निष्पाप लोकांची ज्यांनी हत्या केली, त्यांच्यावरच हल्ला केला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मागील नैतिक कारण अधोरेखित केले, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवल्याबद्दल संपूर्ण देशात समाधानाची भावना आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अचूकतेने, सतर्कतेने आणि संवेदनशीलतेने पार पाडले. हनुमानाने अशोक वाटिकेला आग लावताना जे केले, तेच आम्हीही केले. म्हणजे निरपराध लोकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली, असे सार्थ प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. कोणत्याही देशाला आपल्या भूमीवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असतोच.
दहशतवाद्यांचे मनोधैर्य नष्ट करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या छावण्या व पायाभूत सुविधांवर कारवाई करण्यात आली. मात्र यामुळे पाकिस्तानचे डोके लगेच ठिकाणावर येईल, अशी अजिबात अपेक्षा नाही. त्यामुळे जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील गावांना लक्ष्य करून, पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केला. त्यात चार मुले आणि एका सैनिकासह किमान 13 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 57 जण जखमी झाले. गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या मार्यात घरे, वाहने आणि गुरुद्वारासह अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यामुळे शेकडो नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. हल्ला करताना पाकिस्तानने सामान्य माणसांच्या जीवांची पर्वाही केली नाही. अर्थात पाकिस्तानच्या या कुरघोडीला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी, भारताने हवाई हल्ला केल्यास शत्रूची विमाने उडवून टाकून समुद्रात फेकून देऊ, असे फुत्कार सोडले आहेत. त्याचवेळी त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ मात्र दोन्ही देशांतील तणाव कमी केला पाहिजे, असे म्हणत आहेत! वास्तविक भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान भयभीत झाला आहे.
भारताने आमच्या धरणांना लक्ष्य केल्याचा, तसेच निष्पापांचा बळी घेतल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे. भारताच्या हल्ल्यात 26 पाक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून त्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. तसेच पहलगाम प्रकरणाची चौकशी एखाद्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला; पण भारताने त्यास प्रतिसाद दिला नाही, असे शरीफ वारंवार सांगत आहेत. मुळात पहलगाम कांडाशी काहीही संबध नाही, असा खोटा दावा पाक करत आहे. मग तेथे आलेले दहशतवादी आकाशातून टपकले का? यापूर्वीच्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी पाकिस्तानने स्वीकारलेली नाही. पाच वर्षांपूर्वी कुख्यात डॉन दाऊद इब—ाहिम कराचीत असल्याची कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. पण त्यानंतर अवघ्या 24 तासांत पाकने या वक्तव्यावरून घूमजावही केले होते.
खरे तर, पाकच्या परराष्ट्र खात्याने विविध नावांनी बनवलेले दाऊदचे अनेक पासपोर्ट आणि नॅशनल आयडेंटिटी नंबरही जाहीर केला होता. मुंबईवरील हल्ल्यात असलेला कसाब भारताच्या तावडीत सापडला, तेव्हा तो आमच्या देशाचा नागरिकच नाही, असे पाकिस्तानने जाहीर केले. पण ‘जिओ टीव्ही’ने कसाब हा पाकमधील फरीदकोटचा असल्याचे उघड केल्यानंतर पाक सरकारनेही कसाब पाकिस्तानी असल्याचे मान्य केले. मुंबईवरील हल्ल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेले होते. या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदविरोधात खटला सुरू करा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर, आमच्याकडे पुरावे नाहीत, भारताने पुरावे द्यावेत, असा पवित्रा पाकने घेतला. तेव्हा कट पाकच्या भूमीत रचला गेल्यामुळे पुरावे तुम्ही शोधा, असे भारताने सुनावल्यावर पाकिस्तानी अधिकार्यांनी मौन बाळगले होते. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीने दिलेल्या साक्षीत लष्कर-ए तोयबा, पाकिस्तानी लष्कर व आयएसआयचे कसे जवळचे संबंध आहेत, याची माहिती त्याने दिली होती.
पण कितीही पुरावे दिले तरीही दहशतवादाबाबत पाकिस्तान कानावर हात ठेवत आला आहे. त्यामुळे पकिस्तानकडून शहाणपणा व समजूतदारपणाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमीवर भारताने आधुनिक विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून, ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते केले. पाकिस्तानी हवाई दलाच्या रडारवर उमटण्यापूर्वीच या क्षेपणास्त्राने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तीन किलोमीटर आत घुसून कारवाई केली होती. पुलवामानंतर बालाकोटमध्ये जो हवाई हल्ला भारताने केला, त्यावेळी नियंत्रण रेषेच्या पलीकडे 60 किलोमीटर शिरून लक्ष्यभेद करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तर सीमेपलीकडे 150 किलोमीटरवर असलेल्या बहावलपूरपर्यंत घुसून कारवाई केली. खास करून, मुरिदके, बहावलपूर आणि कोटली येथील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यास विशेष महत्त्व आहे.
कारण कारगिल युद्धाच्या काळात काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यापासून ते मुंबई हल्ल्यापर्यंतच्या सर्व कृत्यांची तेथून आखणी करण्यात आली होती. 200 एकरांत वसलेले मुरिदके हे हाफिझ सईदच्या जमात उद दावाचे मुख्यालय आहे; तर बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे मुख्य केंद्र असून, मसूद अझरने तेथूनच सर्व कारवाया केल्या. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली हे हिजबुल मुजाहिद्दीनचे मुख्य केंद्र आहे. हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनने 1990च्या दशकात तेथूनच काश्मिरी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देऊन, हिंसक कृत्ये करण्यासाठी परत भारतात पाठवले. सीमेपलीकडून होणार्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक ठोस दस्तावेज देऊनही पाकने कधीच कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भारताच्या या मोहिमेला जगातील प्रमुख देशांनी विरोध न करता केवळ संयमाचे आवाहन केले आहे! ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या निर्णायक कारवाईचे काँग्रेससह देशातील सर्व विरोधी पक्षांनीही कौतुक केले आहे. पाकिस्तानच्या विरोधात ‘हम सब एक हैं’ अशीच सर्वपक्षीय भूमिका असल्यामुळे पाकिस्तानलाच आता नमते घ्यावे लागणार आहे. अन्यथा त्याला पुन्हा एक दणका द्यावा लागेल!