आजकाल सगळेच ऑनलाईन होऊ घातले आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मिटिंग ऑनलाईन होत असतात. एक प्रत्यक्ष विवाह सोडला, तर त्यासंबंधीचे सगळे विधी ऑनलाईन होत आहेत. करणार काय? समजा नवरदेव जर्मनीमध्ये आहे आणि नवरी अमेरिकेमध्ये आहे. या दोघांचे आई-वडील भारतात आहेत. हे दोघे एकमेकांना भेटणे अशक्य आहे. याऐवजी ते ऑनलाईन भेटतात, एकमेकांशी बोलतात आणि मग ही सोयरिक ऑनलाईन ठरते. या ऑनलाईन सोयरिकेचा साखरपुडाही ऑनलाईन होत असतो. याचा अर्थ वधू आणि वर आपापल्या देशातून एकमेकांना अंगठी घातल्याचा अभिनय करतात आणि इकडे भारतात त्यांचे पालक टाळ्या वाजवतात.
सध्या राज्यभरात गौरी-गणपतीची धूम आहे. गणरायाचे आगमन झालेले आहे आणि गौरी म्हणजेच महालक्ष्मी माता अवघ्या काही तासांत घराघरांत प्रवेश करणार आहे. या देवतांची विधिवत पूजा कशी करायची, हा एक मोठाच प्रश्न भाविकांच्या पुढे असतो. बरेच ठिकाणी गुरुजींना पाचरण केले जाते; परंतु बिचारे गुरुजी तरी कुठे कुठे प्रत्यक्ष पोहोचणार? त्याऐवजी पूजा किंवा महापूजा ऑनलाईन करण्याचे अॅप पण निघाले आहेत. शिवाय असंख्य लोक यूट्यूब आणि इतर गोष्टींवरून मार्गदर्शन करत असतात. याचा अर्थ, तुम्ही पूजेचे सगळे साहित्य गोळा करून ठेवायचे आणि आपल्या मोबाईलवरील पूजा पद्धतीचा व्हिडीओ ऑन केला की, त्यातील गुरुजी जसे सांगतील त्याप्रमाणे क्रिया करत जायच्या म्हणजे मग विधिवत पूजा पूर्ण होते.
अशी पूजा देवतांना मान्य आहे की नाही माहीत नाही; परंतु भाविकांचा अगदीच नाईलाज झालेला आहे, हे मात्र निश्चित! कधीकाळी मोठ्या मोठ्या आवाजात आरत्या म्हटल्या जात असत. त्याऐवजी आता सुरेल आवाजामध्ये आरत्या मोबाईलवर लावल्या जातात आणि त्याप्रमाणे देवतांना ओवाळले जाते. याचा अर्थ भक्ती, महापूजा किंवा साधी पूजा अथवा अभिषेक हे सर्व ऑनलाईन झाल्यात जमा आहे.
पुण्य कमवण्यासाठी मोठ्या देणग्या ऑनलाईन देण्यात येत आहेत. या देणग्या ऑनलाईन गेल्यानंतर पुण्यसुद्धा ऑनलाईनच मिळते की काय, याविषयी निश्चित माहिती नाही.भारतीय बाजारपेठेत प्रत्यक्ष चलनवलन किंवा रकमा देणे-घेणे अत्यंत कमी झाले असून सर्व व्यवहार ऑनलाईन होत आहेत. कधीकाळी खिशात रुपया न घेता फिरण्याची कल्पनाही आपण करू शकत नव्हतो. ते आता प्रत्यक्षात आले आहे. असूद्या, सोबतीला म्हणून आपण काही ना काहीतरी रुपये घेऊन बाहेर पडत असू किंवा प्रवासाला जात असू, आज मोबाईल सोबत असला की, पुरेसे झाले हे सिद्ध झाले आहे. तुमच्या अकाऊंटमध्ये रक्कम असली पाहिजे आणि मोबाईलमध्ये जीपे, फोन पे किंवा तत्सम पेमेंट करण्याचे अॅप्स पाहिजेत.