‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. प्रतिमा उजळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अष्टपैलू नेतृत्व आणि त्यांचे मंत्रिमंडळातील व संरक्षण दलातील सहकारी यांनी योजकतेने आखलेली ही मोहीम सर्वंकष यशस्वी ठरली आहे. या मोहिमेचे खरे यश नियोजन, नियंत्रण आणि प्रभावी कार्यान्वयन या व्यवस्थापन शास्त्रातील त्रिसूत्रीमध्ये आहे.
‘भार्यात रक्षते भारतः’ महिलांच्या सन्मानाचे रक्षण करतो तो चक्रवर्ती भरताचा भारत देश होय. याचा अर्थ असा की, महिलांच्या सन्मानाचे, सौभाग्याचे सिंदूरचे रक्षण करणे ही भारतीय संस्कृती आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर भारताच्या नंदनवनातील वैभव परतले होते. कश्यप ऋषींनी स्थापन केलेल्या या स्वर्गभूमीत सुवर्णयुगाची नांदी प्रकटत होती. पण दहशतवाद्यांच्या नापाक इराद्यांनी त्याला द़ृष्ट लावण्याचा प्रयत्न केला. 22 एप्रिल रोजी पहलगामची दुर्घटना झाली आणि त्या बीभत्स आणि रानटी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्यात 17 लोक जखमी झाले. त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही सुनियोजित कारवाई करून पाकव्याप्त काश्मीरमधील 5 आणि प्रत्यक्ष पाकिस्तानमधील 4 अशा 9 दहशतवादी अड्ड्यांवर प्रहार केला. खरे तर अशी 21 दहशतवादी केंद्रे आणि कितीतरी उपकेंद्रे पाकिस्तान सर्वदूर चालवत होता. मायदेशात लोकांना मॉक ड्रिल करायला लावणारे आणि त्याच रात्री शत्रूच्या गोटात खोलवर शिरून जबरदस्त प्रतिहल्ला करणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले मुत्सद्दी ठरले आहेत. वर्तमानात शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा व गुप्तहेर तंत्राचा अवलंब करून त्यांनी युद्धनीतीचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
गीता हा भारतीय दर्शनाचा आत्मा आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 10 व्या अध्यायात विभूती योगाचा संदेश दिला आहे. या अध्यायात भगवंतांनी अष्टपैलू नेतृत्वाची गुणसंपदा कुशलतेने व चतुराईने कथन केली आहे. राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील श्रेष्ठ शिखर कोणते आहे याची नोंद घेऊन त्यांनी पराक्रमी नेता हा कसा इतिहास घडवितो याबद्दल केलेले विश्लेषण मोठे रोमांचक आहे. ‘उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्। ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्’(अध्याय 10, श्लोक 27) याचा अर्थ असा आहे की, समुद्रमंथनातून अमृत प्राशन केल्यानंतर निर्माण झालेला उच्चैःश्रवा नावाचा अश्वराज श्रेष्ठ ठरला. तसेच दशदिशांचे रक्षण करणार्या दिग्गज हत्तींमध्ये ऐरावत नावाचा गजराज महापराक्रमी ठरला. सर्व मानवसृष्टीमध्ये शांतता व सौख्य निर्माण करण्यासाठी मनुष्यांमध्ये राजा, नृपती किंवा नरेंद्र म्हणजे नराचा इंद्र ‘नराणां च नराधिपम्’ म्हणजे राजा मला समज, असेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.
