अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीनाथ श्री विठ्ठलाच्या भेटीची आर्त ओढ भाविक मनाला कशी लागते हे माऊली श्री ज्ञानोबारायांनी या गोड अभंगातून नेमकेपणाने सांगितलेले आहे. विठ्ठल-रखुमाई हे भक्तांचे माय-बापच आहेत आणि पंढरी हे माहेरच आहे. संत एकनाथांनीही ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई, माझी विठ्ठल-रखुमाई’ असे एका अभंगात म्हटलेले आहे. अशा विठ्ठलभेटीच्या ओढीने वर्षातील अनेक एकादशींना वारकरी पंढरीला जात असतात. त्यामध्ये आषाढी एकादशीचे एक वेगळेच महत्त्व आहे. देवशयनी किंवा आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असून, रविवारी त्यानिमित्त नेहमीप्रमाणेच अवघी पंढरी दुमदुमणार आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी दाखल होतील. देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक महत्त्वाची तिथी आहे.
वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर निद्रिस्त होतात. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हाच काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार विशेषतः या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे, भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि मंत्रांचा जप करावा, असा प्रघात आहे. आषाढी वारीनिमित्त यंदाही महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करत, भूवैकुंठ पंढरीकडे पायी चालत येत आहेत. ‘जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर’ अशी ख्याती असलेल्या पंढरपुरात पोहोचताच चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाईल.
या दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूतून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरातून निवृत्तिनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंची आणि उत्तर भारतातूनही कबीरांची पालखी येते. ज्ञानदेव-नामदेवांपासून ते निळोबांपर्यंत म्हणजे 13 व्या शतकाच्या शेवटच्या चरणापासून ते 17 व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा, जवळपास पाच शतकांचा काळ हा प्रामुख्याने वारकरी संत साहित्याच्या निर्मितीचा काळ आहे. खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या वारकरी साहित्याने मराठी भाषा घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचसोबत मराठी माणसाच्या विचारपद्धतीवरही अनुकूल प्रभाव पाडला. निळोबाराय पिंपळनेरकर हे वारकरी संप्रदायातील अखेरचे संत कवी. वारकरी संतांचा कवित्वाशी जवळचा संबंध असतो. निळोबांच्या पश्चात पुढे आलेल्या शाहिरांवर संतकाव्याचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. विठ्ठल, पंढरपूर आणि संतांची महती सर्व शाहिरांनी गायलेली आढळते. तुकोबांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांनी देहू देवस्थानचे संस्थान केले. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची संयुक्त पालखी सुरू करून, तिला ज्ञानबा-तुकाराम या भजनाची जोड दिली.
देहूमधील तुकोबांच्या वंशजांचे देवस्थान व फड ही वारकरी पंथातील एक मुख्य परंपरा होय. मधल्या काळात तुकोबांचे शिष्य निळोबाराय पिंपळनेरकर यांच्याकडून प्रचलित झालेली शिष्यपरंपरा, शंकरस्वामी सिन्नरकर यांच्या मार्फत वासकरांच्या घराण्यात आली. मल्लाप्पा वासकर हे या घराण्याचे मूळ पुरुष होत. देहूतील देहूकरांचे एक घराणे पंढरीला येऊन, त्यांनी तेथे स्वतंत्र फड स्थापन केला होता. नंतर आणखी एक घराणे येऊन, त्यांनीही एक स्वतंत्र फड मांडला. अशाप्रकारे देहूकर आणि वासकर अशा दोन्ही परंपरा पंढरीत आल्या. देहूतही गोपाळबाबा, पांडुरंगबाबा, मुरलीधरबुवा यांच्यासारखे विद्वान आणि कर्तबगार पुरुष होऊन गेले. लोकहितवादींनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेबद्दल आत्मीयतेने आणि गौरवाने लिहिले आहे.
ज्याच्या गळ्यात माळ व हातात पताका, तो कोणत्याही जातीचा असला, तरी त्याची एकच जात आहे, असे वैष्णव समजतात. वारीत सर्व जातींचे भाविक एकमेकांच्या पायी पडतात, याचा उल्लेख लोकहितवादींनी केला आहे. वारकरी सत्य बोलण्याची प्रतिज्ञा करतात आणि अभंग गात व नामस्मरण करत पंढरपुरास, देहूस व आळंदीस जातात. ऊन-पाऊस, थंडी-वारा यांची पर्वा न करता लोक अनेक पावले चालत राहतात. श्रीमंत सरदार संत हैबतबाबा आरफळकर यांनी लष्करी साज व शिस्तीमध्ये माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला, जो अजूनही त्याप्रमाणेच होत आहे. शतकानुशतके चाललेल्या या वारीत कितीही अडचणी आल्या, तरी माळकर्यांच्या मार्गक्रमणेत बाधा येत नाही. पंढरीची वारी ही एक साधना आणि व्रत आहे. स्वकमाईतून दिंडीला पाचशे ते काही हजार रुपये वारकर्यांकडून भिशी दिली जाते.
अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात; तर बर्याच ठिकाणी अन्नदातांकडून अन्नदान केले जाते. सरकारने वारीच्या वाटेवर करायच्या सोयी-सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी निधी खर्च करावा, अशी सूचना केली जात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे पार पडलेले सुरेख गोल रिंगण आणि पालखी सोहळा भेटीतून ज्ञानेश्वरमाऊली आणि सोपानदेव यांची बंधुभेट याने यावेळचा गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला. तर दुसरीकडे, तुकोबांच्या पालखी सोहळ्यात तोंडले बोंडले येथे धावा केला. दोन्ही संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला असून, लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. महाराष्ट्राला सुखसमृद्धी लाभो, हीच आषाढी एकादशीनिमित्त पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना!