Pet Companion Robot | मनी माऊवर लक्ष ठेवणारा ‘पेट कंपॅनियन’ रोबो 
संपादकीय

Pet Companion Robot | मनी माऊवर लक्ष ठेवणारा ‘पेट कंपॅनियन’ रोबो

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

घरात मांजर किंवा कुत्रा पाळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारा, घराचा दरवाजा लावून कामासाठी बाहेर पडताना मनात सर्वात मोठी धाकधूक असते ती आपल्या मुक्या जीवाची. आपण बाहेर पडताच हे महाशय दिवाणखान्यातील सोफ्याची चाळण करत असतील का, खिडकीचे पडदे फाडण्यात मग्न असतील का, की एखाद्या कुंडीतील माती उकरून घरात कलाकुसर मांडली असेल? घरी पाळीव प्राणी असणाऱ्यांच्या बाबतीत ‘घरातील शांतता’ कधीच निष्पाप नसते. ती एक तर गाढ झोपेची असते किंवा एखाद्या मोठ्या नुकसानीची पूर्वतयारी. आजवर अशा खोड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भिंतीवर किंवा कोपऱ्यात स्थिर कॅमेरे बसवले जात होते. मात्र, मांजर किंवा कुत्रा सोफ्याच्या मागे किंवा दुसऱ्या खोलीत गेला की कॅमेऱ्याचा डोळा आंधळा ठरतो. मालक स्क्रीनवर केवळ रिकाम्या हॉलकडे टक लावून पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. पाळीव प्राण्यांच्या याच लपाछपीला शह देण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये आता थेट घरात फिरणारा आणि खेळवणारा एक भन्नाट ‘पेट कंपॅनियन रोबोट’ अवतरला आहे.

तंत्रज्ञान विश्वात सादर झालेला हा छोटा चाकांचा रोबोट म्हणजे निव्वळ काचेचा कॅमेरा नसून, घरभर स्वतःच्या मर्जीने किंवा तुमच्या इशाऱ्यावर फिरणारा एक सजीव डिजिटल साथीदार आहे. ऑफिसमध्ये किंवा प्रवासात असताना मोबाईलमधील ॲप उघडून तुम्ही या रोबोला एखाद्या रिमोट कंट्रोल कारसारखे थेट घराच्या कोणत्याही खोलीत चालवत नेऊ शकता. मांजर दिवाणखान्यातून उठून बेडरूममध्ये गेली किंवा सोफ्यामागे लपून बसली, तरीही हा रोबो अडथळे पार करत तिच्यापर्यंत पोहोचतो.

या रोबोमध्ये २ के क्षमतेचा हाय डेफिनिशन कॅमेरा आणि नाईट व्हिजन सेन्सर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे अगदी अंधाऱ्या खोलीतही पाळीव प्राण्यांच्या प्रत्येक हालचालीचे थेट दृश्य मोबाईलवर स्पष्टपणे दिसते. सोबतच यामध्ये दुतर्फा आवाजाची (टू वे ऑडिओ) सुविधा देण्यात आली आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढून तुम्ही ऑफिसमधूनच लाडक्या मांजरीला किंवा कुत्र्याला हाक मारू शकता, तिच्याशी लाडिक संवाद साधू शकता आणि ती म्याँव किंवा भुंकून देत असलेला प्रतिसाद थेट ऐकू शकता. केवळ पाळत ठेवून पाळीव प्राण्यांचे समाधान होत नाही, तर त्यांना हवी असते ती ऊर्जा खर्च करण्यासाठी खेळण्याची संधी. या रोबोने ती गरज अत्यंत कल्पकतेने पूर्ण केली आहे. यामध्ये लेझर लाईट आणि मांजरांना आकर्षित करणाऱ्या पिसांच्या खेळण्यांची (टीझर वँडस्‌) सोय करण्यात आली आहे.

घरातील जमिनीवर असणारे गालिचे, फरशीचे लहान उंबरठे किंवा उतार पार करण्यासाठी या रोबोमध्ये प्रगत मोशन सेन्सर्स देण्यात आले आहेत. टेबलाचे पाय किंवा घरात ठेवलेल्या वस्तूंना धडक बसू नये म्हणून यात विशेष ‘ऑब्स्टॅकल अव्हॉईडन्स’ प्रणाली वापरण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात दिलेली ५१०० एमएएच क्षमतेची बॅटरी सुमारे ६ तास अविरत काम करते आणि बॅटरी संपत आल्यावर हा रोबो स्वतःहून आपल्या चार्जिंग डॉकवर जाऊन पुन्हा चार्ज होतो. त्यामुळे त्याला उचलून चार्जिंगला लावण्याची कटकटही उरत नाही. जागतिक बाजारपेठेत या फिरत्या स्मार्ट पेट रोबोची किंमत भारतीय चलनात अंदाजे १७ हजार रुपयांपासून सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT