पाकपुरस्कृत दहशतवादाचे बदलते तंत्र pudhari photo
संपादकीय

पाकपुरस्कृत दहशतवादाचे बदलते तंत्र

पुढारी वृत्तसेवा
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संरक्षण विश्लेषक

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यातून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे बदलते तंत्र समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘टार्गेट किलिंग’चा प्रवाह काश्मीरमध्ये दिसून येतच होता; पण धर्म विचारून हत्या करण्यातून दहशतवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ताज्या हल्ल्याच्या माध्यमातून इतर धर्मीयांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये, असा इशारा दहशतवाद्यांना द्यावयाचा आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; पण पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले आहेत. साधारण अडीच दशकांपूर्वी 2000 मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 30 जणांचा बळी गेला होता.

2001 मध्ये शेषनागमध्ये तीर्थाटनाला गेलेल्या भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 13 जण मारले गेले होते. 2002 मध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये अमरनाथ यात्रा आटोपून घरी परतत असलेल्या भाविकांवर झालेल्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तथापि, यावेळच्या हल्ल्यामध्ये पर्यटकांना नावे आणि धर्म कोणता हे विचारून गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे या हल्ल्याला एक वेगळी किनार आहे.

वस्तुतः पहलगाममध्ये वापरण्यात आलेली पद्धत पाहिली असता अल कायदा, आयसिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून जागतिक समुदायाला भारत एक गोष्ट सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ती म्हणजे पाकपुरस्कृत दहशतवादाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असून तेथून त्या भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम करत आहेत. या सर्व संघटना धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून इतर धर्मीयांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये, असे त्यांना सांगायचे आहे. सध्या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या भागातून जाणार आहेत. त्यांना इशारा देणे, त्यांच्या मनात दहशत निर्माण करणे हा पहलगाममधील हल्ल्यामागचा एक प्रमुख तात्कालिक हेतू आहे.

दुसरे असे की, या हल्ल्यातून दहशतवाद्यांनी अलीकडील काळात सुरू केलेल्या ‘टार्गेट किलिंग’च्या नव्या प्रवाहाला आणखी एक भेदक वळण दिले आहे. धर्म विचारून हत्या करण्यातून दहशतवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. मागील काळात युरोपमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेकडून हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्येही सर्वसामान्यांनाच टार्गेट करण्यात आले होते. असे करण्याने संबंध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात, माध्यमांमधून प्रसिद्धी मिळते. पाकिस्तानचा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये विशिष्ट वेळा साधून दहशतवादी कारवाया घडवून आणणे. यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा त्यांचा हेतू सफल होतो. गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिल्यास पाकिस्तानने नेहमीच भारताच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या प्रसंगांवेळी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले किंवा शस्त्रसंधीचे उल्लंघन असे प्रकार केलेले आहेत.

गतवर्षी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना, शेजारी राष्ट्रांचे प्रमुख भारतात आलेले असताना दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौर्‍याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असताना त्याआधी कठुआमध्ये हल्ला घडवून आणला होता. सन 2000 मध्ये बिल क्लिंटन भारत भेटीवर आले होते आणि भारतीय संसदेत ते भाषण देत होते त्यावेळीही अशाच प्रकारचा हल्ला काश्मीरमध्ये झाला होता. यामागे एक सुनियोजित रणनीती आहे, ती म्हणजे पाकिस्तानला अशा प्रकारचे हल्ले करून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करायचे आहे.

आताही पहलगाममधील हल्ल्याची वेळ पाहिली असता ही बाब स्पष्टपणाने लक्षात येते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आलेले होते. ट्रम्प प्रशासनाचा कार्यभार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा विदेश दौरा पार पडला आणि यासाठी त्यांनी भारताची निवड केली. त्यामुळे हा दौरा केवळ भारताच्या द़ृष्टीनेच नव्हे तर जगाच्या द़ृष्टीनेही महत्त्वाचा होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेलेले होते आणि भारत व सौदीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या होणार होत्या. अशा वेळी इस्लामिक जगतामधील माध्यमे आणि पश्चिमी देशांमधील मीडिया भारतकेंद्री बनलेला होता. ही वेळ साधून पहलगाममधील हल्ला करण्यात आला, जेणेकरून याला जगभरात प्रसिद्धी मिळेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील हल्ले वगळता उर्वरित भारतामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. सामाजिक वातावरण शांततेचे आहे. कोव्हिडोत्तर काळात जागतिक पर्यटकांचा भारताकडील ओढा वाढत चालला आहे. या सर्व सकारात्मक प्रवाहांना ठेच पोहोचवण्याचा उद्देशही अशा हल्ल्यांमागे असतो. पाकिस्तान या माध्यमातून भारतात अस्थिरता, अशांतता आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिसरी बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये भारतात थेट विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत हा पसंतीचा देश ठरत आहे. याचे कारण भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. अशा परिस्थितीत अशांतता, अस्थिरता निर्माण करून ही गुंतवणूक कमी कशी करता येईल, असा पाकिस्तानचा प्रयत्न असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT