पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव 
संपादकीय

अस्पृश्योद्धारक : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव

पुढारी वृत्तसेवा

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव हे केवळ निर्भीड पत्रकार नव्हते, तर ते सत्यशोधक विचारांचे प्रखर पुरस्कर्ते, स्वातंत्र्यसैनिक, बहुजन उद्धारक, अस्पृश्योद्धारक आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर लढणारे मानवतावादी नेते होते. पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि अस्पृश्योद्धाराच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी जडणघडणीत दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आणि ऐतिहासिक मानले जाते. आज (20 मे) त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त...

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत ‌‘पुढारी‌’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. म. फुले, राजर्षी छ. शाहू महाराजांच्या सत्यशोधक चळवळीचा ते अविभाज्य घटक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ग. गो. जाधव यांनी ‌‘चले जाव‌’ आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, कराची अधिवेशन अशा एकूणच महत्त्वाच्या आंदोलनांत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सक्रिय सहभाग घेतला होता तर काहीवेळा त्यांना भूमिगत राहूनही राष्ट्रकार्य करावे लागले. म. गांधींचा त्यांना प्रदीर्घ आणि घनिष्ठ सहवास लाभला होता.

पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव हे एक अष्टपैलू, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते जसे सत्यशोधक होते, स्वातंत्र्यसैनिक होते, तसेच ते दीनदलितांचे कैवारी, बहुजनांचे आधारवड, ज्येष्ठ समाजसेवक, बहुजन उद्धारक होते. दि. 4 मे 1908 रोजी गगनबावडासारख्या सह्याद्रीच्या भव्य-दिव्य कडेकपारीतील निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरी भागातील गरीब शेतकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आबांना एकूण 78 वर्षांचे आयुष्य लाभले.

इ. स. 1927 ते 1987 या पाच तपे म्हणजेच सहा दशकांच्या कालखंडात पत्रकारितेच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी महाराष्ट्रात निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून पुरोगामित्वाचा वसा व वारसा चालविला. ‌‘सेवक‌’ नावाने सुरू झालेला अंक पुढे सी. वाय. चिंतामणी यांच्या अलाहाबादवरून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी ‌‘लीडर‌’चे मराठीत ‌‘पुढारी‌’ हे नाव स्वीकारून कोल्हापुरात 1937 रोजी ‌‘पुढारी‌’ साप्ताहिक आबांनी सुरू केले. पुढील काळात म्हणजे दि. 1 जानेवारी 1939 रोजी ‌‘पुढारी‌’ साप्ताहिकाचे ‌‘पुढारी‌’ दैनिकात रूपांतर करून आबांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीची कोंडी फोडली. बहुजन समाजात वर्तमानपत्र म्हणजे ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी‌’ म्हणजेच वर्तमानपत्र हे समीकरण जनसामान्यांच्या तना-मनात रुजवण्याचे कार्य पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी मोठ्या कष्टाने शेवटच्या श्वासापर्यंत केले. जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याबरोबरच दीनदलित, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‌‘पुढारी‌’कारांनी अव्याहतपणे परिश्रम घेतले.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यता, जातिभेद, गुलामगिरीला कायद्याने बंदी घातली गेली होती. परंतु विषमतावादी मानसिकता उच्चभ्रू समाजमनामध्ये घट्ट रुजलेली होती, ती आजही पूर्णांशाने नष्ट झालेली नाही. 1960 च्या दशकात कोल्हापूरजवळच्या एका खेड्यातून ‌‘पुढारी‌’कार प्रवास करीत होते, तेव्हा सार्वजनिक पाणवठ्यावर घोटभर पाण्याच्या प्रतीक्षेत सकाळपासून बसलेले अस्पृश्य बांधव त्यांना दिसले. ते दृश्य पाहून त्यांचे हृदय हेलावून गेले. दलितांना पाणी द्या, असा त्यांनी आग्रह धरला. परंतु ग्रामस्थ तयार होईनात. तेव्हा जाधव यांनी चांगलाच दम भरला. पेपरला हे छापण्याची धमकी दिली. तेव्हा कुठे सवर्णांनी दलितांना वरून पाणी वाढले. अस्पृश्योद्धारासाठी केवळ वर्तमानपत्रातून लेखणीच्या माध्यमातूनच नव्हे तर प्रत्यक्षसुद्धा ते कसा आवाज उठवत होते हे या उदाहरणावरून लक्षात येते.

पाणी निसर्गनिर्मित असतानाही सवर्णांची मनुवादी मानसिकता दलितविरोधी कशी कार्यरत होती याचा प्रत्यय येतो. वर्णव्यवस्थेने दलितांना ज्ञानबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, गावबंदी आणि स्पर्शबंदी कशी लादली होती त्यातून हजारो वर्षांपासून त्यांचे शोषण कसे केले जात होते हे आजही काहीअंशी दुर्दैवाने आपणास पाहावयास मिळते. ईश्वर आणि माणूस यांच्यात मध्यस्थाची, भटजी, पुजारी यांची गरज काय? आपण सारी परमेश्वराची लेकरे आहोत हे संत तत्त्वज्ञान अस्तित्वात असताना दलितांना मंदिर प्रवेश आजही नाकारला जातो हे एक कटू वास्तव आहे. म. फुले यांनी ईश्वर ऐवजी निर्मिक ही संकल्पना मांडली. ‌‘तिन्ही लोकांचा जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी‌’ ही भूमिका फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची होती. दलितांना समान हक्क मिळावेत, आम्हीही माणसे आहोत, इतर प्राणी मंदिरात जातात, मग आम्ही का नाही? या प्रश्नातूनच बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर 1930 ला नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला. बाबासाहेबांच्या मंदिर प्रवेश चळवळीला पाठिंबा देण्यासाठी ग. गो. जाधव यांनी मुंबईत तरुणांची एक युवक परिषद भरविली आणि मंदिर प्रवेश चळवळीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. केवळ पाठिंबा देऊन न थांबता स्वतः ग. गो. जाधव हे नाशिकला जाऊन काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात दि. 15 मार्च 1931 रोजी सहकाऱ्यांसह सहभागी झाले. ग. गो. जाधव हे मानवतावादी भूमिकेतून बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी होत असत. हा लढा न्यायाचा, समतेचा आणि बंधुत्वाचा होता. ग. गो. जाधव हे बाबासाहेबांच्या युगप्रवर्तक आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक होते.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी पूज्य साने गुरुजी यांनी दि. 1 मे ते 10 मे असे सलग दहा दिवस आमरण उपोषण केले होते. विशेष म्हणजे, साने गुरुजींच्या या सत्याग्रहात ग. गो. जाधव प्रत्यक्ष जाऊन उपोषणाला बसले होते. हाही लढा पंढरपुरात यशस्वी झाला होता. संस्थान काळाच्या अखेरीस कॅप्टन नंजाप्पा यांना कोल्हापुरात प्रशासक म्हणून नेमले गेले होते. दि. 13 मार्च 1949 रोजी कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी येथील प्रसिद्ध जोतिबा मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून ग. गो. जाधव (आबा) यांनी प्रशासक नंजाप्पांच्या मदतीने खूप प्रयत्न केले व अखेरीस जोतिबा मंदिरात दलितांच्या हस्ते श्रीपूजा करून दलितांना प्रवेश देण्यात ग. गो. जाधव यशस्वी ठरले.

काळाराम मंदिर नाशिक आणि पर्वती सत्याग्रह पुणे येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग. गो. जाधव यांनी कोल्हापुरात जोतिबा मंदिर प्रवेश चळवळ यशस्वी केली होती. दि. 5 सप्टेंबर 1943 रोजी मुंबई दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जाहीर नागरी सत्कार झाला, त्या कार्यक्रमाचे ‌‘पुढारी‌’कार ग. गो. जाधव हे अध्यक्ष होते. बाबासाहेब आणि ‌‘पुढारी‌’कार हे अनेकवेळा एकमेकांच्या सान्निध्यात आले होते. त्या दोघांच्यातही मित्रत्वाचे घनिष्ठ संबंध दृढ झाले होते.

