‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज भव्य समारंभाने सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या विविध पैलूंचा घेतलेला वेध.
अभिनेता आमीर खानला ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. आमीर खानची परफेक्शनिस्ट ही प्रतिमा गेल्या 25 वर्षांतली; पण मी त्याही आधी खर्या अर्थाने ‘मि. परफेक्शनिस्ट’ पाहिला, तो तब्बल चार तपांपूर्वी, 48 वर्षांपूर्वी! ते म्हणजे आम्हा सर्वांचे साहेब. दै. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक आणि चेअरमन एमिरेटस् पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव. ते जेवढे परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले आहेत, तेवढेच सव्यसाची आहेत आणि त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष तर पावलोपावली अनुभवाला आलेली आहे. स्वयंभू संपादक ही त्यांची प्रतिमा जेवढी तेजस्वी आहे, तेवढेच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य बड्या बड्या नेत्यांनाही मागे सारणारे आहे.
साहेबांनी जवळजवळ पाच तपे आपल्या सव्यसाची पत्रकारितेचा ठसा केवळ उमटवला असे नाही, तर त्यांनी मराठी पत्रसृष्टीतच नव्हे, तर भारतीय वृत्तपत्रसृष्टीत स्वतःचे असे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच पत्रमहर्षी ही त्यांची स्वयंसिद्ध पदवी ठरली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतरावदादा पाटील, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. राजीव गांधी, कु. मायावती, जॉर्ज फर्नांडिस, लता मंगेशकर, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (ही यादी खूप मोठी आहे) यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले. त्यांच्या दूरद़ृष्टीने, सव्यसाची कर्तृत्वाने ‘पुढारी’चा विस्तार तर झालाच शिवाय ‘पुढारी’ने सर्वसामान्य जनतेशी अतूट जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले.
आज महाराष्ट्रात अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपादक आहेत. साहेबांच्या सहवासात अनेकांची जडणघडण झाली, ते कोणीही नाकारणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या काय, आज फर्स्ट लीड काय, अशी साहेबांनी विचारणा केली नाही, असा क्वचितच एखादा दिवस असेल. परदेशात असले, तरी त्या त्यावेळी तेथूनही त्यांनी रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आहे. महत्त्वाची बातमी दाखवल्यानंतर ते अगदी बारकाईने वाचतात आणि बातमीतील उणिवा, त्रुटी अचूक दाखवतात. जोपर्यंत त्यांच्या कसोटीला ती उतरत नाही, तोपर्यंत हे पुनर्लेखन करावे लागते. मराठीवर आणि इंग्रजीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे. त्यामुळे बातमीत अगदी अचूक शब्द वापरण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. इंग्रजी वृत्तसंस्थेच्या एखाद्या बातमीतील शब्दाविषयी काही शंका वाटली, तर ते मूळ इंग्रजी कॉपी मागवतात. तो शब्द पाहतात आणि त्या शब्दाचा मराठी प्रतिशब्द अगदी समर्पक सांगतात. मथळा आक्रमक आणि आकर्षक असला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या पसंतीला उतरण्यासाठी मथळ्यात अनेकदा बदल केला जातो आणि त्यातून अर्थातच परिणामकारक मथळा तयार होतो. अंकातील लेखासह अन्य मजकुरावरही त्यांचे लक्ष असते. ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यामुळे वादग्रस्त आणि बदनामीकारक बातम्यांबाबत त्यांनी दिलेले निर्णय नेहमीच बरोबर ठरले.
काहींना सहावे इंद्रिय असते, असे म्हणतात. साहेबांना ‘न्यूज सेन्स’ नावाचे सहावे इंद्रिय आहे. फर्स्ट लीडसाठी काही बातम्या दाखवल्या की, त्यातील कोणती बातमी फर्स्ट लीड करावी, कोणती सर्वाधिक वाचली जाईल, हे ते सांगतात. कोणती बातमी वाचकांना ‘अपील’ होईल, याविषयीचा त्यांचा अंदाज कधीही चुकलेला नाही. वृत्तपत्रसृष्टीत ‘लेआऊट’ हा शब्द रुळलेला नव्हता, तेव्हापासून साहेबांनी ‘पुढारी’च्या प्रत्येक पानाचा ‘लेआऊट’ हा आकर्षक झाला पाहिजे, यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. ज्या काळात फोर लाईन टाईप म्हणजे 48 पॉईंट ही पान एकच्या फर्स्ट लीडच्या (फर्स्ट लीड म्हणजे पान एकची सर्वात महत्त्वाची/ठळक स्वरूपात प्रसिद्ध होणारी बातमी) बातमीच्या मथळ्याचा टाईप, ही लक्ष्मणरेषा असायची आणि सिक्स लाईन म्हणजे 72 पॉईंटचा टाईप वापरणे, हा कपिलाषष्ठीचा योग असायचा, त्या काळात म्हणजे 1970 च्या दशकात साहेबांनी ठळक मथळे देण्याचे तंत्र पुढे आणले. त्यावेळची सारी प्रतिष्ठित वृत्तपत्रेही मोठा टाईप वापरायचा म्हणजे ‘अब्रह्मण्यम’ समजत. बातमीची प्रसिद्धी ठळकपणे करण्याबरोबर पानाची आकर्षक मांडणी करण्यावर साहेबांनी भर दिला आणि हा नवा प्रयोग सर्वसामान्य वाचकांच्या पसंतीला उतरला.
ज्या काळात कोल्हापूरसारख्या एका बाजूच्या शहरातच नव्हे, तर पुण्या-मुंबईसारख्या शहरांतील वृत्तपत्रांत एक ‘फोटो’ म्हणजे शंभर बातम्यांना वरचढ ठरतो, अशी द़ृष्टी फारशी नव्हती, त्या काळात 1970 च्या दशकात साहेबांनी फोटो जर्नालिझमचा पाया घातला. नवी दिल्ली येथे ‘पॅना’ नावाची फोटो पुरवणारी संस्था आहे. त्या संस्थेकडून देशातील आणि परदेशातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे फोटो साहेबांनी मागवायला सुरुवात केली. 1972 च्या निवडणुकीतील फोटो, 1974 च्या रेल्वे संपावेळचे फोटो, आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीतील फोटो, 1980 मध्ये इंदिराजी पुन्हा सत्तेवर आल्या त्यावेळचे फोटो असे कितीतरी फोटो तेव्हा चर्चेचा विषय बनले. कोल्हापूरचा ‘पुढारी’ तेव्हा मुंबईच्या वृत्तपत्रांशी तोडीसतोड स्पर्धा करीत असे. साहेबांची फोटोंची निवडही अगदी अफलातून अशी असते. फोटोत काय सुधारणा कराव्यात म्हणजे तोे अधिक उठावदार होईल, याविषयीच्या त्यांच्या सूचना अगदी मर्मग्राही असतात. एकदा एका दांडिया महोत्सवात सहभागी झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो आम्ही निवडला. फोटो चांगला होता. अॅक्शन चांगली होती. साहेबांनी फोटो पाहिला आणि फोटोमध्ये अभिनेत्रीचे डोळे मिटले असल्याचे निदर्शनास आणले. मग, त्यांनी दुसरा अधिक चांगला फोटो निवडला. अशी द़ृष्टी असलेला संपादक विरळाच!
1980 चे दशक निम्मे संपत आले, तरी छपाई उद्योगात खिळे जुळवून मजकूर कम्पोज करण्याचेच तंत्र बहुतेक ठिकाणी रूढ होते. त्या काळात 1970 च्या दशकाच्या अखेरीलाच साहेबांनी मोनोटाईप मशिनरी बसवली आणि तंत्रज्ञानात नवे पाऊल टाकले. पाठोपाठच सी.आर.टी. इलेक्ट्रॉनिक ही मजकूर ऑपरेट करावयाची मशिनही बसवून साहेबांनी आधुनिक ऑफसेट छपाईचा श्रीगणेशा केला. या तंत्रात मजकुराच्या ब्रोमाईड (म्हणजे पट्ट्या) निघत. त्या पेस्ट करून त्याची छपाईसाठी प्लेट बनवली जाई. नव्या छपाई यंत्रावर डायलिथो पद्धतीने रंगीत छपाई होत असे. अशा रीतीने चार रंगी छपाईचा प्रारंभ ‘पुढारी’नेच केला. सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञाचा ध्यास बाळगलेल्या साहेबांनी 1987 च्या मार्च महिन्यात अत्याधुनिक प्लामाग कोरोसेट छपाई यंत्र आणले. भारतात अशी मशिनरी अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच होती आणि महाराष्ट्रात तर हे मशिन पहिलेच होते. या मशिनरीबरोबरच कॉम्प्युटर यंत्रणाही सुरू केली. देशामध्ये बड्या वृत्तपत्र समूहांतील मोजक्याच समूहांच्या बरोबरीने ‘पुढारी’ने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. छपाईचे नवतंत्र, संगणक यांच्या उदयाबरोबरच साहेबांनी दूरद़ृष्टीने नवे बदल आत्मसात केले.
साहेबांच्या द्रष्टेपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे उपग्रह छायाचित्र सेवा. असोसिएट प्रेस या संस्थेने उपग्रहामार्फत छायाचित्रे पाठवण्याचे तंत्रज्ञान भारतात आणले. कोल्हापुरातील ‘पुढारी’ आणि चेन्नईतील ‘हिंदू’ या केवळ दोनच वृत्तपत्रांनी सर्वप्रथम ही सेवा सुरू केली. 1998 मध्ये सुरू झालेल्या या सेवेने ‘पुढारी’त सार्या जगातल्या ठळक घडामोडींचे फोटो अगदी ज्या त्या दिवशी येऊ लागले आणि ‘पुढारी’च्या आकर्षक स्वरूपात आणि गुणवत्तेत मोठीच भर पडली. ए.पी. फोटो सर्व्हिस भारतात येण्याआधीच साहेबांच्या प्रेरणेने इंटरनेटमधून फोटो मिळवायला ‘पुढारी’ने सुरुवात केली होती. ‘इंटरनेट’ हा शब्द तेव्हा काही परवलीचा बनला नव्हता. त्यावेळी इंटरनेट तंत्रावर ‘पुढारी’ने हुकूमत मिळवली होती. दि. 31 ऑगस्ट 1997 रोजी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताचे फोटो इंटरनेटवरून मिळवून ते ‘पुढारी’त आठ कॉलम छापण्यात आले. लेडी डायनाच्या अपघाती मृत्यूची बातमी सनसनाटी, त्यात फक्त ‘पुढारी’तच फोटो म्हटल्यावर वाचकांच्या ‘पुढारी’वर उड्या पडल्या.
एकोणीसशे नव्वदच्या सुमारास साहेबांनी फॅक्सवरून हाफटोन मोडवर फोटो घेण्याचे तंत्र ‘पुढारी’त आणले होते. दि. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी फॅक्सने आलेले फोटो आणि या घटनेची सविस्तर, तपशीलवार बातमी, यातून त्यावेळी ‘पुढारी’ने खपाचा उच्चांकच केला होता. रात्री 8 वाजता सुरू झालेली छपाई दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजले, तरी चालूच होती आणि अंकाची मागणी सारखी सुरूच होती.
1980 पासून ‘पुढारी’च्या वेगवेगळ्या स्वतंत्र आवृत्त्या सुरू झाल्या आणि पाहता पाहता ‘पुढारी’चा विस्तार महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोव्यात झाला. 1980 च्या दशकापासून साखळी वृत्तपत्रे, भांडवलदार वृत्तपत्रे, उद्योगपतींची वृत्तपत्रे आणि राजकारण्यांची वृत्तपत्रे यांनी मुंबई-पुण्यातून महाराष्ट्राच्या अन्य भागांत हातपाय पसरायला सुुरुवात केली होती. जी स्थानिक दैनिके होती, त्यांचा या बड्या वृत्तपत्रांपुढे निभाव लागला नाही; पण ‘पुढारी’ मात्र या बड्या वृत्तपत्रांना केवळ पुरुनच उरला असे नाही, तर पुणे, मुंबई, छ. संभाजीनगर, नाशिकसह राज्याच्या विविध भागांत ‘पुढारी’ने या बड्या वृत्तपत्रांना तोडीसतोड आव्हान उभे केले. आज ‘पुढारी’च्या विविध ठिकाणांहून 23 आवृत्त्या प्रसिद्ध होतात. आय.आर.एस. ही देशपातळीवरील संस्था वृत्तपत्रांच्या वाचक संख्येचे सर्वेक्षण करते. या संस्थेने ‘पुढारी’ची वाचक संख्या एका अंकामागे सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढलेला आहे. कोल्हापुरातून पुणे-मुंबई-नाशिक-मराठवाडा आदी भागांत विस्तार झालेले ‘पुढारी’ हे एकमेव वृत्तपत्र! या उत्तुंग यशामागे साहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कार्यकर्तृत्वाचा जबरदस्त झपाटा आहे.
साहेबांनी नव्या पिढीबरोबर ‘पुढारी’चे सूर जुळवले. वेगवेगळ्या कल्पना सर्वप्रथम ‘पुढारी’तून पुढे आणल्या. अंकाची रविवारची परिपूर्ण अशी पुरवणी तीही रंगीत, आकर्षक स्वरूपात देण्याचा पायंडा ‘पुढारी’ने पाडला. ‘बहार’ ही रविवारची पुरवणी वाचकांना ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना ठरला. महिलांसाठी ‘कस्तुरी’, बाल वाचकांसाठी ‘अंकुर’ अशा पुरवण्या देण्याचा उपक्रम साहेबांनी सुरू केला. तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांचे आरोग्यविषयक समस्यांवरील लेख असलेली ‘आरोग्य’ पुरवणीही लोकांच्या पसंतीला उतरली. सर्वसामान्य वाचकाला अद्भुत घटनांविषयी कमालीचे कुतूहल असते. ते नेमके ओळखून साहेबांनी ‘विश्वसंचार’ हे पान स्वतंत्रपणे सुरू केले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘पुढारी’चे दीर्घकाळापासूनचे वाचक असलेले एक गृहस्थ दरवर्षी काही दिवस परदेशी जातात. मायदेशी परत आल्यानंतर ते ‘पुढारी’चे सारे अंक घेतात आणि ‘विश्वसंचार’ वाचून काढतात. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. ‘पुढारी’तील बदलाची इतरांनी नक्कल केली. अर्थात, अस्सल ते अस्सल, नक्कल ती नक्कल!
1990 च्या दशकापासून तब्बल 35 वर्षांपर्यंत अद्यापही साखळी वृत्तपत्रांनी सातत्याने किंमत युद्ध आणि वाचकांना आकृष्ट करण्यासाठी आमिष दाखवणार्या योजना चालवल्या आहेत. तथापि, गुणवत्ता आणि दर्जा यांच्या जोरावर ‘पुढारी’ या सार्या खटाटोपाला पुरुन उरला. साहेबांनी त्या त्यावेळी अंकात आमूलाग्र बदल करीत या आव्हानावर लीलया मात केली. आव्हाने म्हणजे संधी मानणे हा साहेबांचा स्वभावधर्म आहे. 87 वर्षांपूर्वी ती. पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव तथा आबाजींनी ‘पुढारी’चे रोपटे लावले. बातमी वस्तुनिष्ठ असली पाहिजे, हा त्यांचा दंडकच असे. निर्भीडपणाने लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडा, हे बाळकडू ‘पुढारी’ने प्रारंभापासूनच जोपासलेले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा लोकलढ्यात ‘पुढारी’ अग्रभागी राहिला आणि कोयना योजनेपासून काळम्मावाडीपर्यंत अनेक विकास योजनांचा ‘पुढारी’ने पाठपुरावा केला. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वी 33 वर्षे आधीच ‘पुढारी’ने कोल्हापुरात विद्यापीठ उभे राहावे म्हणून पाठपुरावा केला होता. ही ओजस्वी परंपरा आणि थोर वारसा साहेबांनी जीवापाड जपला. पाच तपांपासून त्यांनी ही धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी’ या उक्तीचा सार्थ अनुभव आला.
‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’सह माध्यमाच्या सर्व क्षेत्रात ‘पुढारी’ समूहाने यशस्वी पदार्पण केले आहे आणि आपली मोहर उमटवली आहे. साहेब या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे सुपुत्र ‘पुढारी’ समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश कुशलतेने सारा व्याप सांभाळीत आहेत. माध्यम क्षेत्रात तीन पिढ्यांनी यशस्वी कर्तृत्व प्रकट करण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची, जागल्याची भूमिका पार पाडतानाच साहेबांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. साहेबांनी सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कामांची आणि विविध प्रश्नांवर दिलेल्या लढ्याचा स्वतंत्र ग्रंथच होईल. टोल, ऊस, दूध दरवाढ आदी आंदोलनांत त्यांच्या पुढाकाराने यश आले. जवानांना संजीवनी ठरलेले सियाचीन हॉस्पिटल उभारणी ही त्यांची कामगिरी भारतीय वृत्तपत्रसृष्टीत एकमेव उत्तुंग अशी आहे. आपद्ग्रस्तांना मदतीचा हात असो, रिक्षा मीटर प्रश्नात अर्थसाहाय्य असो, ते आघाडीवर राहिले आहेत. सीमा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलनात ते अग्रभागी राहिले आहेत आणि जिल्ह्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी 50 वर्षे लढा दिला आणि अखेर त्यांचे हे स्वप्न साकार झाले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन पद्मश्रीसह अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला. उदंड ऊर्जा आणि अथक परिश्रम हे त्यांचे स्थायीभावच आहेत. 1980 च्या दशकात नवी मशिनरी बसवल्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत म्हणजे छपाई संपेपर्यंत ते मशिन रूममध्ये थांबत.
छपाईवर बारकाईने लक्ष ठेवीत. आदल्या दिवशी सकाळी ते दहा वाजता आलेले असत. दहा वाजल्यापासून दुपारी तीन-साडेतीनपर्यंत ते कामात गर्क असत. मग, बंगल्यावर जाऊन लगेच साडेचार-पाचला परत येत, ते थेट पहाटे पाच-साडेपाचपर्यंत थांबत. म्हणजे तब्बल 16-16, 18-18 तास ते काम करीत. त्या काळात सध्यासारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नसल्याने विधानसभा-लोकसभा निवडणुकांची मतमोजणी 24 तास, प्रसंगी 36 तास चालत असे. अशावेळी ते कितीतरीवेळा आदल्या दिवशी 9 वाजता येऊन दुसर्या दिवशी सकाळीच बंगल्याकडे परतले आहेत. राजीव गांधी हत्या, बाबरी मशीद प्रकरण, मुंबई बॉम्बस्फोट, कारगील युद्ध अशा अनेक घटना-घडामोडींवेळी साहेबांनी 16-18 तास काम केले आहे. सध्याही 12-12 तासांपेक्षा अधिकच काम आणि त्याशिवाय सार्वजनिक जीवनातील सहभाग असा त्यांचा दिनक्रम असतो. एवढी प्रचंड ऊर्जा ते आणतात कुठून, हा प्रश्नच आहे. राजकारणासारख्या क्षेत्राचा त्यांनी यत्किंचितही विचार केला नाही. कै. ग. गो. जाधव यांनी अनेक राजकीय नेते घडवले. तीच किंगमेकरची भूमिका साहेबांनीही पुढे नेली. ‘पुढारी’ हे अमोघ अस्त्र ज्यांच्या पाठीशी, त्यांचा विजय हे समीकरण साहेबांनी रूढ केले. अर्थात, जनमानसाशी सुसंगत असाच हा पाठिंबा असे.
असे अष्टपैलू आणि शतावधानी व्यक्तिमत्त्व शतकातून एखादेच पाहायला मिळते. महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थातच पत्रकारितेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल त्यात स्वतंत्र अध्याय समाविष्ट करावा लागेल. ‘झाले बहु, होतील बहु, परि यासम हा’ या शब्दांत साहेबांचे वर्णन करता येईल, तरीही त्यांचे अनेक पैलू शब्दात पकडता येत नाहीत. साहेबांच्या गुण-वैशिष्ट्यांचे कितीही वर्णन केले, तरी ते अपुरेच राहते.