहीही करून पक्षाला या स्वराज्य संस्थांवर ताबा पाहिजे असतो. प्रत्येकाचे राजकारणाचे काही आडाखे असतात. येणारा काळ आणि रंग बदलत जाणारे राजकारण याचा अंदाज घेऊन इकडून तिकडे पक्ष प्रवेश होत असतात. मंडळी, तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की, इतक्या बुद्धिमान लोकांनी ही बुद्धी देशाची प्रगती आणि राज्याचा विकास साधण्यासाठी वापरली असती, तर कुठल्या कुठे गेले असते. दिवाळीचे फटाके संपले की, राजकारणामधील आपटबार सुरू होणार आहेत.