कोल्हापूरचा बिंदू चौक हा कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळींचा केंद्रबिंदू आहे. बाबासाहेबांच्या हयातीतील जगातला पहिला पुतळा येथे पाहावयास मिळतो. भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली लोकवर्गणीतून हा पुतळा डिसेंबर 1950 मध्ये उभारला गेला. गंगाराम कांबळे, दा. म. शिर्के, मा. ता. मोरे, तु. का. गणेशाचार्य या शाहूशिष्य आणि आंबेडकरी अनुयायांच्या बरोबरीने ‌‘पुढारी‌’कार ग. गो. जाधव यांनीदेखील याप्रसंगी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. लोकशिक्षण, लोकजागर, लोकप्रबोधन आणि लोकचळवळ या चतु:सूत्रीवर आधारित बहुजनहिताचे तत्त्व अंगिकारून ‌‘पुढारी‌’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी पत्रकारिता क्षेत्रात सहा दशके निर्भीडपणे बहुजन उद्धारासाठी सार्थकी लावली.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात, विशेषतः माध्यम समूहांमध्ये ‌‘पुढारी‌’ने स्वतःचे स्वतंत्र धु्रवताऱ्यासारखे स्थान आज निर्माण केलेले आहे. ‌‘पुढारी‌’कारांच्या त्याग, समर्पण आणि अथक परिश्रमातून ‌‘पुढारी‌’ने गगनभरारी घेऊन माध्यमक्रांतीच्या जमान्यात स्वतःची निर्भीडपणे नाममुद्रा काळाच्या पटलावर उमटवलेली आहे. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बनून ‌‘पुढारी‌’कारांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. संपादक, पत्रकार म्हणून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व ‌‘पुढारी‌’कारांनी प्राणपणाने जपलेले आहे. ‌‘पुढारी‌’चे हे निर्भीड कार्य पत्रकारितेच्या पुढील पिढ्यांना मानदंड स्वरूपात मार्गदर्शक ठरणारे आहे.

‌‘पुढारी‌’कार ग. गो. जाधव हे कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीचे सलग दहा वर्षे अध्यक्ष होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे हाडाचे पत्रकार ही ख्याती त्यांना त्यांच्या कार्यातून मिळालेली होती. तळागाळातील शोषितांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी अव्याहतपणे पार पाडले.

‌‘पुढारी‌’कारांना इ. स. 1949 मध्ये तत्कालीन गव्हर्नर यांनी मुंबई असेंब्लीवर लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडलेले होते. ‌‘पुढारी‌’कारांच्या या समग्र जीवनकार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीनेे दि. 26 जानेवारी 1984 रोजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते पद्मश्री किताब देऊन सन्मानित करण्यात आले. दि. 11 फेब्रुवारी 1986 रोजी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री व नंतरच्या काळातील पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते डी.लिट. ही पदवी देऊन त्यांचा उचित गौरव केला.

राजर्षी छ. शाहू महाराजांना समक्ष पाहण्याचे भाग्य बालपणीच ग. गो. जाधव यांना लाभले. पुढे भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर, भाई माधवराव बागल, सत्यशोधक दासराम, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, महर्षी शिंदे, साने गुरुजी या महापुरुषांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला. अशा थोरामोठ्यांच्या सहवासात परिपूर्ण आणि समृद्ध जीवन लाभलेले ‌‘पुढारी‌’कार ग. गो. जाधव यांच्या स्मृती महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. 2008 मध्ये ग. गो. जाधव यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी भारत सरकारने त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित केले. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. दि. 20 मे 1987 रोजी हृदयविकाराच्या आजाराने त्यांनी जगाचा निरोप घेतला. बहुजनउद्धारक, अस्पृश्योद्धारक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव (आबा) यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT