किल : ‘ये रे ये रे पावसा. तुला देतो पैसा. पाऊस पाडला खोटा. पैसा झाला मोठा.’ बिल तुझे ते प्रयोग थांबव. आकाशात वीज जमिनीची झीज आता काय पाताळात नागदेवासोबत राहावं लागेल का लोकांना?
बिल : पर्यायी व्यवस्था करेपर्यंत कळ काढा. प्रयोग चालू आहेत क्लाऊड सीडिंगचे.
किल : तू कळा काढू नको. आमचा राग शांत आहे. तो ज्वालामुखी होऊन तुला ढगात घेऊन जाईल.
बिल : एलियन पाळलेत. ते वाचवतील.
किल : ते काय पूर्वज आहेत? की विलन?
बिल : विलन तर आपल्याला समजतात..
किल : गप रे बिल्या. पोत्यात घालून मारेन नाही तर. तुझी सगळी बटणं बंद करतो बघ... मला एकदा तरी लढ म्हणा..!
बिल : आम्हाला काय येडे चाळे जमत नाहीत. तुम्हीच बघा. वेळ जात नसेल, तर बातम्या बघा भारतातल्या. एकेक बातमीदार म्हणजे कृत्रिम पावसापेक्षा डेंजर आहे की नाही?
किल : तुझ्यापेक्षा कमी. तुला ते धुराच्या पावसात मारतील. तुझ्या आणि त्या तात्याच्या कारणामुळे चुली पटवाव्या लागत आहेत.
बिल : चुली पेटवतात. पटवत नाहीत.
किल : तेच ते. चुलींशी पटत नव्हते, ते पटवून घ्यावं लागत आहे.
बिल : मग, तुमच्या डोळ्यांत पाणी का?
किल : तू माझ्या नादी लाग रे. सोन्या!
बिल : ते डोन्याला सांगा.
किल : मी दोघांना पण सांगतो या..!
बिल : नको. आमचा प्रयोग सुफळ जाऊदे. आम्ही तुमचे फोटो लावतो घराच्या भिंतींवर. तेपण अगदी कोरियामध्ये लोक लावतात ना उंच तसे.
किल : त्याचे नियम आहेत. ते पाळले नाहीस तर तू ढगात. कोरियन लोकसंख्या निव्वळ फोटोमुळे कमी झाली. फोटो जरा तिरका दिसला, तर तो अपमान समजतो मी. मग, तू गायब. मिसाईल नाही तर फोटोमुळे जाशील.
बिल : नाही मी शब्द मागे घेतो.
किल : तुझे शब्द मिसाईल समजतो. मिसाईल मागे जात नसते. तू आमच्या फोटो लावण्यासंबंधी अपमानास्पद बोलत आहेस. पहिला ‘हो’ नंतर ‘नाही’. हा घोर अपमान आहे.
बिल : कर काय करणार ते. नाही लावत फोटो. तिरका नाही, सरळ पण नाही. काही कारणच नाही. वाट बघ. पावसाचा आनंद घे. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’. हा हा हाऽऽऽ
किल : अरे, कोणी तरी इराणला संदेश पाठवा. त्यांना तरी पाठिंबा म्हणून लढाईत उतरतो. इडियटस्!