पहिला चहा : आत्मनिर्भरतेचं वारं..! 
संपादकीय

पहिला चहा : आत्मनिर्भरतेचं वारं..!

पुढारी वृत्तसेवा

(एक वाचकाचे स्वगत) चला, पेपर वाचूया. सगळ्या बातमीत दिलासा देणारी बातमी म्हणजे वीज बिलात कपात! ऐन उन्हाळ्यात काश्मिरात फिरून आल्यासारखं वाटलं. काश्मीर काय उटी काय. काही म्हणा हो. फॅन, इस्त्र्या, ओव्हन चालू ठेवा. आता फिकीर नाही. चला तर मस्त पंखा लावून वामकुक्षी घेऊ. आता शेजारी दुपार घालवावी लागणार नाही पंख्यासाठी. दुसर्‍याच्या घरी सारखं जाणं योग्य नाही. आम्ही चाळीत राहतो म्हणून ठीक हो. फ्लॅटमधे नाहीतर स्वतःच्या बंगल्यात लाईट बिल किती येतं? आणि तिथे शेजारी उसण्याला जायचे वांदे. आता पेपर वाचायच्या निमित्ताने दुपारी शेजारच्या आप्पांकडे जाता येते. मी माझी निवांत वेळ निवडली. भर दुपारची! का? पंख्यासाठी!

आप्पा माझे खास मित्र. अजून दोन चार घरं ओलांडून जावे लागले असते तर वेगळी वेळ शोधावी लागली असती. सख्ख्या शेजार्‍याला कधीही ये-जा करण्याची मुभा! आप्पा काय त्यांच्या जागी कोणीही असला तरी मुभा देतोच. बरं हा खटाटोप फक्त वीज वाचवण्यासाठी हो. चाळीतल्या प्रत्येकाला घरचा लाईट बंद ठेऊन एकाच घरचे बिल कसे वाढून येईल ही चिंता. हीच मंडळी आम्ही लाईट कशी वाचवतो यावर व्याख्यानं देतात ती ही फुकट. आप्पा नाती टिकून राहावी म्हणून लाईटच्या माळा पण लावतील खोलीपुढे एखाद्याच्या वाढदिवसाला. लाईट बिल कितीही येवो. आप्पा आमचे लय हार्ड आहेत. सुट्टी नाही. विषय आहे का?

बायकोला ई-बाईक वरून फिरवणारे आप्पा चाळीचे पुरवठा मंत्रीच आहेत. माझा एक पाय सकाळी खाटेवरून उठताना घरात, दुसरा आप्पांच्या दारात असतो. कारण, आमच्याकडे गिझर, गॅस संपला तर इलेक्ट्रिक शेगडी आणि सूर्यप्रकाशावर चालणारी शेगडी पण नाही हो. आप्पा मोदी समर्थक. आम्ही पाठिंबाग्रस्त देशवासी. असे पाठिंबे मिळाले की पार आत्मनिर्भरतेची वाट लावून टाकतो. आता तर लाईट बिलांनी पोळून जात होतो. लाईट बिलात कपात आली. मी लाईट आता हवी तेव्हा लावून उन्हाळा थंडपणे सोसतो. आप्पा बनियनवर लुंगीवर फेर्‍या मारताहेत. आप्पांच्या घरातल्या लाईटला विश्रांती देऊ. मस्त भजी-पाव बनवायला सांगतो हिला. बाहेर अंधारून आलं. पाऊस येईल. आतमध्ये जाऊ आणि हिचं उरकेपर्यंत पंख्याखाली वारा खात वामकुक्षी घेऊ. (बटण दाबतो) अरे बापरे विजांचा कडकडाट, लाईट गेली वाटतं. हिला पण महामंडळात जाऊन वारा खायची सवय लागली आहे. घ्या. कपात म्हणे. आप्पांच्या घरी सौरऊर्जेवरचे पंखे आहेत. जातो तिकडेच..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT