‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आहे. तरीही संघर्षविरामानंतर समाजमाध्यमांमधून काही अनाठायी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की, भारताने आपल्या सैन्याला पाकिस्तानी लष्करी तळ काबीज करण्याचे किंवा पाकव्याप्त भारतीय काश्मीरला प्रजासत्ताक काश्मीरमध्ये परत जोडण्याचे आदेश अथवा उद्दिष्ट दिलेलेच नव्हते.
ऑपरेशन सिंदूरच्या शानदार यशाबद्दल भारतीय जनतेने एकमताने सशस्त्र दलांचे आणि राजकीय नेतृत्वाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताच्या शूर जवानांच्या अतुलनीय कामगिरीला सलाम करून हे ऑपरेशन राष्ट्राला समर्पित केले. ज्या पद्धतीने आपल्या सैन्याने दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली आणि नागरी लोकसंख्येला स्पर्शही केला नाही, ते लष्करी आणि तांत्रिक क्षमतेचे तसेच संयमाचे एक अद्भुत उदाहरण होते. पण त्यानंतर झालेल्या युद्धबंदीवर काही निवडक मतभेद करणारे आवाज आभासी क्षेत्रात विदूषकाची भूमिका बजावत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या दुसर्या टप्प्याच्या 48 तासांच्या आत आपल्या सैन्याच्या सुवर्ण यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. पण तरीही भारतीय सैन्याच्या आक्रमकतेनंतर झालेल्या युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आपण लष्करी आक्रमकता सुरू ठेवायला हवी होती आणि पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करायला हवी होती, अशी अनेकांची भूमिका होती.
वस्तुतः कोणताही देश लष्करी कारवाई करण्यापूर्वी निश्चितच ध्येय निश्चित करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दुसर्या टप्प्याचे मुख्य ध्येय अजिबात आक्रमक नव्हते. केवळ दहशतवादी अड्ड्यांवरील प्रभावी हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या, युद्धखोर लष्करप्रमुखांच्या बेजबाबदार कृतींना योग्य उत्तर देणे हाच या मिशनचा उद्देश होता. दोन्ही देशांनी ही मर्यादित चकमक संघर्षाच्या कक्षेतच मर्यादित राहू दिली. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.
राजस्थानच्या सीमेवर युद्धसरावाच्या बहाण्याने पाकिस्तानने आपल्या सैन्याचे टँक, चिलखती वाहने आणि तोफा तैनात केल्या. पण भारतीय सैन्याला पुढच्या भागात पोझिशन घेण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत. आपल्या सीमेच्या संरक्षणाची पहिली ओळ असलेल्या बीएसएफलाही (सीमा सुरक्षा दल) गृहमंत्री अमित शहा यांनी फक्त सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या सर्व तथ्यांवरून असे दिसून येते की, भारताने आपल्या सैन्याला पाकिस्तानी लष्करी तळ काबीज करण्याचे किंवा पाकव्याप्त भारतीय काश्मीरला आपल्या प्रजासत्ताक काश्मीरमध्ये परत जोडण्याचे आदेश अथवा उद्दिष्ट दिलेलेच नव्हते. त्यामुळेच सर्व प्रकारची चिथावणी देऊनही भारताने संयम गमावला नाही. तसेच अणुयुद्धाची धमकी देण्यासारखे बालिश कृत्य करण्यापासून परावृत्त केले.
पाकिस्तानने भूज आणि जैसलमेरपासून श्रीनगर आणि अवंतीपुरापर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारताच्या सीमेवर हल्ला करण्यात पुढाकार घेतला. पण भारतीय सैन्याच्या संयुक्त कमांडरने केलेली प्रत्युत्तराची कारवाई पाकिस्तानचे मनोबल तोडण्यात पूर्णपणे यशस्वी झाली. याचा पुरावा म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) त्यांच्या भारतीय समकक्षांना फोनवरून युद्धबंदीची विनंती केली. 1971 च्या ढाका स्टाईलने पाकिस्तानी सैन्याने शरणागती न मानल्याने किंवा पाकिस्तानी लष्करप्रमुख मौलाना मुनीर यांनी त्यांच्या कृत्यांबद्दल माफी न मागितल्याने जे लोक रागावले आहेत किंवा नाराज आहेत, त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी.
1971 मध्ये 98 हजार पाकिस्तानी सैनिकांनी ज्या परिस्थितीत शरणागती पत्करली, ती परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. भारताचे ध्येय कधीही पाकिस्तानचा कोणताही भाग ताब्यात घेणे नव्हते. आम्ही पाकिस्तानकडून फक्त ‘जगा आणि जगू द्या’ अशी मागणी करतो. प्रत्येक भारतीयाला पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची इच्छा आहे हे नाकारता येत नाही. पण आताच्या लष्करी कारवाईचा उद्देश केवळ बचावात्मक होता.