संपादकीय

पहिला चहा : कोलांटउडी की डिप्लोमसी?

पुढारी वृत्तसेवा

(तेल करारानंतर ट्रम्प आणि पुतीन यांचा फोन संवाद)

ट्रम्प : हेलो, व्लादिमीर! माझ्या मित्रा! कसा आहेस? तुझं तेल छान आहे. म्हणजे रशियाचं... अगदी अप्रतिम! जगात कुणाचं तेल इतकं छान नाही.

पुतीन : डोनाल्ड, कालपर्यंत तू माझं तेल विकत घेणाऱ्या देशांना टॅरिफ लावत होतास आणि आता माझ्याशी तेलाचा करार?

ट्रम्प : (खदाखदा हसत) यू नो व्लादिमीर, आय ॲम डीलमेकर. यालाच म्हणतात बिझनेस! काल मी निर्बंध लादले, आज मी तेल घेतलं. उद्या काय करीन, हे सांगितलं तर शेअर बाजारात माझी किंमत कमी होईल.

पुतीन : ही तुझी नेहमीप्रमाणे कोलांटउडी... तुझ्या धोरणात सातत्य नाही...

ट्रम्प : सातत्य? ते जुन्या राजकारण्यांचं लक्षण आहे. मी आधुनिक राजकारणी आहे. माझं धोरण म्हणजे लिफ्ट. कधी वर, कधी खाली आणि बटण माझ्याच हातात!

पुतीन : म्हणजे तुझ्या शब्दाला काही किंमत नाही?

ट्रम्प : प्रचंड किंमत आहे; पण ती रोज बदलते. शेअर बाजारासारखी. माझ्या विधानांचा निर्देशांक बघितलास, तर वॉल स्ट्रीटलाही चक्कर येईल!

पुतीन : भारताने आमचं तेल घेतलं तर टॅरिफ आणि अमेरिकेने घेतलं तर मैत्री?

ट्रम्प : हाहाहा.... फ्लेक्झिबल डिप्लोमसी आहे ही मित्रा, समजून घे..!

पुतीन : डिप्लोमसी की मध्यावधी निवडणुकीचं राजकारण? पण, तुमच्या पक्षाचा पराभव झाला तर?

ट्रम्प : मग, तेलाच्या किमतींना दोष देऊ. नाही तर माध्यमांना. नाही तर डेमोक्रॅट्सना. पर्याय खूप आहेत. माझ्याकडे दोष देण्यासाठी माणसांची कमतरता नाही!

पुतीन : (खदखदून) डोनाल्ड, तुझी परराष्ट्रनीती म्हणजे फिरता दरवाजा. आत कोण जातं, बाहेर कोण येतं, हे कळेपर्यंत धोरण बदललेलं असतं!

ट्रम्प : थँक यू! तू माझी स्तुती छान करतोस. व्हाईट हाऊसमध्ये नोकरी हवी असेल, तर सांग!

पुतीन : नको. तुझ्या मंत्रिमंडळात काम केलं, तर रोज सकाळी कालचं विधान नाकारावं लागेल. माझ्या स्मरणशक्तीवर एवढा अन्याय नको! बाकी या लवचिक भूमिकेला रबरही लाजेल.

ट्रम्प : (केसांवरून हात फिरवत) यू नो, व्लादिमीर, मी अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे. जगाला तत्त्वज्ञान नकोय. इंधन हवंय. गाडीला पेट्रोल लागतं, ट्रकला डिझेल लागतं आणि राजकारण्याला प्रसिद्धी! माझं भाषण सुरू होतंय... आता करार झालाय... बोलत राहूच...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT