हिशेब चुकता  file photo
संपादकीय

हिशेब चुकता

पुढारी वृत्तसेवा

सौगंध मुझे इस मिट्टी की,

मैं देश नहीं मिटने दूँगा,

मैं देश नहीं झुकने दूँगा ।

प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची ही कविता. भारतातील प्रत्येक सैनिकाच्या आणि देशभक्ताच्या ओठांवर हे गीत असते. पहलगाममध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचे बळी पडले. हल्ल्यानंतर अवघा देश हळहळला. त्यावेळी दहशतवाद भारताच्या आत्म्याला भेदू शकत नाही. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याची वेळ जवळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. पहलगाम कटातील सर्वांना त्यांनी कल्पनाही केली नसेल, अशी मोठी शिक्षा मिळेल, असा खणखणीत इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला होता.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारताने अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही ऐतिहासिक मोहीम फत्ते केली. पंतप्रधानांनी राष्ट्राला दिलेले वचन खरे करून दाखवले. मुंबईवरील 26-11 नंतरचा पहलगामचा हल्ला सर्वात मोठा होता. निर्घृण होता. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होऊ लागली आणि गेल्यावर्षी तेथे सव्वादोन कोटी पर्यटक आले, हे पाकिस्तानला पाहवले नव्हते. या हल्ल्याची जबाबदारी घेणारी ‘टीआरएफ’ ही दहशतवादी संघटना संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे.

भारताने या संघटनेबाबत गेल्या नोव्हेंबरात संयुक्त राष्ट्राला अहवाल दिला होता; पण टीआरएफचा संदर्भ काढण्यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीवर दबावही आणत आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतरही पाकिस्तानने आपल्या ताब्यातील दहशतवादी तळांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट कानावर हातच ठेवले. अशावेळी भारताने गुप्तचर यंत्रणांकडून गोळा केलेली माहिती आणि संपूर्ण परिसराचा अभ्यास करून अत्यंत अचूक, योग्य ठिकाणी, वाजवी प्रमाणात आणि जबाबादारीपूर्ण अशी कारवाई केली. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर अथवा सर्वसामान्य नागरिक यांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. केवळ दहशतवादी तळांवर अचूक नेम धरण्यात आला. या नऊपैकी चार ‘टार्गेटस्’ ही पंजाब प्रांतातील व पाच पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत.

पाकिस्तानात थेट 100 किलोमीटर आत घुसून स्काल्प क्षेपणास्त्रे डागून, जो लक्ष्यभेद करण्यात आला तो स्पृहणीय आहे. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए- मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या सर्व प्रमुख संघटनांचे तळ आणि त्यांची मुख्यालये बेचिराख करण्यात आली असून, ही अद्दल घडवणे अतिशय गरजेचेच होते. भारतीय संसद, पठाणकोट, उरी, पुलवामा, गुलमर्ग, सोनमर्ग अशा ठिकाणी पाकिस्तानने वारंवार हल्ले केले. जिहादी दहशतवाद्यांनी ऑगस्ट 2000 मध्ये अमरनाथ यात्रा करणार्‍या 30 भाविकांना ठार मारले. जम्मू-काश्मीरमधील कालुचक तसेच कासिमनगर येथे बॉम्ब फेकून 40-50 हिंदूंचे बळी घेतले. त्यापूर्वी 24 डिसेंबर 1999ला इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे निघालेल्या प्रवासी विमानाचे अपहरण करून, ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले.

अपहृतांना सोडण्याच्या बदल्यात भारतीय तुरुंगात असलेल्या 36 दहशतवाद्यांची सुटका करण्याची आणि 20 कोटी डॉलर देण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली होती. ज्यांची सुटका करावी लागली, त्यात मौलाना मसूद अझरसारख्या म्होरक्याचा समावेश होता. सुटकेनंतर मसूदने जैश-ए- मोहम्मद संघटनेमार्फत भारतावर दहशतवाद्यांमार्फत वारंवार हल्ले घडवले. या सर्व पापांचा हिशेब आता भारताने एकाच फटक्यात चुकता केला. यापूर्वी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याचप्रमाणे बालाकोटमध्ये हवाई हल्लाही केला होता; पण यावेळचा हल्ला अधिक व्यापक असून, त्याचे सर्व पुरावे पत्रकार परिषद घेऊन जनतेपुढे ठेवण्यात आले, हे महत्त्वाचे! पहलगाम हल्ला झाल्यानंतर सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न विरोधक सातत्याने विचारत होते. पहलगामचा सूड घ्यावा, अशी सर्वांचीच भावना होती; परंतु कोणत्याही सरकारला केवळ भावनांवर स्वार होऊन चालत नाही. भारताने युद्ध करावे, अशी मागणी करणे सोपे आहे; पण युद्धाची किंमत मोठी असते. याउलट भारताने जशास तशी कारवाई केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्वी पंतप्रधानांनी लष्कर, नौदल व हवाई दल यांच्या प्रमुखांशी तसेच सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही पुन्हा पुन्हा चर्चा केली. त्यानंतरच नियोजनबद्धरीत्या रात्रीची वेळ निवडून अचूक लक्ष्यभेद केला. पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी हिंदूंची हत्या केली; मात्र त्यास उत्तर देताना भारताने केवळ दहशतवाद्यांना मारणे, एवढाच उद्देश ठेवला होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या कारवाईचे सर्व पुरावे सादर करण्यात आले असल्यामुळे बालाकोटप्रमाणे विरोधकांनी पुरावे मागण्याचा क्षुद्रपणा करू नये.

पकिस्तानला अद्दल घडवणार्‍या आपल्या सैन्यदलांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच. पंतप्रधानांनी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सेनादलांना दिलेले होतेच; पण शेवटी या कारवाईची व परिणामांची जबाबदारी ही नेतृत्वाकडेच येते. इंदिरा गांधींप्रमाणेच मोदी यांचे नेतृत्व आक्रमक आणि जोखीम घेणारे आहे. भारताने हल्ला केल्यास आम्ही अणुयुद्ध करू, रक्तपात करू अशा वल्गना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री तसेच अन्य नेत्यांनी केल्या होत्या; मात्र प्रत्यक्ष हल्ला झाल्यानंतर पाक सरकारची भीतीने गाळण उडाली आहे. भारताने यापुढे कारवाई केली नाही, तर आम्हीही कारवाई करणार नाही, असे म्हणून पाक नेतृत्व स्वतःची सुटका करून घेऊ पाहत आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांनी हिंदू-मुस्लिम द्विराष्ट्र सिद्धांताची आठवण करून दिली होती. त्यानंतरच पहलगामकांड घडले. भारताच्या या ठोस कारवाईत मशिदी व प्रशिक्षण केंद्रांमधून धार्मिक विद्वेषाची जी कोठारे तयार केली जात आहेत, त्यांनाच भारताने काडी लावली. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्यामुळे अणुयुद्ध होईल, या भीतीपोटी अथवा चीनच्या दडपणापायी यापुढे भारत हातावर हात ठेवून स्वस्थ बसणार नाही. अमेरिकेनेही पाकिस्तानला ठणकावले आहे. हा नवा, समर्थ भारत आहे. दहशतवाद केवळ पाकिस्तानातूनच नाही, तर जगातून समूळ नष्ट व्हावा, यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’ने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT