युवराज इंगवले
फॅशन, डिझायनिंग यासारख्या क्षेत्रांत जगभरातील अनेक महिलांनी ठसा उमटवला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे पॅट मॅक्ग्रा. जग तिला ‘मदर ऑफ मेकअप’ म्हणून ओळखते. तिचा मेकअप क्षेत्रातील प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे; पण आता तिची कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.
पॅट मॅक्ग्रा या लंडनमधील कृष्णवर्णीय मुलीने आईच्या स्वयंपाकघरातून मेकअपचा प्रवास सुरू केला होता आणि तो पॅरिस-मिलानच्या जगप्रसिद्ध रॅम्पपर्यंत नेला. पॉप स्टार मॅडोना, टेलर स्विफ्ट, किम कर्दाशियन ते रिहाना यांसारख्या रेड कार्पेटवर झळकणार्या चेहर्यांवर तिचा ब्रँशचा स्पर्श झाला आहे. 2015 मध्ये सुरू झालेला तिचा ब्रँड पॅट मॅग्राथ लॅबस 2018 पर्यंत 9000 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करणारा सौंदर्य व्यवसाय बनला. अशी कामगिरी करणारा कृष्णवर्णीय महिलेच्या मालकीचा हा पहिलाच ब्युटी ब्रँड ठरला.
मात्र, आठ वर्षांनंतर याच कंपनीला अमेरिकेत कर्जमुक्ती, दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज करावा लागला. कंपनीवर सुमारे 453 कोटी रुपयांहून अधिक कर्ज असल्याचे सांगण्यात आले. खरे तर, पॅरिस अथवा मिलान फॅशन वीकमध्ये 70 ते 80 मोठ्या सुटकेस घेऊन येण्यासाठी पॅट प्रसिद्ध आहे. प्रत्येक सुटकेसमध्ये हजारो आयशॅडो, ग्लिटर आणि तिच्या विशेष गुप्त फॉर्म्युल्यांचे साहित्य असते. तिचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला प्रॉडक्ट ‘गोल्ड 001’ कोणत्याही हायटेक प्रयोगशाळेत नव्हे, तर तिच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात तयार झाला होता. धातूसारखी झळाळी असलेला परिपूर्ण गोल्ड शेड तयार करण्यासाठी तिने हाताने पिगमेंट मिसळले आणि तयार झालेला रंग पॅरिस फॅशन वीकमध्ये सादर होताच काही मिनिटांत ऑनलाईन सोल्ड आऊट झाला होता.
2024 मधील एका शोमध्ये तिने मॉडेल्सच्या चेहर्यावर ‘ग्लास-स्किन’ इफेक्ट निर्माण केला होता. मॉडेलचा चेहरा काचेच्या बाहुलीसारखा पारदर्शक आणि चमकदार दिसत होता. सोशल मीडियावर अनेक आठवडे याच लूकची चर्चा सुरू होती. एकीकडे हे सर्व ग्लॅमर आणि यश येत असताना तिच्या कंपनीची आर्थिक घडी मात्र विस्कटत होती. वेगाने केलेला विस्तार, मोठ्या प्रमाणावरील मार्केटिंग खर्च, पुरवठा साखळीतील अडथळे आणि रिटेल भागीदारीवरील वाढलेल्या खर्चामुळे तिची कंपनी दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर आली आणि अखेर कर्जमुक्तीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.
ब्रिटनमध्ये जमैकन वंशाच्या सिंगल मदरच्या घरी जन्मलेल्या पॅट मॅक्ग्रा हिला बालपणापासूनच फॅशनची आवड होती. 1990 च्या दशकात सोल सेकंड सोलच्या सिंगर कॅरॉन व्हिलरसोबत टूर करताना पॅट मॅक्ग्राला मोठी संधी मिळाली. त्यानंतर फोटोग्राफर स्विटव्हन मईसेलसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून तिचा प्रवास झपाट्याने झाला. प्राडा, लुई व्हिटॉन आणि व्हर्साचे यांसारख्या दिग्गज फॅशन हाऊसेसची ती पहिली पसंती होती. आईच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला तिचा प्रवास फॅशन विश्वात प्रेरणादायी ठरला आहे. सध्या तिला आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागत असले, तरी तिची सर्जनशीलता आणि जिद्द अद्याप तितकीच तेजस्वी आहे.