एक नाराज अगदी अलीकडेच आमच्या पक्षातून हरवला आहे. अंगावर पांढरा फुल शर्ट व फुल पँट आहे. दिल्ली पद्धतीचे जाकीट अंगावर आहे. प्रकृती धडधाकट आहे. गाल वर आलेले आहेत. उजव्या हातात सोन्याचे ब्रेसलेट आहे. गळ्यात सोन्याची चेन आहे. पाच बोटांत सहा अंगठ्या आहेत.
चेहर्यावर नेहमी स्मित हास्य असते. एका डोळ्यात मार्दव तर दुसर्या डोळ्यात बिबट्यासारखी जरब! खिशात नेहमी पाच-दहा हजार पडून असतात. सदर वर्णनाचा इसम जर कुणाला चुकून आढळला, तर न चुकता खालील मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा. पत्ता सांगणार्यास एक लाख रुपये आणि प्रत्यक्ष धरून आणणार्यास एक लाख 25 हजार मिळतील. त्याला तुम्ही, कुठे चालला आहात, विचारले तर ‘मिळेल त्या पक्षात’ असे विक्षिप्त उत्तर देतो. असा कुणी जर भेटला, तर चला तुम्हाला योग्य त्या पक्षात नेतो अशी भूलथाप देऊन थेट आमच्या पक्ष कार्यालयात आणून सोडावे.
आणि आता प्रिय धोंडुराव हाणामारे यांना... हात जोडून विनंती आहे... कृपया आपण कुठेही असला तरी सुखरूप राहा. तुमच्यावर पक्षातले कुणीही नाराज नाहीत. तुम्हीपण आमच्यावर नाराज होऊ नका. तुमच्या घरच्यांकडे आमचे बारीक लक्ष आहे. त्यांची आम्ही म्हणावी तशी काळजी घेत आहोत. तुम्ही कुठूनही उभे राहा, कुठेही उभा राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तब्येतीची काळजी घ्या. काहीही बरेवाईट करून घेऊ नका. तुम्ही गेल्यापासून पक्षप्रमुखांनी अन्न- पाणी सोडलेले आहे. रात्रंदिवस ते ‘माझा धोंडू...,’ ‘माझा धोंडू...’ असा जप करत आहेत. माझ्या धोंडूला लवकर शोधून आणा, नाहीतर एकेकाच्या डोक्यात धोंडा घालतो, म्हणायला लागलेत.
तेव्हा प्रिय धोंडुराव, कुठे असाल तिथून लवकरात लवकर येऊन पक्ष आणि पक्षप्रमुखांचा जीव भांड्यात पाडावा. बाकी घरच्यांचे काही म्हणणे नाही. ते कुठेही असू देत, पण सुखी असू देत असे घरच्यांचे म्हणणे आहे. ते परत आलेच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह नाही, तरी पक्षासाठी आपण परत यावे. तुम्ही परतल्यावर कुणीही रागे भरणार नाहीत.
कळावे,
आपले पक्षप्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते