आशीष शिंदे
गेल्या अनेक दशकांपासून पाळीव प्राणी माणसाचा भावनिक आधार ठरत आले आहेत. मांजर, कुत्रा किंवा ससा यांच्यासोबतचे नाते ताणतणाव दूर करून आनंद देते. यामुळे पाळीव प्राण्यांसोबतचे प्रत्येक नाते हे माणसाच्या जीवनात आनंद आणि भावनिक आधार घेऊन येते. पण आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकाला खर्या प्राण्यांची जबाबदारी उचलणे शक्य नसते. कोणाला ऑफिसमधून वेळ मिळत नाही, तर कोणाला कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जाणे जमत नाही. मग काय, या ना त्या कारणामुळे अनेकांना मांजर, कुत्रा किंवा आवडता पाळीव प्राणी पाळता येत नाही. तुमच्या या सार्या समस्यांवर गॅजेट वर्ल्डमध्ये एक भन्नाट तोडगा निघाला आहे. अगदी पाळीव प्राण्यासारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच वागणारा, त्यांच्यासारखीच तुमची साथ देणारा रोबो तयार झाला आहे. फरक फक्त इतकाच की, हा एक एआय पाळीव प्राणी असेल. दिसायला मऊ आणि गोंडस असलेला हा छोटा रोबोट खर्या प्राण्याप्रमाणे भावना व्यक्त करतो आणि मालकाशी जिव्हाळ्याचे नाते तयार करतो.
याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भावना. अत्याधुनिक एआय अल्गोरिदम आणि सेन्सर्सच्या मदतीने तो आजूबाजूच्या वातावरणाचा अभ्यास करतो. आवाज, स्पर्श, हालचालींवर तो प्रतिक्रिया देतो. त्यामुळे तो कधी आनंदी वाटतो, कधी शांत बसतो, तर कधी मालकाशी लाडीक वागतो. वेळेनुसार तो मालकाशी जुळवून घेतो आणि एक वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण करतो. या रोबोटची अनेक आकर्षक फीचर्स आहेत. तो आवाज काढतो, पुटपुटतो आणि हलकेच हालचाली करतो. त्याचे खास अंड्यासारखे चार्जिंग नेस्ट आहे. त्यात ठेवताच तो जणू झोप घेतोय असे भासवतो. यामध्ये इनबिल्ट स्पीकर्स आहेत जे आवाज निर्माण करतात. त्याची रिचार्जेबल बॅटरी सलग काही तास वापरता येते. हा रोबोट फक्त खेळणे नाही, तर त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. आपण त्याच्याशी कसे वागतो यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक एआय रोबो वेगळा असतो आणि मालकासाठी खास बनतो. याशिवाय त्याचे डिझाईन टिकाऊ असून मुले आणि मोठी माणसेही सहज वापरू शकतात. वापरणे ही तितकेच सोपे आहे.
या एआय पाळीव प्राण्याला हातात घेताच तो आपल्याशी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो. स्पर्श केल्यावर तो गुरगुरतो, पोटाशी धरल्यावर शांत होतो आणि आवाजाला प्रतिसाद देतो. जेव्हा बॅटरी संपते तेव्हा त्याला त्याच्या नेस्टमध्ये ठेवावे लागते. आपण मोबाईल अॅपद्वारे त्याचा डेटा पाहू शकतो, तसेच सेटिंग्ज बदलू शकतो. आजच्या जीवनशैलीत खरा प्राणी पाळणे शक्य नसलेल्या लोकांसाठी हा एआय पाळीव रोबो उत्तम पर्याय. त्याला खाणे-पिणे लागत नाही, वैद्यकीय तपासणी नाही. मुलांसाठी तो खेळण्यासारखा आहे तर प्रौढांसाठी तणाव दूर करणारा साथीदार आहे. सध्या असे पाळीव रोबो विदेशात विक्रीस उपलब्ध असून लवकरच भारतातही येण्याची शक्यता आहे. त्याची किंमत साधारणपणे 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. एआयवर आधारित हा केवळ एक रोबोट नाही, तर माणसाच्या जीवनात आनंद, जिव्हाळा आणि सोबत आणणारा गोंडस यंत्र साथीदार आहे.