नरांमधील श्रेष्ठ नरेंद्र म्हणजे राजा हा इंद्राची शक्ती धारण करतो. तो आदर्श राज्यकर्ता असतो. त्यापासून प्रजेने बोध घेऊन त्याचा अनुसर केला पाहिजे. आपल्यासमोर असलेले नातेवाईक, आपले पारिवारिक लोक या सर्वांशी कसे युद्ध करावे याबद्दल संभ—मात सापडलेल्या अर्जुनाला आपल्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटविण्यासाठी विभूती योग या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी मौलिक संदेश दिला आहे. भारतातील ऋषिमुनी, तपस्वी युगपुरुष व ज्ञानपरंपरा यांचा विशेष संदर्भ अधोरेखित केला आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे भगवान श्रीकृष्ण नवा मार्ग दाखवत आहेत. योगेश्वर श्रीकृष्णाच्या चिरंतन व अक्षर चिंतनातून प्रकटलेल्या विभूती योगाची प्रचिती ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आली आहे. अमृतमय विचारांचा आस्वाद घेताना प्रसंग आणि घटनांचे विश्लेषण करण्यासाठी हा विभूती योग प्रतीकात्मकद़ृष्टीने सार्थ ठरतो. अर्थशास्त्र या प्राचीन ग्रंथामध्ये कौटिल्य ऊर्फ आर्य चाणक्याने उत्तम राज्यकर्त्याची लक्षणे सांगितली आहेत. प्रजेचे रक्षण व कल्याण ही आदर्श राज्याची जबाबदारी होय. राज्याच्या सत्तांग सिद्धांतामध्ये आचार्य कौटिल्यांनी स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र या सात घटकांची मांडणी केली आहे. त्यापैकी बहुतेक सर्व घटक वर्तमानातही तेवढेच सुसंबद्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कालावधीत हा आदर्श राज्यसिद्धांत तेजस्वीपणे प्रत्ययास आला आहे. अॅडम स्मिथ याने सुद्धा ‘राष्ट्राच्या संपत्तीची कारणमीमांसा’ या ग्रंथात सुसह्य कररचना, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि शत्रूपासून प्रजेचे रक्षण ही कल्याणकारी राज्याची त्रिसूत्री सांगितली आहे.
2016 चा उरी सर्जिकल स्ट्राईक तसेच 2019 चा बालाकोट सर्जिकल स्ट्राईक यांच्या तुलनेत ऑपरेशन सिंदूरचे स्वरूप अधिक सखोल, व्यापक आणि परिणामकारक ठरले आहे. राफेल, सुखोई या लढाऊ विमानांच्या तसेच प्रिसिजन मिसाईल्सच्या वापरातील भेदकता, अचूकता यामुळे ही मोहीम अपूर्व ठरली आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल यांसारख्या दहशतवादी संघटनांचे जाळे नष्ट करण्यासाठी या मोहिमेला आलेले यश आतापर्यंतच्या सर्व मोहिमांतील अधिक प्रगल्भ यश म्हटले पाहिजे. पाक पुरस्कृत सर्व दहशतवादी गटांची पायाभूत व्यवस्था मोडून काढण्याचा हा एक लक्षणीय असा प्रयत्न ठरला आहे. पहलगामपासून पार्लमेंटपर्यंत आणि मुंबईपासून उरी, पठाणकोटपर्यंत झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांचे मूळ हे पाकिस्तानात होते आणि हा पाक पुरस्कृत दहशतवाद एखाद्या राक्षसाप्रमाणे भारताशी शॅडो युद्ध करीत होता.
गीतेमध्ये म्हटले आहे, ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः’ (अध्याय 2 श्लोक क्र. 23) याचा अर्थ असा की, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. इ.स. 712 मध्ये मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतावर तीन स्वार्या केल्या. शेवटी दगाफटका करून घुसखोरी केली. तेव्हापासून पहलगामपर्यंत झालेल्या सर्व आक्रमणांतून कितीतरी माता-भगिनींचे सिंदूर म्हणजे सौभाग्य पुसले गेले. त्यांना न्याय देण्याचा हा प्रखर आणि यशस्वी प्रयत्न ठरला. हजारो भारतीय शहिदांच्या अजरामर आत्म्यांचा हा संदेश आहे की, यापुढे असा अन्याय, अत्याचार कराल तर त्याचा हिसाब चुकता केला जाईल. विभूती योगानुसार भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र हाती घेऊन अन्यायाचे निर्दालन करण्यासाठी आणि साधू-संतांचे रक्षण करण्यासाठी प्रकट होतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आधुनिक युगातील भेदक सुदर्शन चक्रांचा उपयोग करून सर्व दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प केला आहे. हे केवळ धर्मयुद्ध नाही तर एक विचार युद्ध आहे. दहशतवादाविरुद्ध लोकशाहीचा हा एक वैश्विक लढा आहे. माता-भगिनींच्या सौभाग्याचे रक्षण करण्याचा हा संकल्प आहे. सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणाची पताका उंच उंच फडकत आहे व फडकत राहील. त्याग, सेवा व समर्पण यांचा संदेश तिरंगा राष्ट्रध्वज सदैव देत राहील.