Organ Swap Transplant India (Pudhari File Photo)
संपादकीय

Organ Swap Transplant India | अवयवांच्या अदलाबदलीने जीवनदान

Organ Donation Awareness | भारतामध्ये ‘स्वॅप ट्रान्सप्लांट’ अर्थात अदलाबदलीच्या पद्धतीने अवयव प्रत्यारोपण वाढत असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ’च्या अहवालात देण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

विनायक सरदेसाई

भारतामध्ये ‘स्वॅप ट्रान्सप्लांट’ अर्थात अदलाबदलीच्या पद्धतीने अवयव प्रत्यारोपण वाढत असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ’च्या अहवालात देण्यात आली आहे. या अभ्यासानुसार भारतामध्ये आता प्रत्येक 50 पैकी एक किडनी ट्रान्सप्लांट ‘स्वॅप’ पद्धतीने होत आहे. याचा अर्थ असा की, रुग्णाला मिळालेली किडनी त्याच्या नातेवाईकाने दिलेली नसते, तर कोण्या इतर कुटुंबातील नातेवाईकाने ती दिलेली असते. त्या बदल्यात त्या रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तीने तिसर्‍या एखाद्या गरजू व्यक्तीला किडनी दिलेली असते. यामुळे एका प्रकारे परस्पर सहाय्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवले जात आहेत.

‘स्वॅप ट्रान्सप्लांट’मध्ये दोन किंवा अधिक कुटुंबे परस्पर मिळून अवयवांची अदलाबदली करतात. उदाहरणार्थ, राम याला आपल्या पत्नीला किडनी द्यायची आहे; पण रक्त गट किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे ते शक्य नाहीये. त्याचवेळी शाम याला आपल्या आईला किडनी द्यायची आहे. पण तिथेही जुळवाजुळव होत नाहीये. अशा परिस्थितीत जर रामची किडनी शामच्या आईला आणि शामची किडनी रामच्या पत्नीला योग्य ठरली, तर ते दोघे आपापसात अदलाबदली करतात. यामुळे दोघांनाही नवे जीवनदान मिळते. कोणत्याही मोठ्या नेटवर्किंग किंवा लांब प्रतीक्षा यादीशिवाय हा प्रश्न सुटतो.

2100 हून अधिक रुग्णांचे प्राण वाचले

या अहवालानुसार गेल्या दोन दशकांमध्ये या पद्धतीद्वारे सुमारे 2100 हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये 1840 रुग्णांना किडनी आणि 265 रुग्णांना यकृत ‘स्वॅप’ पद्धतीने मिळाले आहे. या प्रकरणांमध्ये तब्बल 87 टक्के रुग्ण रक्त गट न जुळण्याच्या समस्येमुळे या पद्धतीचा लाभ घेऊ शकले. काही ठिकाणी ‘एचएलए मॅचिंग’ किंवा सेंसिटायझेशनसारख्या वैद्यकीय अडचणी देखील होत्या, ज्यावर या पद्धतीने यश मिळवले.

या अदलाबदलीमध्ये दोन ते दहा कुटुंबांनी सहभाग घेतला. 1594 प्रकरणांमध्ये दोन कुटुंबांनी परस्पर अदलाबदली केली. 147 प्रकरणांमध्ये तीन कुटुंबांनी, तर 44 प्रकरणांमध्ये चार कुटुंबांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे दहा प्रकरणांमध्ये तब्बल दहा कुटुंबांनी मिळून एक साखळी तयार करून अवयवदान केले आणि अशा पद्धतीने अनेक रुग्णांचे प्राण वाचले.

अवयवदानात महिलांची आघाडी

अवयवदान करणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे; तर अवयव घेणार्‍यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. 82 टक्के किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्ण पुरुष होते. पण 86 टक्के दाते स्त्रिया होत्या. यकृताच्या बाबतीतही हाच कल दिसून आला. 222 पुरुष रुग्णांच्या तुलनेत 70 टक्के दाते स्त्रिया होत्या.

अमेरिकेपेक्षा भारत मागे

भारतात फक्त 2 टक्के प्रत्यारोपण ‘स्वॅप’ पद्धतीने होतात, तर अमेरिकेत हे प्रमाण 16.2 टक्के व युरोपमध्ये 8 टक्के आहे. याचे मुख्य कारण भारतात राष्ट्रीय पातळीवर कोणताही एकसंध व सुसंघटित ‘स्वॅप प्रोग्रॅम’ उपलब्ध नाही.

महाराष्ट्र आघाडीवर

गुजरात आणि महाराष्ट्र हे राज्य या ‘स्वॅप ट्रान्सप्लांट’मध्ये आघाडीवर आहेत. यामागे या राज्यांतील उत्तम नेटवर्किंग, वैद्यकीय सुविधा आणि कायदेशीर प्रक्रियेची सज्जता कारणीभूत आहे. या राज्यांनी रुग्णांना एकत्र जोडण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत.

सुधारणांची गरज

भारताला या मॉडेलमध्ये यश मिळवायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावर एक रजिस्ट्री तयार करावी लागेल. त्या अंतर्गत सर्व राज्ये व रुग्णालये परस्पर जोडावी लागतील. ‘वन नेशन, वन स्वॅप सिस्टीम’ या धोरणाखाली एक सशक्त नेटवर्क उभारणे गरजेचे आहे, ज्यायोगे गरजूंना सर्वात लवकर योग्य डोनर उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT