पहिला चहा : आम आदमी आणि पार्टी?  
संपादकीय

पहिला चहा : आम आदमी आणि पार्टी?

पुढारी वृत्तसेवा

आम आदमी : (संसदेत) अध्यक्ष महोदय, मी जनतेच्या हिताचा विचार करत राहणार. माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही.

अध्यक्ष : हे पाहा. शांत राहा. तुमची वेळ नाही आलेली. वेळ आलीच, तर बोलायला देऊ. सध्या तुम्ही मुद्दा मांडू शकत नाही. समोरच्या पार्टीने आपल्यावर निर्बंध आणले आहेत. आम्ही काही करू शकत नाही. प्लिज बसा!

आम आदमी : इथे आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

अध्यक्ष : बसा खाली. नका बोलू. तुम्हाला राईटस् नाहीत त्याचे.

आम आदमी : मला राईटस् आहेत.

पार्टी : अध्यक्ष महोदय, यांचा अजून उदय नाही झाला, तरी किती प्रखर बोलत आहेत. आम जनतेच्या अधिकाराच्या नावाखाली हे आपली पोळी भाजत आहेत.

आम आदमी : आम्ही पोळी भाजू नाही, तर करपून टाकू; पण जनतेच्या चुलीवर कष्टाची पोळी करपू देणार नाही. माझा आवाज मुद्दाम बंद केला जात आहे. मी हे चालू देणार नाही.

पार्टी : आम्ही पण आम जनताच आहोत आणि त्यांच्यासाठीच पक्ष चालवतो.

आम आदमी : मला पक्षात हस्तक्षेप करायचा नाही. माझे म्हणणे फक्त ऐकावे अध्यक्ष महोदय! ते आम आहेत; पण आदमी नाहीत. माणुसकी शून्य.

पार्टी : अध्यक्ष महोदय, ना हे कोणत्या पक्षाचे नेतृत्व करतात, ना पक्षाचा हिस्सा आहेत, तरीही लोकांच्या हिश्याची वार्ता करतात. आम्ही कशासाठी आहोत?

आम आदमी : ते तुम्हालाही माहिती नसावं, हेच तुमच्या चिंतेचं कारण!

पार्टी : यांनी संसदेत यावंच कशासाठी, हा आमचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय! यांनी बोलू नये.

अध्यक्ष : तुमचे बरोबर आहे.

आम आदमी : हे आम्हाला मान्य नाही.

पार्टी : तेही बोलायचा अधिकार तुम्हाला इथे नाही. देशाचे भले वस्तूंच्या किमती करून थोडेच होणार आहे का? उलट कर न जमा झाल्याने पक्ष चालणार कसे? हे पक्षच देश चालवतात.

आम आदमी : पक्ष चालविण्यासाठी जनतेचा पैसा लागत नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालं. अध्यक्ष महोदय सामान्य लोक यांच्यासाठी पैसे कमावतात. हे सामान्य जनतेच्या सुखसोयींसाठी नाहीत. हेच मला सांगायचे होते. थँक्स!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT