चिरंजीव राहुलचे शहेनशहा यांसी पत्र,
पत्र वाचल्या वाचल्या उत्तरादाखल कळवावे. कारण आधीच आम्हाला गुजराती वाचता येत नाही. आमचा ट्रान्सलेटर शाब्दिक घोळ घालतो आणि आमचा गैरसमज वाढतो. आपल्याबाबतीत असे आमच्याकडून बऱ्याचदा झाले आहे त्याबद्दल माफ करावे. आपण विद्यार्थ्यावर आंदोलनप्रसंगी गोळीबार करण्याचे आदेश दिला हा आमचा आरोप.
आता आपले सत्ताधारी म्हणत आहेत आम्ही लोकसभेत गोळीबार केला आणि तडक सभागृहाबाहेर निघून आलो. लोक इतके खवळले की, आम्हाला वाटले, आमच्या हातात स्टेन गन आहे. त्या आवेशातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला बाहेर निघून जावे लागले. आपण वयाने मोठे आहात म्हणून मी माफी मागेन की नाही माहिती नाही. अजून ते ठरायचे आहे. तूर्तास या पत्राला माफीचा साक्षीदार मानला तरी चालेल. आपली मर्जी. आपण लोकसभेत हजर नव्हता. त्यामुळे समोरासमोर माफीनामा हजर करता आला नाही. पण तुम्ही तिथेही तो प्रसंग हुकलात. माफी मागायचा प्रश्नच उरला नाही.
आपण नसल्याने सभागृह खायला उठल्यासारखे भासत होते. आपणास माहीत आहे, सध्या विषय कोणताच नसल्याने मी आपल्या विषयात लक्ष घातले आहे. तसंही एपस्टीन आणि इतर गैरव्यवहाराबाबतही आमच्या बोलण्यावर कोणी दखल घेतली नाही. विरोधी पक्ष नाराज होणे साहजिक आहेच. आपणही आमच्याविरुद्ध बाळबोध आरोप करताच, ते आम्ही निमूट झेलतो. रिजिजू आणि सिंह यांनी तर लोकसभेत आम्हास मांजर करून टाकले. विधेयक आवाजी मतपद्धतीने मंजूर झाले.
पण विद्यार्थ्यांच्या समस्येचा प्रश्न सुटेल की नाही माहिती नाही. त्यांच्या हूं या हूं या ने आमचे डोके बधिर झालेले आहे. पुन्हा ते ऐकण्याची वेळ येऊ नये. सभागृहात आमच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेत अजून डोके बधिर झाले. आपणास आमची कळकळ येईल असे वाटले म्हणून पत्र लिहिण्यास घेतले. कोणत्याही आपल्या विरोधातल्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी आमच्याविरुद्ध घोषणाबाजी केलेली आठवत नाही आणि ३८ मिनिटांसाठी सभागृह खोळंबलेलेही आठवत नाही. आम्हाला कोणी सीरियसली घेतलेच नव्हते. आज इतके सीरियसली घेतल्याने बरे वाटत आहे. आम्ही राजकारण शिकतोय हळूहळू. तोवर सांभाळून घ्यावे. आमचे प्रथम गुरू आपणच असाल. कालच्या गुरुपौर्णिमेच्या आज शुभेच्छा. कळावे!
आपला राहुल!
(पत्राचे उत्तर) चलो माफ कर दिया.
आपला शहेनशहा