पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर तुफानी हल्ले केले. पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी केली. 24 सप्टेंबरपर्यंत ती लागू आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी नुकतीच बांगला देशला भेट दिली. 1971 च्या युद्धात पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी किमान 10 लाख स्थानिक महिलांवर अत्याचार केले आणि लाखोंची हत्या केली होती. आधी 1971 च्या घटनांबद्दल पाकिस्तानने माफी मागावी आणि त्यानंतरच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची चर्चा करू, अशा भाषेत बांगला देशने दार यांना सुनावून, त्यांना जागा दाखवून दिली. पाकिस्तान केलेली पापे नेहमीच दडवत आला असून, भारताविरुद्ध अनेक कारवाया करूनही आजपर्यंत त्याबाबत तो कानावर हातच ठेवत आला आहे. मात्र, पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर जगभर नाचक्की झालेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा करण्यासाठी मनधरणी केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत पाकिस्तानचे नऊ हवाई तळ आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ नेस्तनाबूद केले गेले. ‘वॉटर स्ट्राईक’ करत, सिंधू पाणीवाटप करारास स्थगिती दिली गेली. नाक दाबल्यावर तोंड उघडते, तशी अवस्था झाल्यानेच पाकिस्तानी माध्यमांसोबत संवाद साधताना, दार यांनी नरमाईची भूमिका घेतली. सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारतासोबत बोलणी करण्यास तयार आहोत. कधी चर्चा होईल, तेव्हा ती केवळ काश्मीरवरच नाही, तर सर्व मुद्द्यांवर होईल. पाकिस्तान व्यापार ते दहशतवादविरोधी उपाय अशा सर्व आघाड्यांवर भारतासोबत काम करण्यास आणि सहकार्यास तयार आहे, असे दार यांनी म्हटले आहे. वास्तविक ‘रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पूर्वीच ठणकावून सांगितले आहे. तर दहशतवादास खतपाणी घालण्याचे काम सुरूच असल्याने, पाकसोबत चर्चा करण्यात बिलकूल स्वारस्य नसल्याची भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मांडली आहे. या शेजारी देशाचे शेपूट वाकडे ते वाकडेच, हे विसरता कामा नये. जैश-ए-मोहम्मद ही तेथील दहशतवादी संघटना प्रशिक्षण तळ आणि लपण्याच्या ठिकाणांचे नेटवर्क पुन्हा सुरू करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
‘जैश’ने त्यांच्या पायाभूत सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी निधी संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सशस्त्र दलांनी ‘जैश’चे बहावलपूर मुख्यालय आणि दहशतवादी लाँचपॅड नष्ट केले होते. खरे तर, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सचे लक्ष टाळण्यासाठी ‘जैश’ने ई-वॉलेटद्वारा देणग्या गोळा करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारावर नजर ठेवली जाणार नाही, असा ‘जैश’चा अडाखा आहे. हे पैसे ‘जैश’चा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यांमध्ये ‘इझी पैसा’आणि ‘सदापे’ यासारख्या पाकमध्ये लोकप्रिय असलेल्या ई-वॉलेटद्वारा जमा केले जात आहेत. याप्रकारे सुमारे 400 कोटी रुपये उभारण्याची तयारी केली जात असून, त्यामधून संपूर्ण पाकिस्तानात 300 पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे उभारले जाणार आहेत. याशिवाय ‘जैश’चे कमांडर मशिदींमधून शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी देणग्या गोळा करत आहेत.
गाझामध्ये मानवतावादी मदतीच्या नावाखाली पैसे उभारले जात आहेत. भारत म्हणजे महामार्गावर धावणारी मर्सिडीज कार आहे आणि पाकिस्तान हा खडी भरलेला डंपर ट्रक आहे, असे उद्गार पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच काढले होते. त्याचा राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला होता. दोन देशांना एकत्र स्वातंत्र्य मिळाले आणि एकाने कठोर परिश्रम, योग्य धोरणे आणि दूरद़ृष्टीने ‘फेरारी’सारखी अर्थव्यवस्था निर्माण केली; तर दुसरा देश अजूनही डंपरच्या स्थितीत आहे, हे पाकिस्तानचे स्वतःचे अपयश आहे, असा जोरदार टोला राजनाथ सिंह यांनी लगावला होता. मुळात दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा वणवा पेटलेला आहे.
भारताविरोधात नेहमीच कुरापती काढणारा हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने 1984 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जवळपास 12 वेळा मदतीसाठी झोळी पसरली, तरीही तेथील महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही; पण तेथील राजकारणी, लष्करी अधिकारी आणि सत्ताधारी वर्गावर या आर्थिक संकटाचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. उलटपक्षी यातील बरेच जण अब्जाधीश झालेत. मार्च 2025 पर्यंत या देशावर भारतीय रुपयात 23 लाख कोटी रुपये एवढे कर्ज आहे. 2015 मध्ये कर्जाची रक्कम 2 लाख कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत कर्ज दहापटीपेक्षा जास्त वाढले; मात्र त्याचवेळी मुनीर यांची संपत्ती सात कोटी रुपये, तर माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची संपत्ती निवृत्तीच्या वेळी 1 हजार 270 कोटी रुपये होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची संपत्ती 180 कोटी रुपये, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 262 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. या राज्यकर्त्यांनी एकीकडे जनतेची लूट करून, दुसरीकडे भारतविरोधी कृत्ये करण्याचा सपाटा लावला आहे.
काश्मीरचा प्रश्न उगाचच उकरून काढायचा आणि स्थानिक जनतेला भावनिक प्रश्नात गुंतवून ठेवायचे, असे हे षड्यंत्र. काश्मीरबाबत तर पाकिस्तानशी चर्चा करण्याचे काहीएक कारण नाही. फक्त पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्याचे तेवढे बाकी आहे, हे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रथम दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा. तोपर्यंत कोणतीही बोलणी होणार नाहीत, हीच भारताची ठाम भूमिका. कर्जबाजारी झाल्यामुळे, पाकला भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे आहेत. सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे तोंडचे पाणीच पळाले असून, त्याच्या झळा बसू लागल्यानेच भारतासमोर पुन्हा लोटांगण घालण्याचे नाटक पाककडून सुरू आहे, इतकेच!